संकटाच्या काळात सरच आले धावून

education
education
Updated on

आमच्या देशात प्राधान्य क्रमाचा विचार केला तर शिक्षणाचा क्रमांक सगळ्यात शेवटी लागतो. कोवीडच्या काळात ज्याकडे सगळ्यांचेच अक्षम्य दुर्लक्ष झाले ते म्हणजे शिक्षण. मुलांच्या जिवापेक्षा शिक्षण महत्वाचे कसे असू शकेल? हा प्रश्न या निमित्ताने विचारला गेला. अगदी खरंय. पण या संकटाच्या वेळी आमच्याकडे असलेल्या उपलब्ध पर्यायांचा सरकार म्हणून किती विचार केला गेला?

आता जिओ टी. व्ही. च्या माध्यमातून वर्ग 9 आणि 10 चे वर्ग चालविले जाण्याचा मुहूर्त एकदाचा सापडला. पण या जिओ टी. व्ही.चा प्रयोग करताना सर्वंकष विचार केला गेला असे चित्र मात्र अजिबात दिसत नाही. जिओ टी.व्ही लाच काम द्यायचे असल्याने बाकी पर्यायांचा विचार सरकार तरी का म्हणून करेल? दिल्लीपासून मुंबईपर्यंत राज्यकर्ते कुणीही असो त्यांचे जिओ प्रेम आता लपून राहिलेले नाही. जिओ टी. व्ही. वर टाकलेले शैक्षणिक व्हिडीओ मुलांनी बघायचे म्हणजे फोनमधे जिओ सीम असणे आवश्‍यक आहे. हा फोन ऍन्ड्रॉईड प्रकारातला असला पाहिजे . आता एकतर तो विकत घ्या आणि विकत घेता येत नसेल तर पुन्हा शिक्षणापासून वंचित रहा. आता प्रश्न असा आहे. शालेय शिक्षण मंत्रालयाने केवळ मुंबई, पुणे आणि केवळ अन्य शहरांचा विचार करून योजना तयार केली असल्याची शक्‍यता नाकारता येत नाही. मग 80 टक्के ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांचे काय? त्यांचे वर्ग होणार तरी कसे? की त्यांना जिओ टी. व्ही च्या योजनेत गृहीतच धरलेले नाही. धोरण निर्मात्यांना हे किमान प्रश्न पडू नये याचे आश्‍चर्य वाटते.

माझी शाळा जिल्ह्याच्या ठिकाणी आहे. तरी सुद्धा सर्वच मराठी माध्यमांच्या शाळेत येणाऱ्या साधारण 30 टक्के विद्यार्थ्यांकडे हा स्मार्ट फोन नाही. दुसरे असे की; ज्या मुलांना आम्ही व्हॉट्‌सऍप पासून दूर रहा असे सांगत होतो.त्यांनाच आता व्हॉट्‌सऍपवर धडे गिरवायला सांगितले जात आहे. हे व्हॉट्‌सऍप शिक्षण म्हणजे तद्दन फालतूपणा आहे.
पण या साऱ्या गदारोळात कुणालाच दूरदर्शन कसे आठवले नाही? लहानग्या झोपडीत एकदा इंटरनेट नसेल पण लहानसा टी.व्ही चा संच मात्र नक्की आहे. आणि त्यातही दूरदर्शन मोफत. मग त्याचा वापर करावा असे का कुणाला वाटले नाही. याचा विचार एप्रिल, मे च्या दरम्यान महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे संस्थापक संचालक विवेक सावंत सरांनी केला. विवेक सावंत हे नाव शिक्षणातील विविध प्रयोगांसाठी प्रसिद्ध आहे. संगणक प्रशिक्षण देणाऱ्या एका बृहद परिवाराचे ते प्रमुख आहेत.

अवघ्या महाराष्ट्राला संगणक साक्षर करणारे सर या संकटाच्या काळात गप्प बसणारे नव्हते. सुरुवातीच्या काळात त्यांचा वेळ सरकार दरबारी वाया गेला. पण सरकारच्या आर्थिक मदतीची चिंता न करता; त्यांनी कोट्यावधी रुपये पदरचे टाकून वर्ग एक ते आठ साठी असलेला अभ्यासक्रम चित्रित केला. गेला महिनाभर महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे पुणे येथील मुख्यालय चित्रीकरणाने गजबजून गेले होते. आता हे सारे चित्रीकरण पूर्ण झाले असून 20 जुलै पासून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे प्रदर्शन सुरु होणार आहे.

भारतातला हा पहिलाच अभिनव प्रयोग आहे. 480 तासिकांच्या या मालिकेला सावंत सरांनी टीलीमिली हे नाव दिले. दूरदर्शन वर या मालिका 20 जुलै पासून सकाळी 7.30 ते 12.30 या काळात सुरु असणार आहे. या तासिका पुढील दहा आठवडे चालणार आहेत. ज्यांच्याकडे दूरदर्शन संच नाहीत ते शेजारी जाऊन सुद्धा या तासिका बघू शकतात. प्रत्येक तासिका ही 30 मिनिटांची असेल.

या प्रयोगात हेमलकसा आणि भामरागडचे विद्यार्थी कदाचित सहभागी होऊ शकणार नाही पण राज्यातील 95 टक्के विद्यार्थ्यांना त्याचा लाभ मिळणार आहे. जे शालेय शिक्षण मंत्रालयाला करता आले नाही ते महाराष्ट्र ज्ञान महामंडळाला शक्‍य झाले आहे.
ज्यांना जिओ टी. व्ही. सोबत करार मदार करून शिक्षण रेटायचे आहे त्यांना असला विचार कसा काय सुचू शकतो ? खरेतर हे काम शासन स्तरावर होणे गरजेचे होते पण कुठल्याच बाबतीत ठोस निर्णय न घेणाऱ्या या सरकारकडून अपेक्षा तरी कशी करणार? आणि त्यातही शिक्षण. मग तर विचारूच नका. या संकटाच्या काळात शेवटी सावंत सर धावून आले आणि मुलांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा केला त्यासाठी ते अभिनंदनास पात्र ठरतात.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.