चीन म्हणजे भारताचे शत्रू राष्ट्र. सीमेवर युद्धजन्य स्थिती निर्माण झालेली असताना चीनकडून काय शिकावे हे सांगणे म्हणजे केवढा मोठा राष्ट्रद्रोह! परंतु आपल्या शत्रूला नामोहरम करायचे असेल तर त्याची बलस्थाने समजून घेतली पाहिजे. आंतरराष्ट्रीय राजकारणात कुणी कायम शत्रू नसतो. परिस्थिती अनुसार घेतलेले ते तत्कालीक निर्णय असतात. शत्रू राष्ट्र आहे म्हणून व्यापार कधी थांबतो का? तो तर राजरोस सूरु असतो. ते असो,
मूळ मुद्दा काय तर चीनने आज जी शक्ती अर्जित केली आहे ती समजून घेणे. १९४९ पर्यंत युरोपीय लोकांनी या देशाला सर्व प्रकारे ओरबाडून खाल्ले. जपानसारख्या चिमुरड्या देशाने सुद्धा मांचू राजवटीचे लचके तोडले. असे असताना माओ प्रणित साम्यवाद चीनने स्वीकारला आणि देशाला एका पोलादी शिस्तीत बांधले. १९५५ च्या सुमारास रोबेर गिल हा फ्रेंच पत्रकार चीनमध्ये दौरा करून आला. १९३७ मध्ये त्याने चीन मधला गोंधळ आणि अव्यवस्था बघितली होती. त्याला जेमतेम पाच-सहा वर्षात संपूर्णपणे बदललेला चीन दिसला. त्याच्या ब्लु आंट या पुस्तकात त्याने माओने निर्माण केलेला चीन बघितला. प्रचंड शिस्तीतला चीन.
मांचू राजवटीला जमीनदोस्त करून शेतकरी आणि शेतमजुरांची संस्कृती चीनने निर्माण केली. शेतकरी आणि मजुरांच्या हाती अत्याधुनिक तंत्रज्ञान दिले. हे करीत असताना चीनने जगाच्या एकूण बाजाराचा अभ्यास सुरू केला.आमच्या दिवाळीला लागणाऱ्या रोषणाईच्या दिव्यापासून तर पूजेला मांडल्या जाणाऱ्या लक्ष्मीच्या मूर्तीपर्यंत सारे काही चीनमध्ये निर्माण होऊ लागले. एम बी ए झालेल्या भारतातील तरुणांना भारतात राहूनच इथल्या बाजाराचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केले गेले. हे चीनने संपूर्ण जगात केले. आणि बघता बघता जगाच्या बाजाराचा ताबा चीनने घेतला. निर्यात वाढीतून प्रचंड पैसा आणि पैशातून पुन्हा व्यापार विस्तार हे धोरण चीनने फारच नेटाने गेले ४० वर्षे राबवले आहे. या आक्रमक व्यापार धोरणात सातत्य आणि आपल्या सारखा धोरण लखवा नसल्याने चीन हे करू शकला. आम्ही हे कधीच समजून घेतले नाही.वर्तमानात चीनच्या आक्रमणाचा भावनिक वापर करून जनमत प्रभावित करण्यापलीकडे आम्ही चीनकडून फार काही शिकत नाही.
सिकीयांग प्रांतात होणारी बंडाळी चीनने कठोरपणे मोडून काढली. आम्हाला काश्मीरचा प्रश्न सोडवायला सत्तर वर्षे लागली. हीच काय ती सकारात्मक गोष्ट. चीन हा साम्यवादी देश आहे आणि त्या देशातील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर प्रचंड बंधने आहेत हे मान्य. त्यांचे अंतर्गत प्रश्न देखील आहेत परंतु या सर्वांवर मात करीत चीन ज्या वेगाने जगाच्या पटलावर एक महाशक्ती म्हणून पुढे आलाय ते विस्मयकारक आहे. त्या देशातील माणसांच्या कष्टाने त्यांनी जगाला दखल घेण्यास बाध्य केले आहे. दुर्दैवाने समाज आणि देश म्हणून आमची कटीबद्धता कमी पडते.
जात ,धर्म वंश प्रांत यात फुटलेला समाज जागतिक पटलावर कसा उभा राहील? हा प्रश्न आम्हाला पडत नाही. आमच्याच सोबत स्वतंत्र झालेला अजागळ चीन अमेरिकेच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची हिम्मत आज ठेवतो.
चीन बाबत केवळ सैन्य वा शस्त्र शक्तीचाच विचार न करता इतक्या मोठ्या लोकसंख्येच्या हाताला काम देण्याचे कसब चीनने विकसित केले आहे ते समजून घेतले पाहिजे. त्याच्या तत्त्वज्ञानाने शेतकरी शेतमजुर अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणला. आम्हाला आजही होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवता आलेल्या नाहीत, हे कटू असले तरी वास्तव आहे. मागच्या महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामीण भागात आम्ही काही मित्र फिरत होतो. प्रत्येक गावात दोन महत्वाचे प्रश्न होते. एक शेताला पाणी नाही आणि दुसरी अडचण म्हणजे पांदण रस्ते नाही. शेतकऱ्याला गुडघाभर चिखलातून वाट तुडवीत शेतात जावे लागते, शेतातले पीक मुख्य रस्त्यावर आणणे त्याला अवघड आहे. आम्ही साधे पांदण रस्ते शेतकऱ्याला देऊ शकलेलो नाही. १५ कोटी प्रवासी कामगार आणि त्यांच्या जगण्याचा दर्जा आमच्या देशात काय आहे ते आपण जाणतो. श्रमिकांना देशात जोपर्यंत त्यांच्या कामाचा योग्य मोबदला आणि कामाला प्रतिष्ठा लाभत नाही तोपर्यंत श्रमशक्तीच्या आधारवर देश उभा करता येणार नाही. साम्यवादी चीनने सामान्यांचा विरोध प्रत्येकवेळी क्रूरपणे चिरडला आहे. एक जबाबदार लोकशाही देश म्हणून आम्हाला ते करता येणार नाही पण धोरण सातत्य आम्ही चीनकडून शिकु शकतो. भारताचे लोक म्हणून देशाप्रती असलेली आमची बांधिलकी पुन्हा तपासावी लागेल. मी भला आणि माझा पैसा भला इतक्या संकुचित विचारांनी समाज आणि देश घडत नसतो. हे जितक्या लवकर आम्ही समजून घेऊ तो सुदिन.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.