बीड : शासनाच्या राष्ट्रीय सहकार विकास निगम मार्फत आजारी कारखान्यांना मदत करण्यात येते. यामध्ये आता उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) अमरसिंह पंडित यांच्या कारखान्यांसह काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या कारखान्यांचा समावेश झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
यापूर्वीच्या व आताच्या यादीतून भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ कारखाना वगळला आहे हे विशेष. सोमवारी (ता. २३) राज्याच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने राज्यातील चार सहकारी साखर कारखान्यांना केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास निगम मार्फत राज्य सरकारकडून मार्जिन मनी लोन उपलब्ध करुन देण्याबाबत आदेश काढले आहेत.
यात अजित पवार यांच्या इंदापूर येथील श्री. छत्रपती सहकारी साखर कारखान्याला १२८ कोटी रुपये, पवारांचे समर्थक माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या गढी (ता. गेवराई, जि. बीड) येथील जयभवानी सहकारी साखर कारखान्यास १५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अर्धापूर (जि. नांदेड) येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला तब्बल १४७ कोटी ७९ लाख रुपयांच्या रकमेचे कर्ज राज्य शासन हमीवर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेकडून मंजूर करण्यात आले आहे. तसेच काँग्रेसचेच माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या भाळवणी, पंढरपूर (जि. सोलापूर) येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्यास १४६ कोटी रुपयांच्या कर्जास मंजुरी दिली आहे.
मुंडेंच्या कारखान्याला फुली
केंद्र सरकारच्या सहकार विकास निगम मार्फत राज्यातील आजारी सहकारी साखर कारखान्यांना मदतीच्या यादीत यापूर्वी केवळ भाजपच्या नेत्यांशी निगडित सहा साखर कारखान्यांचा समावेश होता. यामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, आमदार अभिमन्यू पवार आदींच्या कारखान्यांचा समावेश होता.
पूर्वीच्या प्रस्तावात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा समावेश होता. मात्र, मदतीच्या यादीतून हा कारखाना वगळला होता. आताही काँग्रेस नेत्यांच्या कारखान्यांचा समावेश व भाजपच्या मुंडेंच्या कारखान्याला फुली पडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.