लातूर : येथील मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्यात ‘वंदे भारत’ रेल्वे प्रकल्पासाठी अत्याधुनिक तीन हजार २०० बोगी तयार होणार आहेत. यासंदर्भातील निविदा एप्रिलमध्ये काढण्यात आल्या होत्या. त्याची मुदत जुलैपर्यंत होती. पण सर्व निविदाधारकांच्या मागणीवरून ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये बोगींच्या उत्पादनाला सुरवात होण्याची शक्यता आहे. येथील ‘एमआयडीसी’मध्ये मराठवाडा रेल्वे बोगी कारखाना उभारण्यात आला आहे. कारखान्याची तीन टप्प्यांत उभारणी होणार असून पहिल्या टप्प्यात ११० एकरवर कारखाना आहे. वंदे भारत रेल्वे हा केंद्र शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प आहे.
या प्रकल्पाअंतर्गत २०० रेल्वेचे काम या कारखान्यात होणार आहे. याबाबत काढलेल्या निविदांत पंधरा कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. यात केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील काही कंपन्यांचाही सहभाग आहे. निविदा प्रक्रियेला ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. निविदा कोणालाही मिळाली तरी नियंत्रण मात्र रेल्वेचेच असणार आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची २५ डिसेंबरला जयंती आहे. त्यानिमित्ताने बोगी उत्पादनाला सुरवात होण्याची शक्यता आहे.
वातानुकूलित वंदे भारत रेल्वेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. १६ बोगींच्या रेल्वेत १४ बोगी कार चेअर असणार आहेत. दोन ड्रायव्हिंग कोच असतील. एक हजार १८० प्रवासी क्षमता असेल. रेल्वेत सेन्सॉर यंत्रणा, आपत्ती काळात प्रवाशांना चालकाशी बोलण्याची व्यवस्था, ॲटोमॅटिक डोअर लॉक, आरामदायी आसन व्यवस्था असेल. अशा बोगींचे काम येथील कारखान्यात केले जाणार आहे.
मराठवाडा रेल्वे बोगी कारखान्यात आता वंदे भारत रेल्वेच्या तीन हजार २०० बोगी तयार होणार आहेत. हा कारखाना लवकर सुरु व्हावा यासाठी खासदार सुधाकर शृंगारे हे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. मराठवाड्यातील उद्योजकांना यात काम मिळावे हाही त्यामागचा उद्देश आहे. तांत्रिक मनुष्यबळासाठी येथे प्रशिक्षण केंद्र उभे राहावे, यासाठीही प्रयत्न सुरु आहेत.
- श्यामसुंदर मानधना, सदस्य, क्षेत्रीय सल्लागार समिती, मध्य रेल्वे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.