धाराशिव : तलाठी भरतीच्या ऑनलाइन परीक्षा गैरव्यवहारात ‘लातूर पॅटर्न’ एका चौकशीत समोर आला आहे. काही महिन्यांपूर्वी धाराशिव निवड मंडळाच्या तलाठी भरती ऑनलाइन परीक्षा गैरव्यवहारात हा ‘लातूर पॅटर्न’ वापरल्याचे समोर आले आहे. धाराशिवच्या तहसीलदारांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार गुरुवारी लातूरच्या तिघा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यातील दोघांना अटक झाली असून न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, हा कोट्यवधींचा गैरव्यवहार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
काही दिवसांपूर्वी तलाठी पदासाठी झालेल्या ऑनलाइन परीक्षेत दुरस्थ (रिमोट) तंत्रज्ञानाचा वापर करून लातूर येथील दोन परीक्षार्थींनी धाराशिव येथे परीक्षा दिली होती. यात गैरव्यवहार झाल्याची तक्रार धाराशिव स्पर्धा परीक्षा संघटनेच्या एका सजग महिला पदाधिकाऱ्याने दिली होती. त्यानुसार परीक्षा घेणारी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) केलेल्या चौकशी, तपासणीत संगणकीय रिमोट तंत्राच्या साहाय्याने संबंधित परीक्षार्थींनी परीक्षा दिल्याचे समोर आले होते. याची खात्री झाल्यानंतर महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
संगणकात फेरबदल, संगणकीय व्यवस्थेवर ताबा मिळवून परीक्षेत उत्तरपत्रिका सोडविल्याप्रकरणी भादंविच्या कलम ४६८ नुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. यातील दोघांना अटक करून न्यायालयासमोर उभे केले. न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
असा झाला घोटाळा
ऑनलाइन परीक्षा देताना संगणक हॅक करून उत्तरपत्रिका सोडविल्याचे महसूल विभागाच्या चौकशीत समोर आले होते. लातूर येथून हॅकरने संगणक हॅक करून परीक्षार्थींच्या उत्तरपत्रिका सोडविल्याचे सांगण्यात येत आहे. मोबदला म्हणून या प्रकरणात सुरवातीला सूत्रधार व उमेदवारांत प्रत्येकी पस्तीस लाखांची बोलणी झाली होती. नंतर तडजोड करून सत्तावीस लाख रुपये ठरले. त्यातील सात ते आठ लाख रुपये गैरव्यवहारातील सूत्रधारांना दिले आहेत, असे चौकशीत समोर आले आहे.
या गैरव्यवहारात संबंधितांचे मोठे रॅकेट असण्याचा पोलिसांना संशय आहे. यात महसूल विभागातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांसह खासगी व्यक्तीही गुरफटले असून पोलिस त्यांच्या मागावर आहेत. लातूर जिल्ह्यातील एक बडी व्यक्तीही यात गुरफटल्याचा संशय व्यक्त होत आहे.लातूर येथील दोन परीक्षार्थींनी तंत्र वापरून परीक्षा यंत्रणा हॅक केली, हे एका तक्रारीच्या चौकशीतून समोर आले आहे. लातूर जिल्ह्यात यासाठी मोठे रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता आहे. यात कोट्यवधींची उलाढाल झाली असल्याची शक्यता आहे. पोलिस तपासात ते समोर येऊ शकते.
— महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी, धाराशिव.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.