अलिबागमध्ये २०० रुपयांत १५ पापलेट

अलिबाग : पापलेट माशांचे भाव घसरले आहेत.
अलिबाग : पापलेट माशांचे भाव घसरले आहेत.
Updated on

अलिबाग : अरबी समुद्रातील वादळाच्या शक्‍यतेने परराज्यातील मच्छीमारांनी रायगड जिल्ह्यातील बंदरांचा आधार घेतला आहे. त्यांनी पकडलेल्या करळी, पापलेट अशी नानाविविध मासळीची ठिकठिकाणच्या बंदरात विक्री केल्याने माशांचा जणू पूरच आला आहे. त्यामुळे मासळी स्वस्त झाली आहे. अलिबाग मासळी बाजारात तर अवघ्या २०० रुपयांत मध्यम आकाराचे तब्बल १२ ते १५  पापलेट मिळत आहेत. त्यामुळे मांसाहारींची चंगळ झाली आहे. 

मागील आठवडाभर रायगड, मुंबई किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता. अरबी समुद्रात एका आठवड्यापूर्वी मासेमारीसाठी गुजरात, गोवा, राज्यातून निघालेल्या मासेमारी नौकांना या वादळाची चाहूल लागताच त्यांनी रायगड जिल्ह्यातील जवळच्या बंदरांचा आधार घेतला. विशेषतः गुजरात, कर्नाटक राज्यातील मच्छीमारांनी रायगड जिल्ह्यातील वरसोली, साखर-आक्षी, आगरदांडा, जीवना या बंदरांचा आधार घेतला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून हे मच्छीमार येथेच तळ ठोकून असून हवामान शांत होण्याची वाट पाहत आहेत. त्यांनी पकडून आणलेली मासळी येथेच उतरविल्याने मासळीची आवक अचानक वाढली. यात वेगवेगळ्या आकारातील पापलेटचे प्रमाण सर्वाधिक असल्याची माहिती रायगड जिल्हा मच्छीमार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेषनाथ कोळी यांनी दिली. ही मासळी एका आठवड्यापूर्वीची आहे. ती या मच्छीमारांना साठवून ठेवावी लागली होती. त्यांची विक्री आता कमी किमतीत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

मिळेल त्या ठिकाणी मासेविक्री
या वर्षीच्या हंगामात पहिल्यांदाच इतक्‍या मोठ्या प्रमाणात विशिष्ट जातीचे मासे बाजारात विक्रीसाठी आले होते. या संधीचा फायदा घेण्यासाठी येथील मच्छीविक्रेत्या महिलांनीही सकाळपासून बाजारात आपापल्या जागा पकडून ठेवल्या होत्या. ज्या विक्रेत्या महिलांना बाजारात जागा मिळाली नाही, अशा महिलांनी रस्त्याच्या कडेलाच बस्तान मांडत मासे विकण्यास सुरुवात केली होती. 

स्थानिक मासेमारी नौका बंदरातच
वादळाच्या शक्‍यतेने येथील मासेमारी नौका गेल्या पाच दिवसांपासून बंदरात नांगरून ठेवल्या आहेत. अरबी समुद्रातील वातावरण शांत होण्याची ते वाट पाहत आहेत. १५ ऑगस्टपासून मासेमारीचा नवा हंगाम सुरू झाल्यानंतर अरबी समुद्रातील हवामानाची स्थिती सतत बदलत आहे.

मासेमारीचा नवा हंगाम सुरू झाल्यापासून सतत बदलत असलेल्या हवामानाचा फटका येथील मच्छीमारांना बसत आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळी परिस्थितीमुळे गेल्या आठवडाभरापासून येथील मच्छीमार बंदरातून निघालेले नाहीत. परराज्यातून आलेली आठवड्यापूर्वीची ही मासळी आहे.
- शेषनाथ कोळी, अध्यक्ष, रायगड जिल्हा मच्छीमार संघटना

इतक्‍या कमी किमतीत यापूर्वी पापलेट कधी मिळाले नव्हते. बहुतांश मासे विकणाऱ्या महिलांकडे पापलेट होते, त्यामुळे त्यादेखील किमतीमध्ये जास्त घासाघीस न करता विक्री करत होत्या. असे चित्र क्वचितच पाहावयास मिळते.
- मकरंद पाटील, ग्राहक, अलिबाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.