अरुंधती दर्शन न्याय
संस्कृत भाषेत काही बोधवाक्ये किंवा उक्ती आहेत ज्यांच्या साहाय्याने सिद्धांत प्रमाणित करता येतात. यांना ‘न्याय’ असे म्हणतात. ‘नीयते विवक्षितार्थ: अनेन इति न्याय:’ ( ज्या साधनाच्या मदतीने आपण विवक्षित किंवा ज्ञेय तत्त्वापर्यंत पोहोचतो, ते साधन न्याय आहे ). त्यातलाच एक आहे, ‘अरुंधती दर्शन न्याय’. आकाशात एक मोठा चौकोन व त्याला तीन ताऱ्यांची शेपटी हा ताऱ्यांचा समूह सहज ओळखता येतो. यांना सप्तर्षी नाव दिलेले आहे. इंग्रजीत या तारामंडलाला ‘अर्सा मेजर’ म्हणतात. भारतीयांनी या सात ताऱ्यांना सात ऋषी मानले आहे. ऋतु, पुलह, अगस्त्य, अत्री, अंगिरा, वसिष्ठ आणि मरीची हे ते सात ऋषी. शेपटीतल्या तीन ताऱ्यांमधील मधला तारा वसिष्ठ. वसिष्ठाकडे लक्षपूर्वक बघितलं तर एक तारका त्याच्याजवळ लुकलुकताना दिसते. ही अरुंधती. अरुंधती सहज दिसून पडत नाही. तिला शोधायचं असेल तर आधी वसिष्ठ हा ठळक तारा दाखवावा लागतो. यावरूनच ‘अरुंधती दर्शन न्याय’, हे नीतीपर वाक्य तयार झालं. अर्थात, स्थूल वस्तू किंवा ज्ञान, जे दिसायला व समजायला सोपे असते, आधी ग्रहण करणे व त्याच्या अनुषंगाने सूक्ष्म वस्तू किंवा गूढ ज्ञानाकडे प्रवास करणे.
अरुंधती तारकेला इंग्रजीत अल्कोर (Alcor) तर वसिष्ठ ताऱ्याला माईजर (Mizar) असे नाव दिले आहे. अरुंधतीचा प्रकाश मंद असल्यामुळे ही तारका दृष्टीपरीक्षण करण्याचे मापदंड म्हणून उपयोगात आणली जात असे. तसेच, ज्याचा मृत्यू समीप आला आहे त्याला ही तारका दिसत नाही, अशीही एक मान्यता होती. वसिष्ठ पृथ्वीपासून साधारण ७८ प्रकाश वर्षे अंतरावर तर अरुंधतीचे पृथ्वीपासून अंतर ८१ प्रकाश वर्षे इतके आहे.
दक्षिण भारतात एक प्रथा आहे. लग्न झाल्यावर नव परिणीत जोडप्याला अरुंधतीचे दर्शन घ्यावयास सांगितले जाते. अरुंधती वसिष्ठ ऋषींची पत्नी आपल्या पातिव्रत्य धर्मासाठी पूजनीय आहे. अरुंधतीची गोष्ट शिवपुराण व भागवत पुराणात सापडते. कर्दम ऋषी व देवहुती यांची पुत्री अरुंधती आपल्या पूर्व जन्मी ब्रह्मदेवांची मानसकन्या होती. अग्निकुंडातून जन्म झाल्यामुळे अतिशय तेजस्वी व विदुषी होती. अशी कथा आहे की अग्निपत्नी स्वहा हिने सप्तर्षींपैकी प्रत्येक ऋषीपत्नीचे रूप धारण केले. मात्र, अरुंधतीच्या पातिव्रत्यामुळे तिचे रूप धारण करण्यात अपयशी झाली. म्हणून अरुंधतीस तारामंडलात वसिष्ठांजवळ स्थान प्राप्त झाले व अन्य सहा ऋषीपत्नींचे वेगळे (कृत्तिका) तारामंडल झाले. आकाशदर्शनात अरुंधती प्रत्येक वेळेस वसिष्ठाच्या उजव्या बाजूस थोडीशी मागे दिसते. सहधर्मचारिणीच्या कर्तव्याची जाणीव करून देते आहे, असे भासते. पतीच्या प्रत्येक कृतीत त्याच्या पाठीशी उभी व त्याच्या मार्गात कधीच अडथळा निर्माण न होऊ देणारी. ( अ- रुध- अवरुद्ध न करणारी). फक्त एवढेच नव्हे तर हे तारकाद्वय एकमेकांभोवती प्रदक्षिणा घालतं. आदर्श सहजीवनात पती व पत्नी दोघांचं समान योगदान असतं हा त्याचा गर्भितार्थ लक्षात घेऊन नव परिणीत दाम्पत्याने अरुंधती दर्शन करावयाचे असते. अरुंधतीच्या विलक्षण गुणांमुळे या जोडप्याचा उल्लेख ‘वसिष्ठ अरुंधती’ असा न करता ‘अरुंधती वसिष्ठ’ असा केला जातो.
