केज - एका पाचवीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या अकरा वर्षीय शाळकरी मुलाला पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन संशयितास मुलाचे नातेवाईक व नागरिकांनी पकडून चोप देत पोलीसांच्या ताब्यात दिल्याची घटना सोमवारी (ता.२३) रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास केज शहरातील मुख्य रस्त्यालगतच्या मच्छी मार्केट जवळ घडली.
या गोंधळात जमावाला पाहून अनोळखी दोघे पळून गेले. मुलाच्या सांगण्यावरून दोघांसह दोन चार चाकी वाहने पोलीसांनी ताब्यात घेतले आहेत. याप्रकरणी चौघांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील भीमनगर येथील परमेश्वर नारायण मस्के यांचा अंकुर मस्के हा मुलगा रामराव पाटील विद्यालयात पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. मागील चार-पाच दिवसांपासून पाळत ठेवून चॉकलेट यासारखे आमिष दाखवून त्याला पळवून नेण्याच्या प्रयत्न एका टोळीकडून केला जात होता. हा प्रकार त्या मुलाने दाढीवाला एकजण मला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून पाठलाग करत असल्याचे आईला सांगितले होते.
त्यामुळे त्याच्या नातेवाईकांनी सोमवारी शाळेत जाण्यासाठी तु पुढे चल आम्ही पाठीमागे आहोत असे सांगितले. त्यामुळे हा शाळकरी मुलगा शाळेत जात असताना मच्छी मार्केट जवळ एकजण त्याला पकडून जबरदस्तीने (एमएच-४२/बीई-०७८८) या वाहनात बसवत असताना निदर्शनास आले. त्यामुळे त्या मुलाच्या ओरडण्याचा आवाज ऐकुन आम्ही धावत गेलो. हा गोंधळ पाहून आसपासचे नागरिकांनी धाव घेत त्या मुलाची सुटका केली.
मात्र त्या संशयिताला विचारणा केली असता उडवा-उडवीची उत्तरे दिल्याने मुले पळविणारी टोळी असल्याचा संशय आल्याने संतप्त नागरिकांनी चोप दिला. तोपर्यंत या गोंधळात त्यांचे इतर अनोळखी दोन साथीदार फलोत्पादन विभागाच्या जागेच्या दिशेने पसार झाले.
त्यानंतर या घटनेची पोलीसांना माहिती देताच पोलीस नाईक प्रकाश मुंडे, बाळासाहेब हंकारे यांनी घटनास्थळी दाखल होत विजय गोपीनाथ भंडारे (सणसर, ता. इंदापूर, जि. पुणे) व धनराज वळसे (रा. .केज, ता. केज, जि. बीड) यांना दोघांसह इर्टिका (एमएच-४२/बीई-०७८८) व स्वीफ्ट डिझायर (एमएच-१२/एचव्ही-७०९९) ही दोन वाहने ताब्यात घेतले असून अनोळखी दोघे फरार आहेत.
या प्रकरणी त्या मुलाचे वडील परमेश्वर मस्के यांच्या तक्रारीवरून विजय भंडारे व धनराज वळसे हे दोघे व इतर अनोळखी दोघे अशा चौघांविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करीत आहेत.
शहरातील नेहमी गजबजलेला ठिकाणाहून लहान मुलं पळवून नेण्याच्या घटनेने पालकात भीतीचे वातावरण पसरले आहे. सध्यातरी तालुक्यात शाळकरी मुले पळवून नेणारी टोळी सक्रिय झाल्याचा संशय बळावला आहे.
प्रतिक्रिया -
'रात्रीच्यावेळी आकाशात संशयास्पद ड्रोन फिरणे किंवा मुले पळविण्याचा संशय आल्यास पोलीसांना कळवा. पोलीस प्रशासन तात्काळ आपल्या मदतीला धावून येईल. अफवांवर विश्वास न ठेवता ताब्यात दिल्यास चौकशी करून संशीतावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.'
- प्रशांत महाजन, (पोलीस निरिक्षक, पोलीस ठाणे, केज)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.