जागतिक आणि राष्ट्रीय आव्हान
"कोरोना'मुळे जगातील सर्वच क्षेत्रांत अल्प व दीर्घकालीन असे बदल घडणार आहेत. संसर्ग झालेल्या सर्वच लोकांना काही "कोरोना' होत नाही. यातले काहीच लोक अतिगंभीर होतात आणि त्यांना "आयसीयू'ची गरज लागते. "आयसीयू' उपचार करूनही मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू होतात. यामुळे आज "कोरोना'चा उपचार करणारे आपले सरकारी रुग्णालये अत्यंत गंभीर समस्येला सामोरे जाताना दिसताहेत. "कोरोना'बाधित रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्यावर उपचार करणारे आरोग्य कर्मचारी हे सगळेच मोठ्या मानसिक तणावातून जात आहेत. हे जगात सगळीकडेच घडतंय. हा मानसिक तणाव "कोरोना'सोबत संपणार नाहीय. याचे दूरगामी परिणाम रुग्ण व उपचार करणारे यावर होणार आहेत.
गैर"कोरोना' आरोग्यसेवा
गैर"कोरोना' आरोग्यसेवा संपूर्ण जगभर अक्षरशः ठप्प झालीय. याचे दुष्परिणाम दिसू लागले आहेत. "कोरोना' नसलेल्या लोकांमध्ये मृत्यूचा दर यावर्षी वाढल्याचे अहवाल समोर येताहेत. याचा सरळ अर्थ हा, की "कोरोना'मुळे या रुग्णांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. कॅन्सर, न्यूरोलॉजी, हृदयरोग, डायबेटिस यासंबंधी रुग्णांना जगभर योग्य रीतीने उपचार करण्यास यंत्रणांना अपयश आले आहे. ब्रिटनमध्ये मृत्यूदर गतवर्षाच्या तुलनेत दीडशे टक्के अधिक दिसून येतोय. इटलीमध्ये अधिक वाढलाय. मुख्यत्वे "कोरोना' बळी असले, तरी मोठ्या प्रमाणात गैर"कोरोना' रुग्णदेखील आहेत. भारतासारखे देश मृत्यूच्या कारणांची नोंद ठेवण्याचे काम खूप प्रभावीपणे राबवत नसले, तरी आपल्याकडेही मृत्यूचे प्रमाण बरेच वाढलेले आहे. गैर"कोरोना' आरोग्य यंत्रणा पुन्हा वेगाने कार्यरत करण्यावर सरकारला भर द्यावा लागेल. खासगी तज्ज्ञांना आवश्यक त्या सुविधा पुरवून त्यांचे काम पूर्ववत करणे जनतेच्या फायद्याचे ठरेल. सरकारी रुग्णालयदेखील व्हिडिओ आणि दूरध्वनीद्वारे रुग्णांना सेवा देऊ शकतात.
आरोग्य विषमता वाढेल
जगावर जे आर्थिक संकट येऊन ठेपलेय. त्याने बहुतांश लोकांच्या कमाईवर परिणाम झाला आहे. आजच अनेकांचे उत्पन्न बंद किंवा कमी झाले आहे. याने जगात आर्थिक विषमता तर वाढेलच. पण, यामुळे कमी उत्पन्न असलेल्या असंख्य लोकांना आरोग्य सुविधांचा वापर करणेही अवघड होणार आहे. "कोरोना'चा परिणाम म्हणून आरोग्यसेवा महागण्याची शक्यता आहे. आपल्या देशात गरीब- मध्यमवर्गीय, भटके, अस्थायी लोक, मजूर, आदिवासी, महिला, बालक व अल्पसंख्याक यांवर विशेष लक्ष केंद्रित करून योजना आखणे गरजेचे आहे.
मुलांचे शोषण होण्याचा धोका
शाळा- महाविद्यालये बंद असल्याने समाजातला हा एक कमजोर घटक अनेक ठिकाणी शोषण करणाऱ्या कंटकांच्या तावडीत सापडलेला आहे. "लॉकडाउन' व मदत मिळण्याची शक्यता नसल्याने त्यांचे शोषण होण्याची शक्यता अजूनच जास्त आहे. बालकांच्या मानसिक, शारीरिक व लैंगिक शोषणाचे भरून न निघणारे दूरगामी दुष्परिणाम त्यांच्या जीवनावर आणि पर्यायाने देशावर होणार आहेत. मुलांप्रमाणेच महिलांचेही शारीरिक व मानसिक शोषण या काळात प्रचंड होत आहे. "लॉकडाउन'दरम्यान माता व बालकांचे जे हाल दिसले, ते चित्र अनेक महिने किंवा काही वर्षे दिसणार आहे. भावी पिढीच्या रक्षणासाठी वेळीच उपाययोजना न झाल्यास देशाला गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल.
