परभणी : खाकी वर्दीतील माणूस व त्यांच्या शिस्तशीर खात्याची माहिती जाणून घेण्याचे कुतूहल सर्वांनाच असते. ते कसे राहतात, त्यांची शस्त्रे कशी असतात किंवा त्यांच्या शिस्तशिरपणा कसा असतो, हे परभणी शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी मंगळवारी (ता. सात) अगदी जवळून अनुभवले. या वेळी पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांच्यासह उपस्थित सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील विद्यार्थ्यांचे बालहट्ट पुरवत त्यांना पोलिस खात्याची माहिती दिली.
‘रेझिंग डे’निमित्त आठवड्यापासून जिल्हाभरात कार्यक्रम घेतले जात आहेत. या कार्यक्रमाचा भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने जिल्हा पोलिस प्रशासनाने मंगळवारी (ता. सात) विद्यार्थ्यांसाठी शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित केले होते. पोलिस मुख्यालयाच्या मैदानात पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रागसुधा आर, सहायक पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह सर्व पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक, फौजदार व पोलिस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. सकाळी आठ वाजता कार्यक्रमास सुरवात झाली.
शहरातील विविध शाळेतील हजारो विद्यार्थी त्यांच्या शालेय पोशाखात सज्ज होती. पोलिस मामा कसे काम करतो हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांच्याच चेहऱ्यावर दिसून येत होती. सकाळी पोलिस परेड ग्राऊंडवर पोलिसांचे शिस्तशीर सवाद्य पथसंचलन झाले. पोलिस दलातील वेगवेगळ्या तुकड्या या वेळी पथसंचलनात सहभागी झाल्या होत्या. पोलिस बॅन्डचेही उत्कृष्ठ सादरीकरण झाले. पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी व्यासपीठावरून खाली उतरत शालेय विद्यार्थ्यांची नावे, त्यांची इयत्ता व शाळेचे नाव विचारत त्यांच्या कुटुंबाची माहितीदेखील जाणून घेतली. पोलिस दलातील सर्वांत मोठा अधिकारी आपल्याशी हस्तांदोलन करत असल्याने विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता.
हेही वाचा - नांदेडला अधिकाऱ्यांने घेतली दहा लाखाची लाच !
चिमुकल्या चेहऱ्यांवर कुतूहल
पोलिसांच्या वतीने ‘रेझिंग डे’निमित्त मंगळवारी शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाची माहिती शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आली. बंदुकीची नावे ऐकून विद्यार्थीही आनंदी होत होते. जे फक्त टिव्हीवर पाहत होतो, तेच शस्त्र प्रत्यक्षात पाहता येत असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित होत होता.
विद्यार्थ्यांनी पोलिसांची माहिती कुटुंबाला द्यावी
पोलिसांची संपूर्ण माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी यासाठी ‘रेझिंग डे’ आयोजित करण्यात येत असतो. विद्यार्थ्यांनी येथील सर्व माहिती जाणून घ्यावी, व त्यांच्या कुटुंबापर्यंत पोलिसांचे कार्य पोचवावे या उद्देशानेच आज आम्ही विद्यार्थ्यांना आमंत्रित केले होते. विद्यार्थ्यांच्या या कार्यक्रमातील सहभाग आमचे मनोबल उंचावणारा ठरला आहे.
- कृष्णकांत उपाध्याय, पोलिस अधीक्षक, परभणी
हेही वाचा - ...या रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.