- प्रफुल्ल वानखेडे
कोविडमध्ये (covid) त्याचे कंबरडे मोडले. मोठे संकट आले. त्याच्या कंपनीने खर्चकपात म्हणून बऱ्याच लोकांसोबत यालाही कामावरून काढले. हा अक्षरश: मेटाकुटीला आला. मुलांची फी, गावचा खर्च, इथला घरखर्च हे सर्व कसेबसे चालवले. बरं, लाजेमुळे गावालाही जाता येत नव्हते. नातेवाईकांनाही काहीच सांगू शकत नव्हता.... (covid sitiation financial crisis article)
माझे दोन लहानपणीचे मित्र आहेत. एक आयटीआय करून खासगी कंपनीत मेंटेनन्स डिपार्टमेण्टमध्ये कामाला आहे आणि दुसरा इंजिनिअर आहे, तोही चांगल्या कंपनीत कार्यरत आहेत.
पहिला गरीब घरातून आलेला. आई-वडील निरक्षर, मोलमजुरी करणारे. त्याने लग्न जरा लवकरच, पण साधेपणानं ‘कोर्ट मॅरेज’ केलं. सासऱ्याने मात्र आनंदाने मुलीच्या लग्नाचा खर्च जो वाचला तो मुलीच्याच नावाने बॅंकेत टाकला. त्यामुळे भरपूर पैशांची बचत झाली. तसेच याच्याकडेही बऱ्यापैकी पैसे शिल्लक होते.
हा एकदम निर्व्यसनी, नवरा-बायकोने मिळून एका विचाराने तेव्हा गावाकडे २००२-०३ च्या सुमारास त्या पैशातून बऱ्यापैकी शेतजमीन विकत घेतली. जुन्या घराची डागडुजी करून आई-वडिलांसोबत गावीच राहिला. पुढे शेतात मात्र यांनी खूप चांगले प्रयोग केले. हळद, ऊस, इतर नगदी पिके, त्यात बरीचशी आंतरपिके तसेच सरकारच्या योजनेतून विहीर, आता हल्ली सोलारपंपही लावलाय.
पत्नी शिकलेली असल्याने बॅंकेचे व्यवहार ती चांगले सांभाळायची. तिनेही हातभार लावला. लोन घेऊन शेतातच गोठा उभारला. १२-१५ गायी पाळून दुधाचाही चांगला जम बसलाय. पुढे काही वर्षांत शेती अन् पूरक व्यवसायात बऱ्यापैकी पैसे गुंतवले. आई-वडिलांची साथ आहेच.
मुलांचे शिक्षणही चांगले सुरू आहे. कंपनीतील पगार आणि हे बऱ्यापैकी चांगले उत्पन्न तरीही कायम लो-प्रोफाईल जगणे यामुळे त्याचे खर्च कमी असतात. तो अत्यंत साधा दिसतो, वागतो.
अगदी बऱ्याचदा कंपनीतल्या जुन्या निळ्या शर्टमध्येच गावभर फिरत असतो. १५ वर्षं जुन्या मोटारसायकलवर; पण आज तो पूर्णपणे ‘आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र’ आहे.
आता दुसरा इंजिनिअर... त्याने शिक्षणानंतर पुण्यात नोकरी धरली. पुढे स्विच आणि जास्त पगाराच्या अपेक्षेने काही दिवस पंजाब, पुन्हा मुंबई आणि शेवटी रीतीनुसार सर्वांसारखे पुण्यात येऊन बस्तान बसविले. हे सर्व करता करता २००८-०९ साल उजाडले. तो इंजिनिअर, त्यामुळे लग्नही फार जोरात, खर्चिक झाले. दोन्ही बाजूंनी भव्य कार्य पार पडले. अगदी तीन-चार आमदार, सात-आठ नगरसेवक आणि पाचएक हजार माणसांच्या उपस्थितीत ते लग्न धूमधडाक्यात पार पडले. खर्च इतका झाला की याला तर हनिमूनला जायला पर्सनल लोनच काढायला लागले. पुढे, पहिल्या मुलाचा नामकरण सोहळा असो, गावाकडे टोलेजंग घर बांधणे असो, वास्तुशांती किंवा पूजा असो. सर्व कार्यक्रम जंगीच. जेवणाचा मेन्यूही एकदम भारी.
