लातूर जिल्ह्यात दहा नवीन भोजनालय मंजूर, शिवभोजनाची थाळी मात्र पार्सलमधूनच

Shiv Bhojanalay, Latur News
Shiv Bhojanalay, Latur News
Updated on

लातूर  : राज्य सरकारच्या आदेशानुसार शिवभोजन थाळी भोजनालयाचा विस्तार एक एप्रिलपासून जिल्हा मुख्यालयानंतर तालुका ठिकाणी होत आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात दहा नवीन केंद्र मंजूर केली असली तरी पाच रूपयाचे ही शिवभोजन थाळी सध्या तरी लोकांना पार्सलमधूनच न्यावी लागणार आहे. टाळेबंदीमुळे (लॉकडाऊन) केंद्राच्या ठिकाणी पूर्वीसारखे बसून थाळी भोजन घेता येणार नसल्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी सांगितले.


कोरोनामुळे करण्यात आलेल्या टाळेबंदीमध्ये लोकांची गैरसोय टाळण्यासाठी तालुका ठिकाणी शिवभोजन भोजनालय सुरू करण्याचा निर्णय घेत शिवभोजनाचा दर दहा रूपयावरून पाच रूपयेही करण्यात आला आहे. सध्या शहरात जिल्हा मुख्यालय ठिकाणी तीन भोजनालय सुरू आहेत. आता प्रत्येक तालुक्याला एक या प्रमाणे दहा भोजनालये (केंद्र) मंजूर करण्यात आली आहे. भोजनालयासाठी सक्षम खानावळ, स्वयंसेवी संस्था (एनजीओ), महिला बचतगट, भोजनालय, रेस्टारंट किंवा मेसची निवड करण्यात येणार असून निवडीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली आहे.

जिल्ह्यात लातूर ग्रामीण, रेणापूर, औसा, उदगीर व अहमदपूर येथील केंद्रांसाठी रोज दीडशे थाळी तर चाकूर, जळकोट, निलंगा, देवणी व शिरूर अनंतपाळच्या केंद्रासाठी रोज शंभर थाळीची क्षमता मंजूर करण्यात आली आहे. दुपारी बारा ते तीन या वेळेत हे शिवभोजन सुरू राहणार असून टाळेबंदीमुळे पूर्वीप्रमाणे केंद्रात बसून भोजन घेता येणार नाही. त्याचे पार्सल घेऊन जाता येणार आहे.  तालुका ठिकाणी तातडीने केंद्र सुरू करून टाळेबंदीच्या काळात गरजूंना भोजन देण्यासाठी प्रशासनाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.  

हेही वाचा ः सावधान ! आता दुचाकी जप्त होणार, विनाकारण फिरणाऱ्यांवर लातूर पोलिसांची कारवाई

ई-मेलवर अर्ज करा अन्‌ आरटीओचे प्रमाणपत्र घ्या
अत्यावश्यक सेवा व वस्तूंची ने-आण करण्यासाठी रस्त्यावर वाहनांना फिरावे लागत आहे. सध्या संचारबंदी आहे. अशा वाहनांना परिवहन विभागाकडून प्रमाणपत्र दिले जात आहे. त्यानंतर ही वाहने रस्त्यावर धावत आहेत. पण याकरिता परिवहन अधिकारी कार्यालयात गर्दी होत आहे. ही गर्दी टाळण्यासाठी आता परिवहन विभाग ई-मेलवर संबंधित वाहनधारकांचा अर्ज स्वीकारणार आहे. अर्ज व कागदपत्रांची वैधता पाहून तातडीने ई-मेलवरूनच संबंधिताला प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात टाळेबंदी करण्यात आली आहे. पण यात अत्यावश्यक वस्तूंना सूट देण्यात आली आहे.

त्यामुळे राज्यात अत्यावश्यक सेवा व वस्तू यांची वाहतूक करणाऱ्या मालवाहू वाहनांना प्रमाणपत्र देण्याबाबत शासनाने सूचना दिल्या आहेत. याकरिता लातूर येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात नियंत्रण कक्षही सुरू करण्यात आला आहे. सध्या राज्यभरात संचारबंदी लागू आहे. संचारबंदीमुळे वाहनधारकांना परिवहन कार्यालयात येणे अडचणीचे ठरत आहे. तसेच परिवहन कार्यालयात गर्दीही होत आहे. या कार्यालयातील गर्दी टाळण्यासठी तसेच अत्यावश्यक सेवा व वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना सोयीचे व्हावे म्हणून प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या वतीने कार्यालयाच्या ई-मेलवर अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. अर्जासोबत वाहनाची वैध कागदपत्रे जसे नोंदणी प्रमाणपत्र, विमा, वाहन कर, योग्यता प्रमाणपत्र आदींची प्रत सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

वाहतुकीचा माल हा अत्यावश्यक वस्तू असणे गरजेचे आहे. त्याचे वर्णनही अर्जात नमूद करावे लागणार आहे. असा अर्ज आल्यानंतर वाहनास तत्काळ प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हे प्रमाणपत्रसुद्धा अर्जदाराच्या ई-मेलवरच दिले जाणार आहे. याकरिता वाहनधारकांनी या कार्यालयाच्या mh२४@mahatrnscom.in या ई-मेल आयडीवर अर्ज करावा. तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्या संस्थांनी स्वतःचे असे स्टिकर आपल्या वाहनावर लावावे, असे आवाहन या कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच जे वाहनधारक परिवहन विभागाच्या प्रमाणपत्राची कार्यालयात मागणी करतील त्यांनाही परिवहन विभागाचे प्रमाणपत्र जारी केले जाणार आहे, अशी माहितीही या कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.