विरार : महावितरणच्या विरार पूर्व उपविभागात मागील एक वर्षात तब्बल 10 कोटी रुपयांची वीज चोरी पकडण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी आढळलेले चार लाइनमन निलंबित करण्यात आले आहेत. यातील बहुतांश मीटर हे 60 ते 70 टक्के स्लो करण्यात आलेले होते, अशी धक्कादायक कबुली बविआ शिष्टमंडळाच्या बैठकीत महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मुकुंद देशमुख यांनी दिली आहे. तर चार टक्के म्हणजेच सहा हजार मीटर फॉल्टी असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली आहे.
मागील आठ दिवसांपासून विरार पूर्व परिसरातील वीज सातत्याने खंडित होत आहे. परिणामी या परिसरातील 40 हजारहून अधिक वीज ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर संघटक सचिव अजीव पाटील व माजी स्थायी समिती सभापती प्रशांत राऊत यांच्या नेतृत्त्वात बहुजन विकास आघाडीच्या शिष्टमंडळाने विरार पूर्व उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता मुकुंद देशमुख व अन्य अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्या प्रसंगी महावितरणला येत असलेल्या अडचणी-समस्या व महावितरणकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती अतिरिक्त कार्यकारी अभियंता मुकुंद देशमुख यांनी या शिष्टमंडळाला दिली.
विरार पूर्व उपविभाग हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा सबडिव्हिजन असलेला भाग आहे. एका सबडिव्हिजनची लोकसंख्या अंदाजित 50 हजार इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. मात्र विरार पूर्व भागात सव्वादोन लाख वीज ग्राहक आहेत. ही संख्या एका सबडिव्हिजनच्या चार पट आहे, अशी माहिती मुकुंद देशमुख यांनी दिली. भिवंडी ते पालघर आणि वैतरणा असा हा भाग विस्तारलेला आहे. त्यामुळे या भागात विजेची मागणी मोठी असून, त्यावरील ताणही जास्त असल्याचे ते म्हणाले. त्यातूनच वीजचोरी होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
फॉल्टी मीटरमुळे वीज ग्राहकांना अवाजवी बिले येत असल्याने हे मीटर बदलण्यासाठी महावितरणकडून निविदा काढण्यात आलेली आहे. येत्या दोन-चार महिन्यांत त्यासाठी एजन्सी नेमून हे मीटर बदलण्यात येतील. त्यामुळे ही समस्यादेखील निकाली निघेल, असा विश्वास देशमुख यांनी या वेळी व्यक्त केला. चाळ आणि परिसरातील वीज समस्या गंभीर असल्याचे त्यांनी मान्य केले. बहुतांश बांधकाम व्यावसायिक आधी तीन रूम बांधतात. त्यासाठी तीन मीटरची मागणी करतात. पुन्हा दोन रूम बांधतात. मग त्यासाठी पुन्हा दोन मीटरची मागणी करतात. यामुळे वीजवाहिन्यांचे जाळे पसरते. ही समस्या गंभीर आणि धोकादायक आहे. ही समस्या निकाली काढण्यासाठी मल्टीमीटर बॉक्स बसविण्यात येणार आहेत. जेणेकरून सर्व मीटर एकाच बॉक्समध्ये असतील. त्या बॉक्समधून एका वीज वाहिनीद्वारे ग्राहकाच्या घरात वीज जाऊ शकेल. योजनेच्या पहिल्या टप्प्यात फॉल्टी मीटर व मल्टी मीटर बसविण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सातत्याने वीज खंडित होत असल्याबाबतही त्यांनी या वेळी खुलासा केला. येथील इन्फ्रास्ट्रक्चरची अवस्था अत्यंत वाईट होती. कित्येक वर्षे कंडक्टर बदली करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे तो जीर्ण झाला होता. पण मागील दोन वर्षांत महावितरण व ठेकेदारांचा विरोध पत्करून; कित्येकदा त्यांच्यासमोर हात पसरून 14 किलोमीटरचा पॉइंट-वनचा कंडक्टर बदली करून घेण्यात आलेला आहे, असे देशमुख म्हणाले. त्याची क्षमता 300 एम्पियर होती. त्यावर प्रचंड ताण होता. वसईपासून विरार-देशमुख फार्मपर्यंत तो बदलून घेण्यात आल्याने त्याची क्षमता आता पॉइंट-टू इतकी झालेली आहे. 550 एम्पियर इतकी आता त्याची क्षमता आहे. केवळ आता यातील 10 मीटरचे काम वेळेअभावी शिल्लक असल्याचे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.