कळतं पण वळतं नाही हे आपण नेहमी म्हणत असतो. कधी ही बाब आपण इतरांसाठी हमखास वापरतो तर कधी ती आपल्यावरच शोभून दिसते हे ही आपण ओळखून असतो. असाच, सगळं कळत असूनही वळवून न घेणारा महाभारतातला एक योद्धा म्हणजे कर्ण. अर्जुनाचा आंजलिक बाण कर्णाच्या कंठात घुसला आणि कर्णाचा अध्याय तिथे समाप्त झाला. आजतागायत कर्णाविषयी आपल्यापैकी अनेकांनी अनेक गोष्टी वाचल्या, ऐकल्या आणि सांगितल्याही. पण आज आपण कर्णाच्या व्यक्तिमत्वाचा व्यवस्थापनाच्या दृष्टीने थोडा विचार करून पाहुयात.
कर्ण युद्ध निपुण होता आणि धर्मनिष्ठही. त्याच्यात सगळे गुण होते आणि काही दुर्गुण सुद्धा. असे म्हणतात ना, की एक दुर्गुण लाख गुणांवर भारी होतो, असेच कर्णाच्या बाबतीत. जास्त न चघळता कर्णाचा दुर्गुण आपण जाणला तर तो एकच की वाईट होत आहे समजत असूनही त्याने मौन पाळले. सांग पाटला काय करू असच काहीस कर्णाच झालं होतं. कर्णाबरोबर खरा व्यापार, व्यवसाय आणि व्यवस्थापन केले ते दुर्योधनाने. द्रोणाचार्यांनी आयोजित केलेल्या युद्धनैपुण्याच्या स्पर्धेची आणि कर्णाच्या हतबलतेची संधी खऱ्या अर्थाने साधली ती दुर्योधनाने. असो तो भाग दुर्योधनाच्या व्यवस्थापनाचा. मात्र, कर्णाच्या योग्यतेला बट्टा लागला तो दुर्योधनाच्या मैत्रीचा आणि त्याहून अधिक त्याने मैत्रीआडून केलेल्या उपकाराचा.
हे कर्णाला माहिती नसावे का, की दुर्योधन काय करतो आहे ? कर्ण विद्वान होता हे कळायला. पण खऱ्या अर्थाने पाहायचे झाले तर त्याची विद्वत्ता दुर्योधनाच्या उपकारापोटी असूनही नसल्यासारखी झाली होती. एखाद्याला मदत करणे आणि नंतर विसरणे हि विद्वत्ता. मात्र समोरचा आपल्या उपयोगाचा असेल तरच त्याला मदत करणे आणि त्याचा पुरेपूर वापर करून घेणे, हा निव्वळ स्वार्थ आणि आपलपोटीपणा. याच आपलपोटीपणाचा कर्ण शिकार झाला. असो, पण म्हणायला हे मात्र नक्की की , कर्ण व्यवस्थापनात चुकला. कोणतेही व्यवस्थापन कधीही कोणत्याही उपकाराखाली होणे शक्य नाहीच. व्यवस्थापन करायचे असेल तर स्वतःचा एक पण असायलाच हवा. सांग पाटला आता काय करू, अशाने स्वतःचे अस्तित्व तर लुप्त होतेच पण कार्यक्षमता सुद्धा खालची पातळी गाठल्या खेरीज राहत नाही हे नक्की.
प्रत्येकालाच नोकरी म्हणा वा नाती कोणाचा तरी मान राखूनच कार्य करायला लागत. मात्र त्याचा मान राखण्याच्या नावाखाली, ती व्यक्ती जे म्हणेल किंवा जस वागवेल ते चालेल , या नियमाने वागल्यास अधोगतीला लागल्याचे निश्चितच समजायला लागेल. खऱ्या अर्थाने सांगायचे म्हणजे, कर्णाचा त्याच्या मित्रा प्रति भाव शुद्ध होता, की त्याने दिलेल्या अधिकाराप्रती ? हा प्रश्न सतत उभा राहतो. फक्त सूतपुत्र हा शब्दाचा बाण चुकविण्यासाठी कर्णाने दुर्योधनाला बिनशर्त पाठिंबा तर दिला नाही ना ? असाही मग विचार चुकीचा ठरू नये. मग जसे कर्ण करून बसला तसे आपण तर करत नाही ना ? याचाही विचार नक्की करायला हवा. फक्त एक पद, एक अधिकार सतत सोबत असावा यासाठी म्हणून आपण चुकीच्या गोष्टींचा स्वीकार तर करत नाही? त्या अधिकाराच्या ओझ्यासाठी आपण आपले अस्तित्व तर नाही ना गमावत आहे , याचा विचार त्या प्रत्येकाने करावा ज्याला स्वतःचा कर्ण करवून नसेल घ्यायचा.
हे मान्य, की अधिकार आणि सन्मान त्यांच्या समवेत कितीतरी जबाबदाऱ्या आणतात. पण त्या नम्रतेने स्वीकारताना त्यांच्या सोबतच आलेल्या कितीतरी गोष्टींच्या पळवाटा आपण बहुदा स्वीकारत असतो. मग याच पळवाटा आपल्याला चुकीच्या मार्गावर नेत नसल्या तरी त्याला दुर्लक्षित करण्याची कला नक्की शिकवून जातात. असे म्हणतात ना , कधीकधी नाही म्हणता येणे देखील व्यवस्थापनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे, ते खरंय कारण इथे आपण आपला दृष्टिकोन मांडू शकता. तेव्हा चुकीची गोष्ट कळत असताना त्याला समोरच्याच्या वा मित्र, अधिकारी, बॉस नातेवाईक इत्यादी पैकी कोणीही असल्यास, त्याच्या लक्षात आणून देणे कधीही चांगले. इथे केलेली नजरअंदाजी पुढे कर्णाच्या मार्गावर आपल्याला नेऊ शकते याची जाणीव नेहमी असल्यास, जे होईल ते व्यवस्थापन नक्कीच काहीतरी चांगलेच. मोठ्या कंपन्यांमध्ये whistle-blower (धोकादर्शक, होणाऱ्या चुका आणि भविष्यातला धोका दाखवून देणारा ) म्हणतात हा त्याचाच काहीसा प्रकार. कर्ण कौतुक करण्यासारखाच होता, पण तोही महाभारत वाचवू शकला असता. बघा पटतंय का ?
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.