"लॉकडाउन'चा दुष्परिणाम असाही
समाजात नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेली सहाय्यतेची यंत्रणा (सपोर्ट स्ट्रक्चर) "लॉकडाउन'मुळे पूर्णपणे कोलमडून पडली आहे. यामुळे अनेकांचे आजार वाढले आणि मृत्यूही वाढले. एरवी लोक एकमेकांना मदत करून संकटात असलेल्यांना मदत करतात. ते "कोरोना'काळात खूप कमी झाले आहे. त्यातल्या त्यात डॉक्टर मंडळीच "कोरोना'ने धास्तावलेली असल्याने आणि त्यांनीही अंशतः "लॉकडाउन' व "फिजिकल डिस्टन्सिंग' पाळल्याने गरजू रुग्णांचे अधिकच हाल होत आहेत. अशा लोकांमध्ये यापुढेही आजार वाढतील व मृत्यूचे प्रमाणही वाढणार आहे.
इंफोडेमिक
प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियाने जगभर लोकांना "कोरोना'विषयी जागे केले खरे; पण जगभर माहिती व अफवांचा जो भडिमार झाला ("डब्ल्यूएचओ'च्या भाषेत इंफोडेमिक) त्याने समाजात खूप तणाव व अंधश्रद्धाही निर्माण केल्या. "कोरोना'च्या उगमापासून ते त्याला नष्ट करण्याच्या तंत्रापर्यंत सर्वच बाबींवर अनेक तर्कवितर्क, अफवा पसरविण्यात सोशल मीडिया व्यस्त आहे. याबाबतीत वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी पुढे येऊन लोकांमधील गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. ज्योतिष व धर्माचे तथाकथित रक्षक सुरवातीला अनेक मनोरंजक कल्पना घेऊन समोर आले खरे; पण सुदैवाने त्यांचे ग्रह सध्या अंधारात लपलेले दिसताहेत. "कोरोना'मध्ये कुठलाही पुरावा नसलेली औषधे आज प्रचार करून वाटली व विकली जाताहेत.
"लॉकडाउन'मुक्ती, दुसऱ्या लाटेचा धोका!
"कोरोना'मधून बाहेर पडण्यासाठी "लॉकडाउन' टप्प्याटप्प्याने शिथिल करून जनजीवन पुन्हा सुरळीत करण्याचा संपूर्ण जगात आता प्रयत्न होत आहे. "लॉकडाउन'मुक्ती आणि "कोरोना'मुक्तीच्या आधी प्रत्येक देशाच्या सरकारने संसर्गाचा प्रसार कमी असल्याची खात्री करणे गरजेचे आहे. याशिवाय, आरोग्य यंत्रणा "कोरोना'च्या आणि गैर"कोरोना' आजारांच्या उपचारासाठी सक्षम आहे, याचा विश्वास असणेही तितकेच आवश्यक आहे. "स्पॅनिश फ्लू'मध्ये एका शतकापूर्वी दुसरी व तिसरी लाटदेखील आली होती. यात दुसऱ्या लाटेने सर्वाधिक बळी घेतल्याचे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे "लॉकडाउन' शिथिल करताना या गोष्टीचे भान सरकार, प्रशासन व जनतेला ठेवणे गरजेचे आहे. दुसरी लाट खूप मोठ्या प्रमाणावर आल्यास अजून मोठ्या संख्येने गरीब लोकच यात बळी जातील, हे निश्चित. यंत्रणांची सुसज्जता ठेवणे याला पर्याय नाही.
