नांदेड : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचा उदय झाल्याने राज्यभरातील महापालिका, जिल्हा परिषदांमध्ये महाविकास आघाडीचा फार्म्युला राबविण्यात आला. पंधरा वर्षांपासून जिल्ह्यात काँग्रेससोबत राहिलेल्या राष्ट्रवादीला पहिल्या अडीच वर्षांत उपाध्यक्षपदासह तीन विषय समित्या मिळाल्या होत्या. घटक पक्षांची मोट बांधून काँग्रेसने जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला; पण संख्याबळाच्या चक्रव्यूवहात सापडलेल्या राष्ट्रवादीलाच सत्तेपासून मुकावे लागले.
जिल्ह्यात भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी स्वायत्त संस्थांमध्ये घटक पक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडीचा फार्म्युला राबविण्यात आला. राज्य स्तरावरील पक्षीय समीकरणे बाजूला ठेवून जिल्ह्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रदीप नाईक यांनी काँग्रेसची संगत सोडली नाही. त्यामुळे पहिल्या अडीच वर्षांत उपाध्यक्षपदासह तीन विषय समित्यांचा सत्तेत वाटा मिळाला. संख्याबळाने प्रबळ काँग्रेसच्या तोलाने सत्तारूढ झालेल्या राष्ट्रवादीत विधानसभा निवडणुकीनंतर पडझड झाली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या गटाच्या चार सदस्यांनी सत्तेवर राहून सवता सुभा घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचे संख्याबळ घटून सहावर येऊन ठेपले.
सावध शिवसेना राष्ट्रवादीला सरस -
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गटातील शिवसेनेच्या चार सदस्यांमुळे शिवसेनेतही पडझड मानली जात होती. पण महाविकास आघाडीचा फार्म्युला ठरल्यानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी शिवसेनेकडून व्हिप जारी करण्यात आला. राष्ट्रवादी मात्र संख्याबळाच्या ‘समाधाना’त गाफील राहिल्याने ऐन वेळी उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या तुलनेत संख्याबळ गाठू शकली नाही.
अवघड वळणाचा प्रवास -
उपाध्यक्षपद हातचे गेले तरी त्याची कसर सभापती निवडीत भरून निघण्याच्या अपेक्षा राष्ट्रवादीच्या प्रदीप नाईक गटाला होती. उपाध्यक्षपद मिळाल्याने शिवसेना सभापती निवड प्रक्रियेत स्तब्ध राहील, यात शंका नव्हती. पण काँग्रेसकडून तीन सभापतिपदांवर दावा करण्यात आल्याने राष्ट्रवादीने मलाईदार खात्यासाठी कसोसीने प्रयत्न केले.
काँग्रेसकडून महिला व बालकल्याण खात्याची ऑफर झुगारून ऐनवेळी समाजकल्याण, शिक्षण व आरोग्य, बांधव व अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादीच्या एकमेव समाधान जाधव यांनी उमेदवरी अर्ज दाखल केले. पक्ष अदेशापुढे राष्ट्रवादीचे ‘समाधान’ टिकू शकले नाही, ऐवेळी श्री. जाधव यांना माघारा घावी लागली. त्यामुळे मिनीमंत्रालयाच्या सत्तेपासून ‘वंचित’ राहिलेल्या राष्ट्रवादीचा आगामी काळात अवघड वळणाचा प्रवास सुरू झाला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
येथे क्लिक करा -‘एपीआय’ दाखवतो पिस्तुलाचा धाक
पालकमंत्र्यांनी मारले एका दगडात अनेक पक्षी -
संख्याबळानुसार महाविकास आघाडीत काँग्रेसने अध्यक्ष, तर शिवसेने उपाध्यक्षपद राखले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघाच्या माहेरवासीनी व मुखेड विधानसभेच्या बाऱ्हाळी सर्कलमधून निवडून आलेल्या मंगाराणी अंबुलगेर यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्ष पदासाठीही तोच फार्म्युला राबवत नायगाव विधानसभा मतदारसंघातील येताळा (ता.धर्माबाद) गटाच्य पद्मा नरसारेड्डी सतपलकवार यांची निवड केले.
सतपलवार यांचेही माहेर भोकर विधानसभा आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत महाविकास आघाडीच्या ताब्यात नसलेल्या मुखेड व नायगाव विधानसभा मतदारसंघात दोन्ही पदे गुंतवून भोकर विधानसभेची नाळ कायम ठेवली. सभापती निवडीतही देगलूर - बिलोली, भोकर - अर्धापूर - मुदखेड, मुखेड विधानसभा मतदारसंघात पदे देऊन पालकमंत्री श्री. चव्हाण यांनी आगामी काळातील निवडणुकांसाठी वाट सुपीक करत एका दगडात आनेक पक्षी मारले.
राष्ट्रवादीने ऑफर झुगारली -
तीन सभापतिपदांवर दावा करणाऱ्या काँग्रेसकडून महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीला महिला व बालविकास खात्याची ऑफर देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पण मलाईदार खात्याचा आग्रह करत राष्ट्रवादीने या खात्याची ऑफर झुगारली. त्यामुळे ऐन वेळी काँग्रेसकडून महिला व बालकल्याण खात्यासाठी सुशीला बेटमोगरेकर यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
हेही वाचले पाहिजे -प्रेमी युगलांना मारहाण करणाऱ्यांना अटक
चारही खात्यांवर वर्चस्व -
शिवसेनेच्या उपाध्यक्षपदासाठी कृषी व पशुसंवर्धन खाते जवळपास निश्चित झाल्याने राष्ट्रवादीच्या समाधान जाधव यांनी समाज कल्याण, शिक्षण व आरोग्य, बांधकाम व अर्थ या खात्यांसाठी अर्ज भरले. राष्ट्रवादीने उमेदवारी दाखल केल्यामुळे मतदानाचा प्रसंग ओढावल्यास बापूसाहेब गोरठेकर यांच्या निवासस्थानी काँग्रेसकडूनही संख्याबळासाठी खलबते झाली. मात्र, ऐन वेळी पक्षाचा आदेश म्हणून जाधव यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने निवड प्रक्रियेसाठी मतदानावर पडदा पडला. महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीला धक्का देत सर्व चारही खात्यांवर काँग्रेसच्या उमेदवारांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.