सध्या शेतकरी आंदोलन रस्ता आणि फेसबुक या दोन स्तरावर सुरू आहे. शेतकरी आपली ढेपाळलेली आर्थिक परिस्थिती सावरावी म्हणून रस्त्यावर उतरून लाल, पांढरा, हिरवा चिखल करताना दिसतोय. तो चिखल म्हणजे तुम्ही-आम्ही केलेली किंमत आहे शेतकऱ्याची. जिला त्यांनी फेसबुकवरून अधिकृतपणे स्पष्टता दिली आहे. तिही अतिशय निर्दयीपणे. इतकी की पुढचे काही वर्ष तरी भोलेनाथ फेसबुकवाल्यांची दुग्धधारा स्विकारणार नाही. कारण आपल्या सावत्र वागण्यामुळे आपण एक माणूस गमावलाय. कुठलाही अभ्यास न करता आपली मजल त्यांना करबूडवे ते तुच्छतेची अपमानास्पद वागणूक देण्यापर्यंत जाते. आंदोलन चिरडण्यासाठी त्यांना पोलिसीबळाचा वापर करून हाणमार केली जाते. सकाळी एक आजोबा म्हणाले, "रझाकर परवडले".
शेतकरी आंदोलन का महत्वाचं आहे?
प्रसंग एक - काही कामानिमित्त वीसेक दिवसांपूर्वी कळंब तालुक्यातील नागझरवाडीला गेले होते. पोहचायला उशीर झाल्यामुळे काम उरकून परत यायला एसटी किंवा प्राईव्हेट वाहनही नव्हतं. मग तिथल्याच एका गावकऱ्याच्या घरी राहण्याचा प्रसंग आला. कुटुंब शेतकरी होत. त्यांच्यासाठी मी पूर्णपणे अनोळखी होते. काडीचाही विचार न करता त्यांनी मला त्यांच्या घरी माहेरभेटीला आलेल्या पोरीसारखं ठेवून घेतलं. संध्याकाळ झाली होती, मी राहणार आहे म्हटल्यावर लगबग सुरु झाली. घरातल्या तीनही सुना नुकत्याच शेतातून आल्या होत्या (म्हणजे भर उन्हाळ्यात त्या ४८ अंश सेल्शियस तापमानात त्या रोज काम करत होत्या कारण शेतात जरा १० रुपये जास्त भाव मिळेल म्हणून भाजीपाला लावला होता.) स्वयंपाकासाठी चुली पेटल्या होत्या. बशीत ओतलेला कोरा चहा पिणार तितक्यात घरातला धाकटा मुलगा कुठूनतरी बाहेरून आला होता. हातपाय धुतल्यावर निवांत आईशेजारी जाऊन बसला. माझी चौकशी चालू होती. ओळख-पाळख काढत काढता, बायकोने घरातल्या पोराच्या हातात चहा पाठवला. मोठी भावजय चपात्या करत होती, मधली दुसऱ्या चुलकांडावर कालवण, आई घरातल्या लेकरांना काय हवं नको बघत होती. तर या धाकट्याने बशीत चहा ओतला आणि एक-दोन घोट कसेतरी घेतले असतील. आईने मागमूस काढून सहज विचारल कसा झाला बाजार? आणि या प्रश्नावर घरातलं वातावरण कोणीतरी मेल्यावर होतं तितकं किंबहुना त्यापेक्षा जास्त वाईट झालं होत. कारण घरातल्या लहानथोरांपासून खरडून २ दिवस-रात्र जागून टेम्पो भरून पाठवलेल्या भाजीपाल्याची मोजून २०००+ पट्टी आली होती. राहिलेला माल तो तिथंच मार्केटमध्ये रिता करून आला होता. टेम्पोचं भाड आणि बायांची मजुरी देखील खिश्यातून द्यावी लागणार होती. वीज, पाणी आणि घरच्या सगळ्याचं कष्ट तर मातीमोल झालं होत. गोठ्यात ३,४ गाई व एक म्हसाड असताना हा माणूस कोरा चहा पीत होता व शेजारी बसलेली आई घरातल्या वर्षाच्या पोरासाठी एका थडग्यात पाणी घालून दुधपावडर कालवत होती.
