Kargil Vijay Diwas: कारगिल विजय दिवस... युद्ध का आणि कसे घडले

why kargil war started: कारगिल विजय दिवस म्हणून 26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता.
kargil vijay diwas : why kargil war started
kargil vijay diwas : why kargil war started
Updated on

कारगिल विजय दिवस म्हणून 26 जुलै हा भारतीय सैन्यासाठी शौर्याचा दिवस. याच दिवशी कारगिल युद्धात भारताने आपल्या विजयाचा ध्वज फडकावला होता. हा दिवस ‘कारगिल विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. कारगील हे लहान शहर असून जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून २०५ किलोमीटर अंतरावर.

हे शहर पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. कारगीलमध्ये काश्मीरमधील इतर ठिकाणांसारखे हवामान. उन्हाळा हा सौम्य कडक तर हिवाळा अतिशय कडक असतो व तापमान उणे ४० अंश सेल्सियस पर्यंतही उतरू शकते. 26 जुलै 1999 या दिवशी भारताने कारगिल युद्धात विजय मिळविला. हे युद्ध का आणि कसे घडले? याबाबत थोडक्यात माहिती घेऊया.

चौक्‍यांमध्ये घुसखोरी
राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगील वसलेले आहे. कारगीलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हाच रस्ता. घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मीरच्या जवळच्या आणि रस्त्याला समांतर अशा १६० किलोमीटरच्या पट्यातच घुसखोरी केली.

लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. त्यातील काही चौक्या समुद्रसपाटीपासून ५ हजार मीटरपेक्षाही अधिक उंचावर आहेत. नुसतेच कारगील नव्हे; तर आग्नेयेकडील द्रास व नैरूत्येकडील मश्को खोऱ्यातील तसेच बटालिक विभागातील चौक्यांवरही घुसखोरी झाली.

ऐन हिवाळ्यात चौक्‍यांवर ताबा
कारगील, द्रास व मश्को खोऱ्यातील चौक्या ह्या अतिउंचीवर आहेत. अतिउंचावरील चौक्यांवर कडक हिवाळ्याच्या महिन्यांत सैन्य तैनात करून ठेवणे अतिशय अवघड असल्याने हिवाळ्यापूर्वी दोन्ही बाजूने सैन्याची माघार व्हावी आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर व हवामान मानवी रहाण्यास स्थिर झाल्यानंतर ते- ते सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतावे, असा अलिखित समझौता भारत- पाकिस्तानमध्ये कारगील युद्धाच्या आधीपर्यंत होता.

या वेळेस मात्र, भारतीय सैन्य भारतीय चौक्यांवर परतण्यापूर्वीच पाकिस्तानी घुसखोरांनी ऐन हिवाळ्यात चौक्यांचा ताबा घेतला. त्यामुळे कारगीलचे युद्ध भडकण्यास ठिणगी पडली.

चौक्यांचा ताबा घेतला गेल्याने राष्ट्रीय महामार्ग १ अ हा पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या आणखी जवळच्या टप्प्यांत आला. तसेच उंचावरील चौक्यांचा ताबा घुसखोरांकडे गेल्याने त्यांना उतारावरील चौक्यावर नियंत्रण ठेवणे सोपे गेले. या चौक्या डोंगरमाथ्यावरील किल्ल्यांप्रमाणे होत्या. त्यांचा ताबा मिळवण्यास मोठ्या प्रमाणावर फौजेची गरज लागते. त्यातच अतिउंची व कडाक्याची थंडीत हे काम अवघड करते.


कारगिल युद्धातील प्रमुख घडामोडी
- कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोकण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑप्रेशन विजयची सुरुवात केली.
- टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध ठरले.

kargil vijay diwas : why kargil war started
Kargil Vijay Diwas: 'जरा याद करो कुर्बानी', जाणून घ्या 'या' सहा शुरवीरांची कहानी

