विक्रमी! दिवसभरात 1405 गोविंदांनी केले रक्तदान, महिला गोविंदाही सरसावल्या

विक्रमी! दिवसभरात 1405 गोविंदांनी केले रक्तदान, महिला गोविंदाही सरसावल्या
Updated on

मुंबईः मुंबईतील विविध गोविंदा पथकांनी रविवारी रक्तदान शिबिरे आयोजित करून तब्बल एक हजारांपेक्षा अधिक रक्ताच्या बाटल्यांचे संकलन केले आहे. 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहिंदडी उत्सव साजरा करणे शक्य नसल्याने दहिहंडी समन्वय समितीने शहरातील गोविंदा पथकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. या आवाहानाला प्रतिसाद देत रविवारी मुंबईतील विविध गोविंदा पथकांनी रक्तदान शिबिरे आयोजित केली. या शिबिरात 1 हजार 405 रक्ताच्या बाटल्यांचे संकलन केले गेले. यामध्ये गोविंदांसह गोपिकाही मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या.

रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यामध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे, राज्य रक्त संक्रमण परिषद आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातर्फे रक्तदान करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. यंदा कोरोनामुळे अनेक उत्सवांवर संक्रात आली आहे. मात्र दरवर्षी अनेक संकटाचा सामना करत दहिहंडी साजरा करणार्‍या गोविंदा पथकाने यंदाही कोरोनाच्या संकटाचा सामना धाडसाने करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रक्त आटेपर्यंत दहिहंडीचा सराव करणार्‍या गोविंदा पथकांनी यंदा रक्तदान करावे असा निर्णय दहिहंडी समन्वय समितीकडून घेण्यात आला. समन्वय समितीच्या या निर्णयाला गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन मुंबईतील वडाळा येथील यश गोविंदा पथकाने 200 बाटल्यांचे रक्तसंकलन केले. तर विलेपार्ले येथील पार्ले स्पोर्ट्स क्लब आणि पार्लेश्वर दहिहंडी पथक यांनी एकत्रित आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये 80 बाटल्या, समस्त चुनाभट्टी गोविंदा पथकाने 111, जोगेश्वरीतील एमएमआरडीए वसाहत गोविंदा पथक 71, आर्यन्स गोविंदा पथक 101, साईराम गोविंदा पथक 307 रक्त बाटल्यांचे संकलन केले. या मंडळांबरोबरच जोगेश्वरीतील साई शाम मित्र मंडळ, कोकण नगर गोविंदा पथक, अंधेरीतील आंबोली गोविंदा पथक, सांताक्रुझचे सर्वोदय गोविंदा पथक, गिरणगावचा गोविंदा या पथकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. गोविंदा पथकांकडून आयोजित रक्तदान शिबिराला शहरातील गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कोरोना काळात चार वेळा भरवली शिबिरे

चुनाभट्टी गोविंना पथकाने कोरोना काळात चार वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन केले. सायन हॉस्पिटल रक्तपेढीच्या सहकार्याने हे शिबिर भरवले असून, आतापर्यंत 676 रक्त बाटल्यांचे संकलन केल्याची माहिती दहिहंडी समन्वय समितीचे खजिनदान समीर सावंत यांनी दिली.

गोपिकाही सरसावल्या

रक्तदान शिबिरांमध्ये शहरातील विविध ठिकाणांहून गोविंदांनी येऊन रक्तदान केले असले तरी यामध्ये गोपिकांही उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. पार्ले स्पोर्ट्स क्लबतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात गोपिंकाचा सहभाग अधिक होता. यातील सात ते आठ गोपिका प्लाझ्मा दान करण्यासाठीही तयार झाल्या आहेत. तसेच यावेळी रक्तदानासाठी आलेल्या गोविंदा आणि गोपिकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप केल्याची माहिती दहिहंडी समन्वय समिती सचिव आणि पार्ले स्पोर्ट्स क्लबच्या अध्यक्ष गीता झगडे यांनी दिली.

(संपादनः पूजा विचारे)

1400 govinda donate blood for help thackeray government

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.