ही व्यसनमुक्तीची वेळ नाही
एकंदरीत व्यसनी लोकांकडे हेटाळणीपूर्वक पाहण्याचा दृष्टिकोन समाजात दिसतो. अनेकांना "लॉकडाउन' ही व्यसनमुक्तीची संधी आहे आणि दारू वगैरे बंदच ठेवा, असेही वाटते. व्यसनमुक्ती हा तसा सोपा मुद्दा नाही. व्यसन असलेल्यांना अशा काळात दुहेरी समस्यांचा सामना करावा लागतो. दारू-विडीचा सतत पुरवठा नसेल, तर त्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडून गंभीर समस्या उद्भवतात. दारू अचानक बंद करणे, ही एक "मेडिकल इमर्जन्सी' होऊ शकते, हे "लॉकडाउन' करताना सरकारनेही ध्यानात घेतलेले नाही. दारूची दुकाने उघडल्यावर उद्भवलेला सगळा नजारा पाहिला असेल. म्हणून अशा लोकांची हेटाळणी करून चालणार नाही. आगामी काळात व्यसनी लोकांच्या आरोग्य समस्या, मानसिक आजार, घरगुती हिंसाचार अशा समस्या वाढलेल्या दिसून येतील. त्यादृष्टीने सरकारी यंत्रणा सज्ज कराव्या लागणार आहेत.
"धरलं तर चावतो, सोडलं तर पळतो'
महाराष्ट्र राज्य हे "कोरोना'च्या प्रसारात सर्वांत जास्त धोक्यात असल्याने आपल्याकडे सर्वच यंत्रणांवर सध्या ताण आलाय. सरकार एकंदरीत योग्य दिशेने पावले टाकताना दिसत असले, तरी आगामी काळ खूप कठीण असणार आहे. सरकारने याची अत्यंत काळजीपूर्वक हाताळणी करणे आवश्यक आहे. "लॉकडाउन'ने प्रसार कमी होतोय; पण त्याने लोकांचे हाल जास्तच झाले. एकीकडे "कोरोना'च्या प्रसाराचा धोका आणि दुसरीकडे लोकांचे होणारे हाल, यात योग्य समन्वय साधणे खूप अवघड आहे. "कोरोना'ची परिस्थिती ही "धरलं तर चावतो आणि सोडलं तर पळतो' अशी झालीय.
आशेचा किरण
"कोरोना'चा प्रसार काही आठवडे वाढतो आणि त्यानंतर तो कमी होऊन नियंत्रणात येतो, असा जगातील काही देशांचा अनुभव आहे (उदाहरणार्थ- चीन, इटली, ब्रिटन). याशिवाय, "कोरोना'चा धोका हा लहान मुले, महिला व तरुणांना कमीत कमी आहे, हे आता सिद्ध झालेय. अनेकांना "कोरोना'ची लागण होऊनही त्यांना काहीच त्रास होत नाही व ते सुखरूप बाहेर येतात. अशा लोकांची संख्या खूप मोठी आहे. काही अहवालांनुसार दहा हजार लोकांना लागण झाल्यास एकाला मृत्यू येतो, असे चित्र पुढे येतेय. ही एक दिलासा देणारी बाब दिसते आहे.
उपचार अन् लस शोधण्यासाठी...
"कोरोना'चा प्रभावी उपचार व त्यावरील लस शोधण्यात आज जगभरातील शास्त्रज्ञ व डॉक्टर मंडळी जोमाने कामाला लागलीय. समाजातील अनेक लोक जेव्हा "कोरोना' संसर्ग होऊन आपल्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण करतील, तेव्हा "कोरोना'चा प्रसार मंदावेल आणि तेव्हाच "कोरोना'मुक्ती होईल, असे काही तज्ज्ञ म्हणत आहेत. याला "हर्ड इम्युनिटी' असे म्हणतात. एकंदरीत "कोरोना' लगेच जाईल, असे वाटत नाही आणि "कोरोना' जेवढ्या लोकांना प्रत्यक्ष ठार करेल, त्यापेक्षा जास्त लोकांना "कोरोना'शी संबंधित दुष्परिणाम मारणार आहे, हे येत्या काही वर्षांत आपल्याला दिसणार आहे. एकंदरीत, "कोरोना'मुक्ती लगेच शक्य नाही. याविरोधात "हर्ड इम्युनिटी', प्रभावी उपचार व लस आल्यानंतर हळूहळू "कोरोना' एक साधा आजार होईल, तो त्याचे काम करत राहील आणि आपल्याला आपले काम करत राहावे लागणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.