धर्म महत्वाचा की माणूस ?

religion
religion
Updated on

जगात सर्वत्र धर्म, धार्मिकता आणि धर्माच्या नावे केला जाणारा हिंसाचार पुन्हा एकदा आक्राळविक्राळ रूप धारण करतोय याला कोणताच देश अपवाद नाही. १६ आणि २९ ऑक्टोबर रोजी फ्रांसमध्ये दोन दहशतवादी हल्ले झाले. ज्यात पहिल्या हल्ल्यात स्यामुअल पाटी या शिक्षकाचा शिरच्छेद करण्यात आला तर दुसऱ्या एका हल्यात नीस शहरातील तीन व्यक्तींची एका चर्चमध्ये चाकूने हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद फ्रांसमध्ये उमटले तसे ते जगात देखील उमटले. दुर्दैवाने धर्माच्या नावाखाली या हत्यांचे समर्थन करताना भारत आणि भारताबाहेर अनेक लोक दिसले.

आईवर संवेदनशील कविता लिहिणारे आणि स्वतःला फारच पुरोगामी आणि उदारमतवादी समजणारे मुनव्वर राणा सारखे कवी देखील धर्माच्या आड येणाऱ्यांना आम्ही ठारच मारू अशी उघड भाषा वापरताना दिसले. यातून यांच्या पुरोगामित्वाचे बुरखे फाटले. उजवे असो की पुरोगामी यातील अनेकांचे पितळ समाज माध्यमामुळे अलीकडे उघडे पडत चालले हेही नसे थोडके. एक मात्र स्पष्ट आहे की धर्माच्या आडून होणारे हिंसेचे समर्थन हे माणसापेक्षा धर्म महत्वाचा आहे हेच अधोरेखित करते.

जगात प्रबोधन काळानंतर अनेक देश आणि समुदायांनी आधुनिक विचार स्विकारला मात्र इस्लाम त्यास अपवाद राहिला. एकीकडे आधुनिक समाजात निधर्मी वाद्यांची संख्या वाढत असताना धार्मिक उन्माद देखील वाढत जाणे कशाचे द्योतक आहे? विज्ञानवादी समाजात धर्माचे स्थान डळमळीत झाले आहे का? असला प्रश्न विचारला जात असताना धर्माच्या नावावर हत्या होत राहिल्या.

वास्तविक पाहता बुद्धिवादाच्या अंगाने धर्माची चिकित्सा करू जाता असे लक्षात येईल की धर्माच्या उत्पत्तीच्या मुळाशी मानव हाच आहे. त्याच्या कल्याणासाठी आज्ञा किंवा सूत्रे मांडल्या गेली मात्र; त्यातला मानवी कल्याणाचा विचार कधीचा बाजुला पडला. देवी, देवता, अतिंद्रीय शक्ती, ईश्वर या साऱ्या कल्पना मानवी सुपीक मेंदुतून प्रसवल्या. धर्म स्थापना करणारे सर्व मानवच होते हे आपण विसरतो. कोणतीही पारलौकिक शक्ती यामागे नाही.

उच्च नैतिक समाजाची निर्मिती हा उद्देश घेऊन धर्मस्थापना झाल्याचे आपल्या सहज लक्षात येईल. परंतु धर्म निर्माण होण्याच्या मूळ विचाराच्या केंद्र स्थानी काय आहे? तर मानवी समाजाचे कल्याण आणि नेमका हाच मुद्दा आज दुर्लक्षित झालाय. अर्थात मानवाच्या कल्याणासाठी जर धर्माची निर्मिती झाली आहे तर तोच समूह आज त्याच धर्माचे आधारे गळे कापत का सुटलाय याची कारणमीमांसा विविध अंगाने करीत राहणे क्रमप्राप्त आहे.

धर्माने माणसाचे दोन संबंध सांगितल्याचे लक्ष्मणशास्त्री जोशी त्यांच्या धर्माचे मानवी इतिहासातील स्थान या लेखात विषद करतात. ते दोन संबंध म्हणजे माणसाचा सृष्टीशी असलेला संबंध आणि माणसाचा माणसाशी असलेला संबंध. मानवी जीवन यावर आधारलेले आहे. हे संबंध जितके चांगले किंवा वाईट त्यावर जगातली शांती आणि स्थैर्य आधारलेले आहे. माणसाचे माणसाशी संबंध जितके चांगले किंवा वाईट होत जातात तितकी मानवी सभ्यता अवनत किंवा उन्नत होत जाते.

धर्माला अफूची गोळी म्हटले तरी त्याचा गेल्या दोन हजार वर्षातील मानवी समाजावर असलेला प्रभाव कायम आहे. किंबहुना त्याची पकड अधिक घट्ट होत जाताना दिसते. त्यात स्व स्वार्थ, राजकारण, आर्थिक विवंचना, भौगोलिक आक्रमणे या साऱ्यात मानवी संबंध बिघडत गेले आणि माणूस म्हणून आम्ही अवनत होत गेलो. आयसीसपासून लष्करे तय्यबापर्यंत वरकरणी या संघटना दहशतवादाला धर्माचे कोंदण देताना दिसत असल्या तरी मुळात त्यांचे अंतस्थ हेतू हे राजकीय आहेत. अर्थात एकाच धर्माने संपूर्ण जगावर राज्य करावे किंवा जगावर आमच्याच धर्माचे वर्चस्व असावे हा विचार देखील त्यामागे आहेच. परंतु राज्य असावे या विचाराचे मागे पुन्हा राजकीय अधिकार ही सुप्त इच्छा आहेच.

इस्राईल ,प्यालेस्ताईन संघर्ष असो की श्रीलंकेतील मुस्लीम विरुद्ध बोडू बल सेंना असो. म्यानमारमधील असीन विरथु असो की फ्रांसमधील अलीकडचा संघर्ष. या साऱ्यात मानव आणि मानवी सभ्यता अवनत होत जात धर्म आणि धार्मिक उन्माद केंद्रस्थानी आलेला दिसतो. प्रगतीशील, गतिमान आणि शांतीप्रिय मनुष्य जीवनापेक्षा धर्माचे प्राबल्य वाढत जाणे हे येणाऱ्या काळातील अटळ संघर्षाचे प्रतीक आहे. धर्म आणि संस्कृती घरातील एका जुन्या पाण्याच्या घंगाळासारखे आहे.

वर्षानुवर्षे त्यात सुधारणा होत गेलेली असते. काही अपवाद असतीलही पण त्या धर्म संस्कृतिच्या भांड्यात खराब पाणी आले म्हणून घंगाळ फेकायचे नसते तर त्यातले घाण पाणी फेकायचे असते, हे आपण समजून घेतले पाहिजे. आपल्या सभ्यतेने माणूस श्रेष्ठ मानला, त्याच्या कल्याणाचा विचार केला, त्यासाठी धर्म आहे, धर्मासाठी माणूस नाही हे आज ना उद्या लक्षात घ्यावे लागेल. धर्माची चिकित्सा करत राहणे आणि आपली वर्तमानातली आढ्यता बाजूला सारून त्यातल्या सुधारणांना गती देत राहणे हेच मानवी सबंध सुदृढ होण्याचे एकमात्र कारण ठरेल.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.