Umaraga: ग्रामीण भागातुन शहरात कामांनिमित्त आलेल्या तीन महिलांना वेगवेगळ्या दिवशी भूरळ घालत बनावट सोन्याचे बिस्कीट देऊन अंगावरील सोन्याचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा शुक्रवारी (ता.२६) पर्दापाश झाला आहे. दरम्यान एक महिन्यापूर्वी फसवणूक केलेला चोरटा शहरातील आरोग्यनगरीत दिसून आल्यानंतर एका महिलेने त्याला ओळखले आणि जाब विचारण्यास सुरवात केली, चोरी उघडकीस आल्याने धूम ठोकणाऱ्या "त्या" चोरट्याला आजुबाजुच्या लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले.
या बाबतची प्राथमिक माहिती अशी की, त्रिकोळी येथील अनिता शिवाजी हासूरे या महिलेस साधारणतः एक महिन्यापूर्वी का तरूणाने रस्त्यावर भूरळ घालुन नाक, कानातील दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने काढून घेत, त्याबदल्यात बनावट सोन्याचे बिस्कीट दिले.
दरम्यान अनिता या शुक्रवारी दुपारी दवाखान्याच्या कामानिमित्त शहरात आल्यानंतर विठ्ठल ग्यानबा जाधव वय ३० रा. सलगरा (ता. जि.लातूर) हा चोरटा आरोग्यनगरीत दिसुन आल्याने अनिताने त्याला सोन्याच्या दागिन्यासंदर्भात जाब विचारत असताना, घेतलेले दागिने परत देण्याची बतावणी करुन निसटून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र आरडाओरड झाल्याने चोरटा तरुणांच्या हाती लागला.
उमरगा बाजार समितीचे सभापती रणधीर पवार, युवा सेनेचे विधानसभा अध्यक्ष शरद पवार व अन्य तरुणांनी त्या चोरट्याला दणकावुन विचारल्यानंतर चोरीची कबुली दिली. अनिताच्या बाबतीत झालेल्या प्रकारा दिवशीच मंदाबाई कदम रा. मानेगोपाळ यांचेही चोरट्यांनी दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने लंपास केले होते. शुक्रवारी कोरेगाववाडी येथील शांताबाई बाचके या सरकारी दवाखान्यासाठी आल्या होत्या.
इंदिरा चौकात टमटमने गावाकडे जाण्यासाठी थांबल्या असता, चोरट्यांच्या टोळीतील दोघांनी रस्त्यावर कांहीतरी वस्तु पडल्याचा बहाणा करून त्या महिलेला दोन बनावट सोन्याचे बिस्किटे देत दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने घेतले.
सराफाकडे गेल्यानंतर मात्र आपली फसवणूक झाल्याने हताश होऊन ती महिला गावाकडे गेली होती, चोरटा हाती लागल्याचे कळताच पोलिस ठाण्यात येऊन सर्व हकीगत सांगितली. या प्रकरणी दोन महिलांच्या तक्रारीनुसार रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत भराटे यांनी सांगितले.
----
पाच, सहा चोरट्यांच्या टोळी कार्यरत !
उमरगा शहरात इंदिरा चौकात अकरा महिन्यापूर्वी प्रा. अच्युतराव जगताप यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे लॉकेट व अंगठी पोलिस असल्याचा बहाणा करून भरदिवसा लुटले होते. तीन महिलांना गंडविणाऱ्या टोळीतील व्यक्तीने प्रा. जगताप यांना लुटले आहेत का ? याची माहिती पोलिस घेत आहेत. शुक्रवारी घडलेल्या प्रकारानंतर या टोळीकडे एक कार असल्याची माहिती सांगण्यात येत असून पोलिसांच्या ताब्यात असलेल्या चोरट्यांने अन्य साथीदारांचेही नाव सांगितले आहेत. दरम्यान चोरी केलेले सोन्याचे दागिने उमरगा व लातुर येथे विकले की, अन्य ठिकाणी याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.