एखादी व्यक्ती स्वकर्तृत्वावर भारताबाहेर परदेशात नोकरी - व्यवसायानिमित्त गेली, तिकडे स्थायिक झाली की, तिला देशाविषयी आस्था नाही, तिने देशाशी प्रतारणा केली अशी एक खुळचट आणि दांभिक भावना लोकांमध्ये निर्माण होतांना दिसते. केवळ राहण्याचा पत्ता हा त्या व्यक्तीच्या देशाविषयीच्या आस्थेचा निकष होतो.
१८८६ साली अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या, पहिल्या भारतीय महिला डॉक्टर, आनंदी जोशी यांना संकुचित मनोवृत्तीच्या लोकांच्या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. मध्यंतरी एका सिनेकलाकारालासुद्धा त्याच्या कॅनेडियन पासपोर्टमुळे असाच अनुभव आला. आपल्या देशातून बाहेर पडून नवीन देश, प्रगतीची नवी क्षितिजं धुंडाळणं, दुसऱ्या मुलखात जाऊन स्वकर्तृत्वावर नवीन मजल मारणं, बुद्धिमत्तेच्या बळावर जागतिक ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेत (global knowledge economy) योगदान देणं, विविध देशातील लोक-खाद्य संस्कृतीचा अनुभव घेऊन विविध लोकांशी जोडलं जाणं अशा धाडसी प्रवृत्तीकडे नकारात्मक दृष्टीने बघितलं जातं. परदेश-गमन जणू निषिद्धच अशी मानसिकता दिसते.
कल्पना करा की वास्को द गामा किंवा तत्सम जगप्रवासी 'लोक काय म्हणतील' म्हणून एकाच जागी बसून राहिले असते तर? अर्थात परदेशाविषयी किंवा स्वदेशाविषयी नकारात्मक भाव असणं, दोन्हीही चूकच. परदेशात अनिवासी भारतीय लोकांनी संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र, डिजाईन, उद्योगविश्व अशा विविध क्षेत्रात स्वकर्तृत्वाच्या बळावर मोठं यश मिळवलं आहे. कष्ट आणि गुणवत्तेची जोपासना करण्याच्या भारतीय मूल्यांचंच हे प्रतिबिंब आहे. यातील अनेक लोकांनी भारतातल्या विविध सामाजिक प्रकल्पात मदतसुद्धा केली आहे.
मुळात भारतीयत्व किंवा भारताविषयीची आस्था हे गुण राहण्याच्या पत्त्यावर अवलंबून नसून मनात आदराने जपलेली संस्कृती आणि वागणुकीत असणारी चांगली मूल्यं यावर अवलंबून आहेत. त्यामुळे जगभर पसरलेले २ कोटी अनिवासी भारतीय (NRI) हे विश्वबंधुत्वाच्या संस्कृतीचे दूतच आहेत. 'वसुधैव कुटुंबकम" हाच भारताचा जगाला संदेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.