आष्टी : आष्टी तालुका हा पूर्णपणे दुग्ध व्यवसायावर अवलंबून असून या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर दुधाचे उत्पादन होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीमध्ये ‘एक गाव, एक गोठा’ ही संकल्पना जर राबविली तर शेतकरी वर्गाची नक्कीच भरभराट होणार असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री सुरेश धस यांनी केले.
आष्टी तालुका दूध संघाच्यावतीने कडा येथे दूध उत्पादक शेतकरी महिलांच्या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी दूध संघाचे चेअरमन शांतीलाल भोसले, व्हाईस चेअरमन छायाताई अशोक गर्जे, आत्माराम फुंदे, सरपंच अशोक भवर, कार्यकारी संचालक मच्छिंद्र धनवडे, चेअरमन शिवाजी कोकणे, अनुजा गळगटे, अनिता पोकळे, सुनिता गिरी, छाया धस, भरत सुळे, व्यवस्थापक दिनकर दाणी आदी उपस्थित होते. धस म्हणाले की, दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासकीय अनुदान मिळवून देण्यासाठी मी विधिमंडळात वेळोवेळी शेतकऱ्यांची बाजू मांडली.
यामुळे सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना ७ रुपये प्रतिलिटर अनुदान दिले. दुध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान, मुक्त संचार गायगोठा पद्धतीने दुध व्यवसायात होणारी वाढ, दिवसेंदिवस शेतकरी विविध प्रजातीचे सिमेन्स वापरून सदृढ कालवडी बनवत आहेत. आज शेतकरी हुशार झाला आहे. पंजाब, हरियाणा येथे जाऊन कालवडी खरेदी करत छोट्या व्यवसायाला मोठ्या स्वरूपात करण्यासाठी धडपडत आहे.
दुष्काळी परिस्थितीत मी आष्टी दुध संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मुरघास बॅगची सुरवात केली त्याच फलित म्हणून आज प्रत्येक शेतकऱ्यांच्या दारात मुरघास बॅग दिसत आहेत. दुध व्यवसाय करत असताना गायींचा विमा संरक्षण करणे हे महत्वाचे आहे, असेही धस यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने दुध उत्पादक हजर होते.
दूध अनुदान लवकरच वितरित होणार
आष्टी तालुका दुध संघाच्या संचालिका प्राजक्ता धस म्हणाल्या की, आष्टी तालुका दूध संघामार्फत अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्यापैकीच मुरघास ही संकल्पना सुरेश धस यांनी गेल्या पाच वर्षांपूर्वी राबवली होती. ही संकल्पना मोठ्या प्रमाणात प्रभावी ठरल्याने शेतकऱ्यांना चाऱ्याची अडचण निर्माण होत नाही तसेच मुरघासामुळे दुधाची गुणप्रत व दुधाचे उत्पन्न ही वाढण्यास मोठ्या प्रमाणात मदत झालेली आहे.
आष्टी तालुका दूध संघाने कोरोना काळामध्ये हजारो लोकांना जीवदान देण्यासाठी कोविड सेंटर उघडले होते. सध्या ऑक्टोबर अखेरपर्यंत साधारणपणे सहा कोटी रुपयांचे दूध अनुदान वितरित होणार आहे. मराठवाड्यातील आष्टी हा सर्वात मोठा दूध संघ असून सर्वसामान्य लोकांना व दूध उत्पादकांना न्याय देण्याची भूमिका नेहमीच आष्टी तालुका दूध संघाने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.