भारतरत्न स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी उदगीर - लातूर विभागीय आयुक्त कार्यालयाचा प्रश्न असो किंवा उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रश्न. अनेक वर्षापासून हे दोन्ही प्रश्न चर्चेत आहे. यावर आंदोलने झाली आहेत. आता उदगीर येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उदगीर जिल्हा निर्मितीचा प्रश्न चर्चेत आला. जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी चाणाक्षपणा दाखवत उदगीर जिल्हा निर्मितीचा बॉल ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या कोर्टात टाकला. इतकेच नाहीतर याकरता नांदेडची साथ हवी असे सांगत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचेही लक्ष वेधले.
लातूर विभागीय आयुक्त कार्यालयाला नांदेडकरांचा विरोध आहे. यावर अनेक वेळा आंदोलने झाली आहेत. नांदेडकरामुळे लातूरला विभागीय आयुक्त कार्यालय होऊ शकले नाही हे लातूरकर विसरलेले नाहीत. उदगीर जिल्ह्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. उदगीर जिल्हा निर्मिती करायची असेल तर त्यात नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यांचा ही समावेश करावा लागणार आहे. त्याला नांदेडकर साथ देणार का? हा खरा प्रश्न आहे. उदगीर येथे ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी संमेलनाचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी आपल्या भाषणात उदगीर जिल्हा निर्मितीची मागणी केली. याकरता पालकमंत्री अमित देशमुख यांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सूचित केले.
या प्रश्नावर पालकमंत्री अमित देशमुख यांनी आपल्या भाषणात चाणाक्षपणा दाखवला. श्री. बसवराज पाटील यांची भूमिका योग्य आहे. लोकभावनेचा ही मी आदर करतो. पण उदगीर जिल्हा निर्मिती झाल्यानंतर तुम्ही माझ्यापासून दूर जाल. लातूर उदगीरपासून दूर होईल. माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. पण या करता नांदेडचे योगदान महत्त्वाचे आहे. हा जटिल प्रश्न आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी माझ्या मर्यादा आहेत. माझ्या आवाक्याबाहेरचा हा प्रश्न आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनेक जिल्ह्यांची निर्मिती केली आहे .त्यामुळे उदगीर जिल्हा निर्मितीसाठी सुद्धा भविष्यात त्यांनी मार्ग काढावा. हा प्रश्न सोडवावा अशी विनंती पालकमंत्री श्री देशमुख यांनी आपल्या भाषणात केली. माजी मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मात्र आपल्या भाषणात या विषयाला बगल दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.