भोकरदन (जालना) : वर्षाला तब्बल वीस लाखांच्या पॅकेजची कंपनीची ऑफर...एरवी कुणीही अशी संधी दवडली नसती; पण तिला प्रशासकीय सेवेतच यायचे होते. त्यामुळे तिने ही ऑफर नाकारली. जालना जिल्ह्यात शिक्षण घेतलेल्या आणि नाशिकला राहत असलेल्या अंकिता अरविंद वाकेकर हिने ‘यूपीएससी’त दुसऱ्या प्रयत्नात बाजी मारली. तिला ५४७ वी रॅंक मिळाली आहे.
भोकरदन तालुक्यातील गोषेगाव येथील सत्यशोधक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे अंकिताने २०११-१२ मध्ये विज्ञान शाखेमध्ये ८०.८३% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला. अंकिता हिचे प्राथमिक शिक्षण नाशिक येथे झाले, तर महाविद्यालयीन शिक्षण तिने गोषेगाव (ता. भोकरदन) येथील सत्यशोधक महाविद्यालयात विज्ञान शाखेतून घेतले. त्यानंतर तिने वीर जिजामाता इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथून सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्यानंतर ती स्पर्धा परीक्षेकडे वळली. अंकिताचे वडील एकलहरा (ता.जि. नाशिक) येथे औष्णिक वीज केंद्रात अभियंता म्हणून कार्यरत असून, आईदेखील दिंडोरी (ता.जि. नाशिक) येथे तहसीलदार आहेत.
ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन तिने यूपीएससीत झेप घेतल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ती एक प्रेरणास्थान ठरली आहे. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य सुनील वाकेकर व सचिव श्रीमती जयश्री बनकर यांनी अभिनंदन करून भावी कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.
अंकिताचा यशाचा अजेंडा
तांत्रिक शाखेचे शिक्षण घेतले असले, तरी अंकिताला स्पर्धा परीक्षेची ओढ लागली होती. त्यादृष्टीने तिने तयारी सुरू केली. याचदरम्यान अंकिताला तब्बल वीस लाख रुपये वार्षिक पॅकेज असणारी नोकरी चालून आली; परंतु आपल्या प्रशासकीय सेवेतच जायचे हे तिने मनाशी पक्के ठरविले होते. त्यामुळे तिने ही ऑफर नाकारून ती दिल्ली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यास गेली. पहिल्या प्रयत्नात तिला अपयश आले. तरीही ती हरली नाही, थांबली नाही. जिद्दीने अभ्यास करीत राहिली. दुसऱ्या प्रयत्नात तिला हे यश मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.