१९९९च्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम...
- ४ मे : कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवल्याची बातमी हाती आली.
- ५ ते १५ मे : या दहा दिवसांमध्ये भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वेक्षण केले. यामध्ये कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाले. त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेऊन छळ करुन ठार केल्याचे बोलले जाते.
- २६ मे : भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून मीग २१, मीग २३, मीग २७, जॅग्वार, मीरेज २००० या लडाकू विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले.
- २७ मे : भारतीय हवाई दलाचे मीग २७ विमानाला अपघात होऊन ते कारगिलमध्ये पडले. विमान कोसळण्याआधी पॅरेशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर आलेल्या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर आठ दिवसांनी या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले.
- ३१ मे : पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिलमध्ये ‘युद्धसदृश्य परिस्थिती’ असल्याची माहिती दिली.

kargil vijay diwas : why kargil war started
Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धात स्वतःच्या प्राणांची आहुती देणारा खरा खुरा शेर शाह कोण होता ?

- १० जुन : पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील सैनिकांचे होते. ही टीम पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त हाती आल्यानंतर सर्वेक्षणासाठी गेली होती.


- १२ जून : दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक निष्फळ ठरली. भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग आणि पाकिस्तानचे परराष्ट मंत्री सरताज अजीज यांची भेट दिल्लीत झाली. मात्र चर्चेनंतर पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेत भारतालाच घुसखोरांनी परत जायला हवे असे सांगितले.


- १५ जून : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली


- २९ जून : भारतीय लष्कराने टायगर हिल्स प्रदेशातील दोन महत्वाच्या चौक्या ताब्यात घेतल्या.
- ४ जुलै : संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. भारतीय लष्कराच्या तीन तुकड्यांनी १८ ग्रेनेडियर्स, २ नागा आणि ८ शिख बटालियनने या प्रदेशात जोरदार गोळीबार करुन हा प्रदेश ताब्यात घेतला. अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट घेतली.


- ५ जुलै : शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली.
- ११ जुलै : पाकिस्तानने कारगिलमधून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली.
- १४ जुलै : भारताने ऑप्रेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केला.
- २६ जुलै : कारगिल युद्धाच्या संपल्याची औपचारिक घोषणा केली.

मृतांची आकडेवारी
- युद्धामध्ये ५२७ भारतीयांना प्राण गमवावे लागले; तर पाकिस्तानमधील मृतांचा आकडा ४५० इतका होता.

कारगिल युद्धामधील शौर्यासाठी प्रदान केलेले पुरस्कार (Kargil War Heroes)
- भारतीय सुरक्षादलातील एकूण ९७ जणांना कारगिल युद्धातील कामगिरीसाठी सन्मानित करण्यात आले.
- १८ ग्रेनेडीयर बाटलियनचे सैनिक ग्रेनेडीयर (हातबॉम्ब फेकणारा सैनिक) योगेंद्र सिंग यादव यांना परमवीर चक्र पुरस्कार.
- १/११ गोरखा रायफल्स बाटलियनमधील लेफ्टनंट मनोज कुमार पांड्ये यांना परमवीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर)
- १३ जेएके रायफल्स बाटलियनचे कॅप्टन विक्रम बत्रा यांना परमवीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर)
- १३ जेएके रायफल्सचे रायफलमॅन संजय कुमार यांना परमवीर चक्र पुरस्कार
- १७ जाट बाटालियनचे कॅप्टन अर्जून नायर यांना महावीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर)
- १८ ग्रेनेडीयर बाटलियनचे मेजर राजेश सिंग अधिकारी यांना महावीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर)
- ११ राजपुताना रायफल्सचे कॅप्टन हनिफउद्दीन यांना वीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर)
- १ बिहार बटालियनचे मेजर मरिय्यपन सर्वनन यांना वीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर)
- भारतीय हवाईदलाचे स्क्वाड्रन लीडर अजय अहूजा यांना वीर चक्र पुरस्कार (मरणोत्तर)
- ८ जेएके एलआय हवालदार चुन्नी लाल यांना वीर चक्र पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच शौर्यासाठी सेना मेडलही देण्यात आले. त्यानंतर नायाब सुबेदार झाल्यानंतर निवृत्त झालेल्या चुन्नी लाल यांना मरणोत्तर अशोक चक्र पुरस्कार जाहीर करण्यात आला.

संकलन : डॉ. धर्मेंद्र पाटील, जळगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.