सीमेवरील शौर्याचा सन्मान करूया...

INDIACHINA
INDIACHINA
Updated on

भारत-चीन सीमेवर तब्बल चाळीस बेचाळीस वर्षांनंतर रक्त सांडले. चीनकडून मे महिन्यापासून सीमेवर जाणीवपूर्वक तणाव निर्माण करण्यात येत होता. त्याची परिणती गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्‍चक्रीत आपले वीस जवान मारले जाण्यात झाली. भारतीय सैन्याला असल्या संकटांचा मुकाबला नेहमीच करावा लागला आहे. गेले सत्तर वर्षे आपली पश्‍चिम सीमा सतत धुमसत असतेच. पण, त्या सीमेवर तुलेनेने कमकुवत असलेल्या शत्रूच्या विरुद्ध लढताना भारताचा नेहमीच वरचष्मा राहिला आहे.

यावेळी हा संघर्ष चीनसोबत आहे. 1962 आठवले की भारताचा झालेला मानभंग, जीवितहानी आणि 32,000 वर्ग फूट जमिनीचा आपण गमावलेला भाग सारे डोळ्यांसमोरून तरळून जाते. ती आपली भळभळती जखम आहे. तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल नेहरूंना नॉर्थ इस्ट फ्रंटीयरवर लक्ष देण्याची, त्या भागात आपल्या चौक्‍या, दळणवळणाची साधने वाढविण्यासाठी वारंवार पत्रे लिहून सूचना करीत होते. त्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले. एक नक्की की आज 1962 नाही आणि त्यावेळेची सेनादेखील नाही. मधल्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले.

जगातल्या सगळ्यात बलाढ्य सैन्यामध्ये भारतीय सैन्याची गणना होते. आपले सैन्य लढते ते त्याच्या मनोधैर्यावर. चीनच्या सीमेवर जे वीस जवान धारातीर्थी पडले. त्यातील कमांडिंग अधिकारी संतोष बाबूचे पार्थिव घरी आणल्यावर प्रतिक्रिया देताना त्या वीरपुत्राची माता म्हणते, माझा मुलगा जरी मी आज गमावला असला तरी मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. कारण त्याने देशासाठी बलिदान दिले.

कुठून येत असेल ही ऊर्जा? काय आहेत या भावनेच्या प्रेरणा आणि ते ही अशा देशात जिथे नेतेमंडळी soldiers are paid to die म्हणायलादेखील कचरत नाहीत. आणखी एक जवान. बिहारचा कुंदन कुमार. घरात अठराविश्वे दारिद्य्र. फारच तोकडी शेती. वडील निरक्षर आणि सामान्य शेतकरी. आपल्या मुलाच्या हौतात्म्यावर म्हणाले, माझा मुलगा गेला. त्याने देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले. हरकत नाही. मला दोन नातू आहेत. त्यांना पण सैन्यात पाठविण्याची माझी तयारी आहे.
अरे ही कसल्या काळजाची माणसे आहेत? ना यांनी सरकारच्या नावे शिवीगाळ केली, ना त्यांनी चिनी सैनिक मारले गेल्याचे पुरावे मागितले. या देशाचा सामान्य माणूसच या देशाचा रक्षणकर्ता आहे. या देशातल्या सामान्य माणसानेच इतिहास निर्माण केला आहे.
ही भूमी वीरप्रसवा आहे. शक, कुशाण आणि हुनांचा पराभव करणाऱ्या सम्राट विक्रमादित्यापासून तर छत्रपती शिवरायापर्यंत आणि हरिहर बुक्कपासून तर लचीत बडफुकनपर्यंत योद्‌ध्यांनी आपल्या बाहुबलावर हा देश टिकवला आहे. ही कोण माणसे होती? ती होती तुमच्या आमच्या सारखी सामान्य माणसे.

पंचा नेसलेला तो म्हातारा बाहेर पडायचा आणि लक्षावधी जनता वेड्यासारखी त्या सर्वसामान्य चेहऱ्याच्या म्हाताऱ्याच्या मागे वेड्यासारखी चालत जायची. भूमिहीन माणसाला कसायला किमान जमीन मिळाली पाहिजे आणि श्रीमंतांनी ती दिली पाहिजे असे विनोबांनी आवाहन करण्याचा अवकाश; हजारो एकर भूमी लोकांनी दान केली. देशातील वंचित, भूमिहीन आणि दलित माणसाला भूमी मिळाली. त्यांच्या एका शब्दावर सद्भावना उमटायची. एकीकडे या देशासाठी अतुल्य त्याग करणारी माणसे आणि याउलट उंच इमारतींमध्ये बसून आपल्याच सैनिकांच्या शौर्यावर संशय घेणारेदेखील या देशाने बघितले आहे.

समोरच्या संगणकावर काहीतरी खरडायचा अवकाश. आपणच निर्माण केलेल्या झुंडी आणि छावण्या लगोलग सरसावतात. सरकारला जाब विचारलाच पाहिजे. तो आमचा अधिकारच आहे. बापूंनी या देशाला सांगून ठेवले आहेच. सरकार चुकत असेल तर प्रतिकार करा, पण ते सरकार आपले आहे याचे भान कायम ठेवा. पण, आम्हाला प्रश्न उपस्थित करण्याची घाई किती? आपल्याकडे अजून पूर्ण माहिती नसताना, आपल्या मागील शंभर पिढ्या त्या गलवानमध्ये गेलेल्या नसताना; केवळ तर्काच्या आधारावर आसूड ओढणे? माझ्याकडे आधी माहिती आली, मला इतरांपेक्षा वेगळे माहीत आहे, आमच्याच वाहिनीला हे आधी कळले. धत! लेकांनो. हे जगाला सांगायच्या नादात आम्ही काय करतोय याचे भानदेखील उरलेले नाही.

कुणीतरी माध्यमांवर नुकतेच बोलले की; पुढील काही वर्षे इलेक्‍ट्रॉनिक वाहिन्या आणि त्यावरील पत्रकारांना बंदी घातली तरी देशाला आणि जनतेला फार काही फरक पडणार नाही. सरकार चुकले असेल तर त्याला उत्तर द्यावेच लागेल. बुरखे धारण केले असतील तर जनताच ते टराटरा फाडेल. समाज धीरुभाई अंबानीची पुण्यतिथी लक्षात ठेवत नसतो. रिलायन्स समूहाकडून जाहिराती देऊन समाजाला आठवण करून द्यावी लागते. हा समाज त्या माणसांना लक्षात ठेवतो ज्यांनी देशासाठी अतुल्य बलिदान दिले. आज ती माणसे कुठे गेली असे विचारण्याच्या काळात सीमेवरील शौर्य ठसठशीतपणे समोर येतं. किमान त्याचा सन्मान करूया...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.