प्रसंग दुसरा- साधारण वीसेक वर्षांपूर्वी म्हणजे १९९७ ला मी आणि माझी आई दिवसभर पालक, शेपू उपटून रात्रभर काडीकाडी जुळवून पेंड्या बांधून, गोठ्यातल्या गाईची पहाटेच धार काढून, डेरीला दुध घालून, सकाळी सातला येणाऱ्या पहिल्या भूम मुंबई या गाडीने जामखेडला गेलो होतो. कारण आईला कोणीतरी सांगितलं होत कि जामखेडला चांगला भाव मिळेल. रात्रभर आम्ही पैसे आल्यावर काय, काय करायचं याचा हिशोब पेंडीगनिक लावत होतो. पण तिथे गेल्यावर दुसरंच आमच्या पुढ्यात वाढून ठेवलं होत. मला अजूनही चांगलं आठवतय.. मार्केटमध्ये गेल्यावर चवाळ्यावर आई पेंड्या काढून लावत होती. मी कोपऱ्यावर मांडण्यासाठी एकेक दगड उचलून आणून लावत होते. तितक्यात मी आईला २,३ माणसांचा पडलेला गराडा पहिला. ते आईला गुत्तं मागत होते. एका पूर्ण पोत आणि गोणी भरून आणलेल्या भाजीचे ७५ रुपये. एक दलाल जाऊन दुसरा येत होता. कोणी ६५ रुपये, कोणी १०० तर कोणी ८०, ९० सगळी भाजी मागत होत. आई पहिल्यांदाच अश्या मोठ्या मार्केटमध्ये आलीय, शेतकरी आहे हे नवखेपण हेरून तिच्या हिरव्यागार सोन्याचा पाडून भाव मागणं सुरु होतं. पण ती बधली नाही आणि आईने एक पेंडी २ रुपये अशी विकायला सुरुवात केली होती. आता भाजी बघून गिऱ्हाईकांची गर्दी झाली होती. आतापर्यंत चारदोन पेंड्या विकल्याही होत्या. बहुतेक त्या दलालांना ते झेपलं नसावं म्हणून त्यांनी झाडून मार्केटमधून पालक, शेपू विकत घेऊन ५० पैसे या भावाने लावला. आणि आमच्याकडे येणार गिऱ्हाईक फक्त भाजीचा भाव विचारून, पेंडी हातात घेऊन, बघून-न्ह्याळून,झाडून दीड रुपयाला दोन, रुपयाला दोन अश्या मागू लागलं. आणि पुढे जाऊन ५० पैस्याची एक पेंडी अश्या दराने खरेदी करू लागलं. दुपारपर्यंत मोजून दाहेक पेंड्या विकल्या असतील. आम्ही दिवसभर फक्त भाव सांगत राहिलो. पाच वाजायला आल्यावर माझ्या आईने दोन पेंड्या घेतल्या माळव्याच्या पिशवीत घातल्या आणि मला काहीही न बोलता चालायला लागली. मी आई, आई म्हणून आवाज दिल्यावर एकदाही मागे वळून न पाहता मला चल असं म्हणून ती तरातरा पुढे चालत होती. त्या सगळ्यांनी आईला हरवल होत. मी सहज मागे वळून पाहिलं तर ती सकाळपासून ५० पैश्याला एक पेंडी अश्या भावाने भाजी विकणारी दलाल माणस भाजी भरून घेत होती. आणि सोबतच खदाखदा हसत होती. त्यावेळी एसटीत बसलेली माझी आई ढसढसा रडली होती. आजही मी एकट्यात असले कि तो खदाखदा हसण्याचा किळसवना आवाज माझ्या कानात घुमतो आणि लागुनच आईचं ते हमसून, हमसून रडण... मग मी लाखभर माणसांच्या जत्रेत का असेना. “या वीस वर्षात माझं अवतीभवतीच जग किती बदललय. फक्त बदललं नाही ते माझ्या शेतकरी असणाऱ्या आईचं, चुलता-चुलतीचं, शेतकरी भावाचं, अन्नदात्याचं.”
या दोन प्रसंगामध्ये काळाचा सोडला तर कुठलाही बदल झालेला नाहीये. मानवसृष्टी आहे कि नाही अशी पुसटशीही शाश्वती नसलेल्या ग्रहाची चाचपणी करण्यासाठी ग्रहांवर उपग्रह सोडणाऱ्या देशात जिवंत माणसं न्यायासाठी, हक्कासाठी, सन्मानासाठी रोज मरतायत. हक्काची भिक मागतायत. पण सरकारला घाम फुटेल तर. सगळं, सगळं बदललंय, फक्त पोशिंदा आहे तिथेच आहे. किंवा त्यापेक्षा जास्त खोल गर्तेत ढकलला जातोय. आणि ढकलणारे कोण आहोत माहितेय तुम्ही-आम्ही, आपण झळाळल्या फूडमॉलमध्ये जाऊन आईस-टी सोबत पिझ्झा, पास्ता, पुटीन मागवणारे व अर्धीही डिश न संपवता हजार रुपये बिल व वरतून स्टेट्स जपलं जाव म्हणून पाडून टीप देणारे आज आपण अन्नाच्या नासाडी बद्दल बोलतोय, अन्न हे पूर्णब्रम्ह आहे अशी महती सांगत फिरतोय. किंवा काहीच काम नाही म्हणून आणि गार पंख्याच्या हवेखाली बसून, गॅलरीतल्या कुंड्याकडे बघत, बघत अन्ननासाडी व त्यावर सल्ले देतोय... चांगभलं! बर कोणाला? तर जो पिकवतो त्याला. पुस्तकी थेऱ्या वाचून, वाचून इतकही साध समजू नये कि हि नासाडी नव्हे तर प्रतीकात्मक होळी आहे.