‘अरुंधती दर्शन’ या न्यायाचा उपयोग तत्त्वज्ञान व तर्कशास्त्रात सर्वात अधिक केला जातो. गूढ ज्ञान आत्मसात करण्याची प्रथम पायरी आहे सोप्या व बुद्धीस सहज पटणाऱ्या तर्कापासून सुरुवात करणे. यामुळे उत्तरोत्तर गूढतेकडे प्रवास सरल होतो. प्राचीन ग्रंथांपैकी उपनिषद हे सर्वात गूढ ज्ञानाचे, आत्मतत्वाविषयी शोधाचे सर्वोच्च ग्रंथ आहेत. आत्मबोधासारख्या कठीण विषयाकडे साधकाला स्थूलापासून सूक्ष्मापर्यंत पोहोचविण्याचे काम हे लीलया करतात. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण तैत्तरीय उपनिषदात आहे. ब्रह्मच्या शोधात निघालेल्या साधकाला सुरुवातीला अन्नमय कोष म्हणजेच हे स्थूल शरीर हेच ब्रह्म आहे इथपासून सुरुवात करून पुढे एक एक करून प्राणमय कोष, मनोमय कोष, विज्ञानमय कोष आणि सर्वात शेवटी आनंदमय कोष हेच आत्म्याचे निवास आहे व परब्रह्म इथेच आहे, या संकल्पनेपर्यंत आणतात. दासबोधातल्या पाचव्या दशकात समर्थ रामदास अभ्यासकाला असाच सहज हात धरून बद्ध लक्षणापासून सिद्ध लक्षणापर्यंत नेतात. समर्थ म्हणतात
माहांवाक्य उपदेश भला । परि त्याचा जप नाही बोलिला ॥
तेथिचा तो विचार केला । पाहिजे साधके ॥ (५.६.११)
महावाक्य म्हणजे ‘ अहं ब्रह्मास्मि’. ‘मी ब्रह्म आहे’. परंतु, महावाक्याचा फक्त जप केल्याने अज्ञानाचा अंधकार दूर होत नाही. साधकाने महावाक्याच्या अर्थाचा विचार करणे त्यावर मनन करणे गरजेचे आहे. त्यासाठी मनाची उत्तरोत्तर प्रगती होणे आवश्यक आहे. बद्धापासून मुमुक्ष्वाकडे, मुमुक्षत्वापासून साधकाकडे, साधकापासून सिद्धत्वाकडे हा प्रवास स्थूलापासून सूक्ष्मतेकडे घेऊन जाणारा आहे. आत्मज्ञानाची प्राप्ती हे या प्रवासाचे उच्चतम शिखर. आदि शंकराचार्य म्हणून कर्मकांडांना महत्त्व देत असत. त्यांचा मते मनःपूर्वक केलेल्या उपासनेने मनाची शुद्धी होते व आत्मज्ञानाच्या प्राप्तीचा मार्ग सोपा होतो. एकदा आत्मज्ञानाची प्राप्ती झाल्यावर कर्मकांडाची गरज उरत नाही. जसे अरुंधतीचे दर्शन झाले की संदर्भाला वसिष्ठाची गरज राहत नाही.
आपल्या दैनंदिन आयुष्यात ‘अरुंधती दर्शन’ न्यायाचा आपण कळत नकळत उपयोग करीत असतो. अत्यंत जटिल गणितीय किंवा भौतिकीय प्रमेय सिद्ध करताना हाच न्याय वापरल्या जातो. सुरुवातीला सोपे समीकरण वापरून मग क्रमाक्रमाने जटिल समीकरण सोडवून प्रमेय सिद्ध करण्यात येतो व गूढ गणित पण सोपे वाटायला लागते. प्रगत संशोधन करण्याऱ्या प्रयोगशाळांमध्ये हाच सिद्धांत उपयोगात येतो. आकाशगंगेचे रहस्य सोडवताना खगोलशास्त्रज्ञ ज्या तारकांची किंवा ग्रहमालिकांची माहिती आहे त्यांच्या अनुषंगाने नवीन शोध लावण्याचे प्रयत्न करतात. वैज्ञानिकच कशाला आई आपल्या मुलीला किंवा मुलाला पोळ्या लाटणे पण याच पद्धतीने शिकविते. प्रथम फक्त लाटण्याची प्रक्रिया शिकावी लागते. यावेळेस पोळी गोल येते आहे की नाही, हे महत्त्वाचे नाही. एकदा लाटायला शिकले की गोल कशी करायची हे महत्वाचे. गोल, विस्तवावर फुगणारी पोळी जमायला लागली की पोळ्यांचे सर्व प्रकार सहज जमायला लागतात. थोडा विचार केला, तर असे अनेक उदाहरणं आपल्या लक्षात येतील. आकाशगंगेत, आपल्यापासून ८१ प्रकाशवर्षे दूर असणारी ही अरुधंती, आपल्या जीवनात अशी खोलवर रुजलेली आहे, यातच तिची महानता दिसून येते !
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.