तो मित्र, नेहमीच ब्रांडेड कपडे, घड्याळे आणि चकचकीत राहतो. मस्त मोठी कारही घेतलीये. गावी आला की राजकारणावर, समाजकारणावर, शेती, गावाकडच्या शिक्षणाच्या दर्जावर टोमणे मारून जायला मात्र विसरत नाही. एक गोष्ट नक्की चांगली ती म्हणजे तो दरमहा आई-वडिलांना पैसे पाठवितो. त्याची मुलं पुण्याच्या चांगल्या शाळेत शिकायला आहेत. तोही आनंदी जीवन जगतो आहे, असेच वाटते; पण गावाकडचा बंगला आणि या सर्व कौटुंबिक (दिखावा) कार्यक्रमावरील सतत येणारा खर्च तसेच आता मुलांचे शिक्षण त्यामुळे त्याला घरखरेदी किंवा इतर गुंतवणूक करायला जमली नाही.
गेल्या वर्षी शेतीचा एखाद एकर तुकडा विकून पुण्यात चांगला तीन बेडरूमचा फ्लॅट घ्यायचा विचार सुरू केला होता. सध्या तो पत्नी व मुलांसह पुण्यात चांगल्या सोसायटीत भाड्याने राहतो. बाजूचा रिकामा फ्लॅटही घरमालकाचा असल्याने तोही हा थोडाफार वापरतो. या कोविडमध्ये मात्र याचे कंबरडेच मोडले. मोठे संकट आले. त्याच्या कंपनीने खर्चकपात म्हणून बऱ्याच लोकांना कमी केले. यात यालाही अचानक कामावरून काढले. हा अक्षरश: मेटाकुटीला आला. मुलांची फी, गावचा खर्च, इथला घरखर्च हे सर्व कसेबसे चालवले. बरं, लाजेमुळे गावालाही जाता येत नव्हते. नातेवाईकांनाही काहीच सांगू शकत नव्हता. नोकरी गेली हे कळले असते, तरी इभ्रतीचा पंचनामा आणि कित्येकाच्या घरी दिवाळी साजरी झाली असती, असे याला वाटायचे. मित्रांनी या दरम्यान थोडीफार मदत केली. काही उधाऱ्या झाल्या; पण चांगली बाब म्हणजे आता दोन महिन्यांपूर्वी त्याला दुसरा जॅाब मिळालाय. त्यामुळे तो थोडा सावरतोय; पण खरे उपकार झाले त्याच्या घरमालकाचे. त्यांनी या काळात संपूर्ण सात-आठ महिन्यांचे भाडे माफ केले. (जवळपास २ ते २.५ लाख रुपये) घरमालक याच्यासाठी ‘देवमाणूस’ ठरला; नाही तर याला बाहेर काढले असते, तर याची सगळीकडे प्रतिष्ठा गेली असती.
आता गंमत अशी, की तो ज्या भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमधे राहतो, तो माझ्या आयटीआय झालेल्या मित्राचा आहे. हो, त्याचा तो ‘देवमाणूस’, मोठ्या मनाचा, गर्भश्रीमंत, घरमालक माझा दुसरा मित्र आहे. तुम्ही श्रीमंत असणे आणि श्रीमंत असल्याचे जगाला दाखविणे यामधला फरक ओळखा.
शिक्षण आणि आर्थिकसाक्षरता या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या. चांगल्या शिक्षणासोबत भपका टाळायचे संस्कार रुजायला हवेत.
पैशांच्या योग्य नियोजनाचे महत्त्व ओळखा. आजमितीस जगात सर्वश्रेष्ठ काय असेल, तर ते आहे व्यवहारज्ञान आणि साधेपणा. योग्य वेळी केलेली पैशाची बचत, योग्य ठिकाणी केलेली पैशांची गुंतवणूक आपल्याला आयुष्यभराचे सुख आणि आनंद देते. क्षणिक सुख आणि भपका टाळा. आयुष्यभर आनंदी राहा. पैशांची बचत सुरू करा.
prafulla@kelvinsgroup.com
(लेखक हे प्रख्यात केल्विन आणि लिक्विगॅस या औष्णिक ऊर्जा क्षेत्रात काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.