परभणी : शहरात सर्वत्र कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत. विशेषतः दोन-दोन दिवस हा कचरा उचलल्या जात नसून त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरू लागलेली आहे. वार्षिक पाच कोटी रक्कम घेणाऱ्या स्वच्छता एजन्सी व त्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांचे मात्र स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. महानगरपालिकेने शहराच्या स्वच्छतेसाठी एजन्सी नियुक्त केलेली आहे.
घरोघरी जाऊन घंटागाड्याद्वारे वर्गीकृत कचरा संकलन करणे, जागोजागी होणारे कचऱ्याचे ढिगारे उचलणे, कचरा निर्धारीत केलेल्या डंपिंग ग्राऊंडवर पोहचवणे आदी कामांचा त्यामध्ये समावेश आहे. कोरोनाच्या काळात निर्बंध असल्यामुळे शहरात, बाजारपेठांमध्ये कचऱ्याची समस्या फारशी उद्भभवली नाही.
परंतु आता निर्बंध हटल्यामुळे बाजारपेठेतील सर्व प्रकारची दुकाने पूर्णवेळ सुरु झालेली असून शहरासह बाजारपेठेतील गर्दी सुध्दा वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून टाकावू कचरा देखील मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे एजन्सीचे काही अंशी कमी झालेले काम पुन्हा वाढले असून वाढलेल्या कामाचा मात्र एजन्सीला विसर पडल्याचे दिसून येते.
दोन दिवस कचरा तसाच
महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षणात सहभाग नोंदवला आहे. परंतु स्वच्छतेकडे मात्र दुर्लक्ष चालवल्याचे दिसून येते. कोरोनाच्या नावाखाली इतके दिवस सर्व काही धकून गेले परंतु आता महापालिका व स्वच्छता विभागाने शहराच्या स्वच्छतेकडे देखील लक्ष देणे गरजेचे झाले आहे. शहरातील बाजारपेठेत जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसू लागले आहेत.
विशेषतः दोन-दोन दिवस कचरा उचलल्या जात नाही. गांधी पार्क, गुजरी बाजार, आर.आऱ. टावर, कडबी मंडी, गोरक्षण, नेहरु पार्क, जिल्हा परिषद सभापतींची निवासस्थाने, शनिवार बाजार, जनता मार्केट, क्रांती चौक, महात्मा फुले मार्केट, अपना कॉर्नर, सरकारी दवाखाना, सुपर मार्केट, राजगोपाचालारी उद्यान, काळी कमान, परिसरातील सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे लागल्याचे दिसून येते.
घंटागाड्यांची तीच तऱ्हा
घंटागाड्या देखील नियमितपणे येत नसल्याची ओरड आहे. त्यामुळे नागरीकांना एक तर दोन-दोन दिवस घरातच कचरा साठवून ठेवावा लागतो नाही तर ते देखील कुठेही तरी नाली, रस्त्यामध्ये कचरा टाकीत असल्याचे चित्र आहे. परिमाणी शहरात सर्वत्र असे कचऱ्याचे ढिगारे लागले आहे. अनेक प्रभागातील काही वसाहतींमध्ये तर घंटागाडी अद्यापही पोचली नसून स्वच्छता विभागातील अधिकारी देखील त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
प्रशासनाचाही कानाडोळा
महानगरपालिकेला स्वच्छ सर्वेक्षणात वर्गीकृत कचरा संकलीत करणे अनिवार्य आहे. शहरात दररोज १२५ टन कचरा निर्माण होतो. हा कचरा वर्गीकरण करुन गोळा केल्या जातो का? त्यावर काय प्रक्रिया केली जाते?, किती खत निर्मिती अथवा जैववायू निर्माण होतो? एवढ्या मोठ्या कचऱ्याची कशी विल्हेवाट लावली जाते? याबद्दल कोडेच आहे. प्रशासनाही त्याबाबत ठोस भूमिका घेत नसल्याचे दिसून येते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.