लोहारा (जि.उस्मानाबाद) : लोहारा तालुक्यातील एका गावातील दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करणाऱ्या नराधमांवर पोक्सा कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करून पीडितेचे आर्थिक पुनर्वसन करावे, या मागणीसाठी विविध संघटनानी सोमवारी (ता.२६) तहसील कार्यालयावर मोठा मोर्चा काढून घटनेचा निषेध केला. दहा वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी सामुहिक अत्याचार केल्याची घटना तालुक्यात ता.१८ ऑक्टोबर रोजी घडली. सर्वप्रथम 'सकाळ'ने ही घटना उघडकीस आणल्यानंतर घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलसांनी आरोपीवर पोक्सा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला.
या सामुहिक अत्याचाराच्या घटनेचा सर्वस्तरातून तीव्र निषेध होत आहे. विविध संघटना आता आक्रमक झाल्या आहेत. आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी धनगर सकल समाज, जिजाऊ ब्रिगेड, शाहु कामगार संघटनांच्या वतीने सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चास सुरवात झाली. महात्मा फुले चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, आझाद चौकमार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. पीडितेला न्याय द्या, महिलावरील अत्याचार थांबवा, महिलांना संरक्षण द्या, आरोपीवर कठोर कार्यवाही करा अशा आशयाचे फलक घेऊन महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या.
तहसील कार्यालयावर निघालेल्या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी अनेक महिलांनी या सामूहिक अत्याचाराच्या घटनेचा आपल्या भाषणातून तीव्र शब्दात निषेध केला. नऊ वर्षांची मुलगी श्रीदुर्गा लांडगे हिने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यानंतर प्रभारी तहसीलदार रोहन काळे यांना निवेदन देण्यात आले. तीनही आरोपींवर पोक्सा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून जलदगती न्यायालयात हे प्रकरण चालवून पीडितेला न्याय द्यावा, तिचे आर्थिक व मानसिक पुनर्वसन करावे, पीडित कुटुंबाला पोलिस संरक्षण द्यावे, आदी मागण्या तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.
यावेळी उमाकांत लांडगे, गणेश सोनटक्के, प्रकाश घोडके, रवीकिरण बनसोडे, आसिफ मुल्ला, डॉ.श्रृती सोनटक्के, कालिंदा घोडके, पौर्णिमा लांडगे, स्वाती जाधव, तानाजी गायकवाड, विष्णू वाघमारे, तिम्मा माने, महादेव वाघमारे, रब्बानी नळेगावकर, अशिष पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. दरम्यान, कोरोना संसर्गामुळे आंदोलन, मोर्चे काढू नका, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस पोलिस प्रशासनाने मोर्चा आयोजकांना आदल्या दिवशी बजावली होती. मात्र आयोजकांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. मुरूम, उमरगा येथील पोलिस कुमक मागविण्यात आली होती. शिवाय उस्मानाबाद येथील दंगल नियंत्रण पथकालाही पाचारण केले होते. सायंकाळपर्यंत आयोजकांवर कारवाई करण्यात आली नव्हती.
संपादन - गणेश पिटेकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.