नांदेड - नांदेडचे नगराध्यक्ष ते गृहमंत्रीपदापर्यंत कार्यभार यशस्वीरित्या सांभाळलेल्या डॉ. शंकरराव चव्हाण यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. ता. १४ जुलै १९२० हा त्यांचा जन्मदिवस. त्यामुळे ता. १५ जुलै १९१९ ते १४ जुलै २०२० पर्यंत त्यांचे जन्मशताब्दी वर्ष असून त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच मुख्यमंत्री, गृहमंत्रीपदापर्यंत काम केलेल्या डॉ. शंकरराव चव्हाण हे राज्यसभा, लोकसभा, विधान परिषद आणि विधानसभा अशा केंद्र आणि राज्यातील चारही प्रतिनिधीगृहांचे सन्माननीय सभासद राहिलेले होते. राज्याच्या जडणघडणीत त्यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. थोर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या शंकरराव चव्हाण यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. कर्तव्यनिष्ठ, लोकाभिमुख, निष्कलंक चारित्र्य असलेले, दूरदृष्टी आणि विचार यांचा समन्वय साधणारे आणि घेतलेल्या कामात पूर्ण झोकून देऊन काम करणे हे त्यांचे वैशिष्ट होते.
हेही वाचा - नांदेडमध्ये २५ हजार कर्जखाते ‘निराधार’
अनेक कामे लागली मार्गी
डॉ. शंकरराव चव्हाण यांचा ‘जलसंस्कृतीचे जनक’ असा गौरवपूर्ण उल्लेख होतो. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही त्यांची घोषणा बोधवाक्य ठरली. अनेक प्रकल्पांच्या पूर्णतेसाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न केल्यामुळे त्यांचे नाव ‘आधुनिक भगीरथ’ म्हणून घेण्यात येते. तसेच सचिवालयाचे ‘मंत्रालय’ असे नामकरण शंकरराव चव्हाण यांच्याच कारकिर्दित झाले. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राची भरीव प्रगती झाल्यामुळे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने शासन निर्णय घेण्यात आला असून उपसचिव ज. जि. वळवी यांनी ता. २२ जानेवारी रोजी आदेश काढले आहेत.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यासाठी संबंधित प्रशासकीय विभागांनी विविध कार्यक्रम हाती घेण्याचे प्रस्तावित केले आहे. माहिती व जनसंपर्क संचालनालयातर्फे डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संदर्भग्रंथ प्रकाशित करण्यात येणार आहे तसेच लोकराज्य विशेषांक काढण्यात येणार आहे. ग्रामविकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नांदेडला शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाजवळ शंकरराव चव्हाण यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे नांदेडला ग्रंथालय, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन केंद्र त्याचबरोबर मुला - मुलींचे वसतीगृह उभारण्यात येणार आहे. गृह विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे भोकर (जि. नांदेड) येथे राज्य मंत्रीमंडळाने २००९-१० मध्ये दिलेल्या मान्यतेनुसार पोलिस प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जलसंपदा, जलसंधारण आणि पाणीपुरवठा क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या नावे जलभूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
हेही वाचलेच पाहिजे - कारभारणींच्या हाती ग्रामविकासाचे नवनिर्माण
कार्याला मिळणार उजाळा
डॉ. शंकरराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष हे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरे करुन त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात येणार आहे. त्यांच्या जलक्रांती विषयक विचारांना चालना देऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त करुन पाण्याने समृद्ध करण्यात यावा. त्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यासाठी त्यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी जन्मशताब्दी वर्षात विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीबाबत वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आढावा बैठक घेणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.