तिसरा आणि महत्वाचा मुद्दा हा आहे कि हा संप शहरी विरुद्ध ग्रामीण नसून सरकारविरुद्ध शेतकरी असा आहे (जरी शहरी विरुद्ध ग्रामीण असं चित्र रेखाटन्यात काही लोकं यशस्वी झालेतं) बाकी आपण उगीचच हळद लावून पिवळे होतोय. सात्विकतेचे सल्ले देतोय. किंवा नेहमीच शेतकरी आंदोलनाचा विषय निघाला कि स्वामिनाथन समितीच्या शिफारशी आजपर्यंत किती शेतकर्यांनी वाचल्यात, माहिती आहेत असा सवाल मुंबई-पुण्याचे तत्वज्ञ फेसबुकवर बसून विचारत राहतात. सरळ गणित आहे ते वाचत बसले असते तर तुम्ही कुठे तुमचं इतकं तत्वज्ञान पाजळल असतं? आणि इतकीच हौस आलीय तर फेसबुकवर बसून विचारण्यापेक्षा गावोगावी जाऊन शिफारशींचं वाचन करावं. बाकी आंदोलनं हि कुठलीही मोजमापं, दोर्या लावून होत नसतात. हे म्हणजे पावसाला कसं पडायचं हे सांगण्यासारख झालं. तो काय कविता वाचनाचा नियोजित कार्यक्रम थोडीये. आणि तसंही त्यांना आज या क्षणी आपल्याला सल्ला देण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाहीये. जमत असेल तर पाठिंबा द्या किंवा पानाफुलांच्या, चंद्र-ताऱ्यांच्या फेसबुकवर गप्पा मारा.
आपल्या समाजाला एक वाईट सवय आहे... काहीही झालं कि विरोधी पक्ष रुलिंग सरकार पडण्यासाठी हा सगळा खटाटोप करतय (तसं असू नये? नाहीतरी विद्यमान सरकारातील लोकही विरोधी बाकावर बसून हेच धंदे करत होती. शेतकरी एकवटलाय यावरचं लक्ष हळूच असले खात्री नसलेल्या मूद्यांवर एकवटायचं. बाकी आंदोलनकर्त्यानीं सरकार आणि विरोधी बाक या दोन्हींकडे दुर्लक्ष करावं सरळ, सरळ) खरी शोकांतिका काय आहे तर कोणालाही असं वाटत नाही कि हा संप आजपर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांसाठी आहे. त्यांच्या विधवा पत्नीसाठी हा संप आहे. अनाथ आई-बापासाठी, पोरक्या लेकरांसाठीचा हा संप आहे. किमान यापुढे कोणी शेतकर्याने नरड्याला फास आवळू नये म्हणून हा संप आहे. शाळकरी पोरीने एसटी पाससाठी २६० रुपये नसल्यामुळे स्वतःला मृत्युच्या अधीन करू नये म्हणून आहे....शेतकरी बापाकडे लग्नासाठी पैसे नसल्यामुळे व मृत्यूला जवळ केल्यावर बापाच्या डोक्यावरील आपला बोज हलका होईल यामुळे आत्महत्या करणाऱ्या शितल घायाळ साठीचा म्हणून हा संप आहे...शहीद जवानपत्नीसाठी रडणारा महाराष्ट्र शहीद शेतकऱ्याच्या पत्नीसाठी कधी आश्रू ढाळणार आहे. डोळस सिलेक्टीव्हनेस आहे हा!
सरकारने काय करावं शेतकऱ्यांची कोरडवाहू, बागायतदार, अल्पभूधारक अशी विभागणी करायची थांबवावी. सध्यस्थितीत कर्जमाफी. शेतमालाला हमीभाव दयावा. खरं तर शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मिलिटरी स्कूलच्या धर्तीवर शाळा काढाव्यात व मोफत शिक्षण द्यावं. शेवटी तुम्हीच कोणीतरी लिहून ठेवलय अन्नदाता सुखी तर जग... ब्बास!!
शेतकरी संप- फक्त पाठिंबाचं नाहीतर सहभाग.
ई सकाळवरील आणखी ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा -
संप मिटल्यामुळे काहींची दुकाने बंद: चंद्रकांत पाटील
लंडनमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले; 7 ठार
लंडन स्फोट : भारतीय संघाची सुरक्षा वाढविली
मुंबई-गोवा मार्गावर अपघातात 2 जण ठार
रेयाल माद्रिदने पटकाविले चँपियन्स लीगचे विजेतेपद
सांगली, कोल्हापूरला भूकंपाचा सौम्य धक्का
नाशिकमध्ये शेतमालासाठी 'सुरक्षित कॉरिडॉर'
'''महाराष्ट्र बंद' उद्या होणारच; संप मिटलेला नाही''
'आश्वासने न पाळल्याने तावडेंनी राजीनामा द्यावा'
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.