२०१४ नंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सलग दोन निवडणुका पूर्ण बहुमताने जिंकून दहा वर्षे बिगर कॉंग्रेसी पंतप्रधान म्हणून सत्तेवर राहण्याचा मान त्यांच्याकडे जातो. हे जरी खरे असले तरी मोदी आणि त्यांचा पक्ष हा उजव्या विचारांचा समजला जातो. मुळात उजवा आणि डावा या दोन्ही विचारात झालेली वैचारिक विभागणी या देशाला काही नवीन नाही. ज्याला आपण डावा म्हणतो तो विचार हा पश्चिमेचा आहे. १९४६ मधे झालेला भारताच्या विकासाचे आर्थिक मॉडेल काय असावे यावरून गांधी आणि नेहरू यांच्यात झालेला वाद प्रसिद्ध आहे. नेहरू काळात स्वीकारलेले आर्थिक विकासाचे मॉडेल हे पश्चिमेचे होते. त्यावेळी गांधीजी म्हणाले होते; I would say if the village perishes, India will perish too.It will be no more India.
ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या व्यवस्था नष्ट करून नव्याने व्यवस्थांची निर्मिती करण्याचे आव्हान खरेतर स्वीकारणे अपेक्षित होते. मात्र आपण आहे त्या व्यवस्था पुढे नेल्या. मग व्यवस्था समाजवादी असो की भांडवलवादी. दोन्ही संकल्पना या युरोपच्याच. मग प्रश्न असा आहे की उजव्या समजल्या जाणाऱ्या संघ, भाजप तत्सम पक्षांचा उजवा विचार नेमका कोणत्या आर्थिक विकासाच्या मॉडेलवर आधारलेला आहे? तर तो देखील पश्चिमेच्याच आर्थिक मॉडेलची परिणती आहे. भाजपचा किंवा संघाचा काही एक म्हणून स्वतंत्र आर्थिक विचार आहे का? तर नाही. मग देशच्या व्यवस्थेचे प्रतिबिंब असलेला स्वतंत्र आर्थिक विचार अजून तरी आपल्याला आणि अन्य जगाला निर्माण करता आलेला नाही. संपूर्ण जग हेच या दोन विचारधारेत आणि आर्थिक विकासाच्या प्रारुपात विभागले गेले आहे. या दोन विचारांच्या पलीकडे एका नवीन विचाराचे वा व्यवस्थेचे सृजन होऊ शकते का?
आंबेडकरवाद आणि हिंदुत्ववाद या राजकीय विचारधारा म्हणून मान्य केल्या तरी त्यांना देखील स्वतंत्र आर्थिक विचार देता आलेला नाही. या प्रश्नांच्या शोधात आपल्याला या देशात ब्रिटीश येण्यापूर्वी भारतात नेमक्या काय व्यवस्था होत्या? हे बघणे क्रमप्राप्त आहे.
शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, महसूल, भांडवल, उद्योग, शेती या बाबत कोणत्या व्यवस्था समाज म्हणून आपण स्वीकारल्या होत्या या प्रश्नांची उत्तरे अभ्यासकांना तपासावी लागतील. साऱ्याच युरोपीय देशांना जर भारतात जावे असे वाटत होते, ब्रिटीश आणि फ्रेंच या देशावरच्या अधिपत्यावरून लढत होते याचा अर्थ हा देश सामाजिक दृष्ट्या स्थिर आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न होता हे स्पष्ट आहे. गरीबाच्या झोपडीचे दार लावले काय अन न लावले काय. चोरी होण्याची संभावना शून्य.
शिक्षण आणि विज्ञानाच्या बाबत जी मिथके आपल्या डोक्यात पक्की आहे तो या देशातील वसाहतवादी शिक्षणाचा परिणाम आहे. स्वतःला लेफ्ट लिबरल समजणाऱ्या मंडळींचे ब्रिटीशपूर्व भारताचे आकलन कमी पडते. मार्क्स आणि एंजल्सच्या प्रकाशात सारे बघण्याच्या नादात आपण अत्यंत मुलभूत व्यवस्थांकडे दुर्लक्ष करीत आलेलो आहोत. या देशात ब्रिटीश आले नसते तर अज्ञान आणि अंध:कारात हा देश कुठेतरी चाचपडत राहिला असता, आधुनिक तंत्रज्ञानाशी आमची ओळखच झाली नसती, ही मांडणीच चुकीच्या पायावर उभी आहे.
भारत शोधायचा तर आपण सरळ तक्षशीला आणि नालंदा यांची उदाहरणे देतो. परंतु प्राचीन भारताकडे न जाता अठराव्या शतकातील विज्ञान, शिक्षण,उद्योग याकडे बघितले पाहिजे. हे स्पष्ट आहे की ब्रिटिशांनी या देशातील व्यवस्था पद्धतशीरपणे नष्ट केली. अमेरिकन अर्थतज्ञ Angus Madison ने जगातल्या काही महत्वाच्या अर्थव्यवस्थांचा अभ्यास करून सांगितले की जगाच्या एकूण उत्पादनाच्या साधारण ६०% उत्पादन केवळ भारत आणि चीन हे दोन देश करीत होते.
भारताचा जीडीपी हा २३ टक्यांच्या आसपास होता. ब्रिटीशांच्या लुटीनंतर हा उत्पादन दर १% च्या खाली गेला. हा सारा परिणाम येथील उत्पादन क्षमता नष्ट करून ब्रिटीशांनी त्यांची उत्पादन क्षमता वाढवली. गांधीनी खादी वापरण्याचा आग्रह धरला. केवळ त्या आग्रहाने देशात खादीचे प्रचंड उत्पादन वाढले. त्याकाळी देशाने वर्षाकाठी ६० कोटी रुपयांची बचत केली. अर्थात हा पैसा स्थानिक कामगारांना आणि कारागिरांना मिळाला. खेड्याकडे चला असे गांधी म्हणतात त्यामागे त्यांची निश्चित काय भूमिका होती याचा मुळातून अभ्यास होण्याची गरज आहे.
ब्रिटिशांनी केवळ या देशाची लूटच केली नाही तर येथील परंपरागत व्यवस्था नष्ट केल्या. नौका बांधणी हा येथील फार मोठा उद्योग होता,मात्र भारतीय मजबूत जहाजांपुढे ब्रिटीश जहाजांचा टिकाव लागणार नाही या कारणाने येथील नौका बांधणी उद्योग ब्रिटिशांनी नष्ट केला. पाण्यापासून बचाव करणाऱ्या नौका बांधण्याचे तंत्र येथील लोकांना अवगत होते. मलबार ,विशाखापटनम येथील नौका बांधणीचे मोठे उद्योग ब्रिटिशांनी नष्ट केले. अठराव्या शतकातील आपल्या देशाच्या व्यवस्थेचा शोध आपल्याला घ्यावाच लागेल.. ती व्यवस्था ना डावी होती ना उजवी. पुढील लेखात याच संदर्भातील आपल्या व्यवस्थांचा शोध घेण्याचा प्रयत्न करू या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.