पॉझिटिव्ह बातमी : ठाणे जिल्ह्यातील तब्बल 221 ग्रामपंचायती कोरोनामुक्त, 'या' तालुक्याने तर कमालच केली

corona
corona
Updated on

ठाणे : जिल्ह्यातील शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात प्रशासनाला यश येत आहे. त्यातच आता जिल्हा परिषद प्रशासनासह आरोग्य विभागाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, ग्रामीण भागातील प्रतिबंधित क्षेत्र घोषित करणे, त्या क्षेत्रातील घरांचे सर्वेक्षण करणे, आदींसह ज्या ग्रामपंचायतींमध्ये 28 दिवसांत एकही नवी रुग्णाची नोंद झाली नाही. अशा ग्रामपंचायत क्षेत्रात हिरवा झेंडा लावण्यात येणार असल्याची नवी युक्ती जिल्हा परिषद प्रशासनाकडून लढविण्यात आली. त्याची फलश्रुती म्हणून जिल्ह्यातील पाच तालुक्‍यांतील 221 ग्रामपंचायती या कोरोनामुक्त झाल्या असून, त्या ठिकाणी हिरवा झेंडा रोवण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आली. 

मार्च महिन्यात जिल्ह्यातील अंबरनाथ, कल्याण, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्‍यांमध्ये सुरुवातीच्या काळात दररोज थोड्या फार प्रमाणात रुग्ण आढळून येत होते. कालांतराने या भागात दिवसाला शंभरहून अधिक रुग्ण आढळून येण्यास सुरुवात झाली. यामुळे या भागातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आठ हजार 102, तर मृतांची संख्या 276 वर पोहोचली. त्यामुळे कोरोना रुग्णांची ही साखळी तोडण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून रुग्ण आढळून येणाऱ्या विभागात 14 दिवस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून आरोग्य पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यावर भर देण्यात आला. तसेच कोरोना प्रतिबंधित करण्याविषयी जनजागृती करणे, खासगी वैद्यकीय व्यावसायिकांना क्वारंटाईन सेंटर, फिव्हर क्‍लिनिक, अँटीजन टेस्टिंगवर भर देण्यात आला. त्यामुळे ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांचा शोध घेणे सोपे झाले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात सद्यस्थितीत कोरोना बाधितांवर उपचारासाठी पुरेशा प्रमाणात आरोग्य व्यवस्था उपलब्ध असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढ असल्याचे दिसून येत आहे. 

मुरबाडमधील सर्वाधिक ग्रामपंचायती 
ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा) चंद्रकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ग्रामपंचायतीत 28 दिवसांत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येणार नाही. अशा ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात तसेच गावात हिरवा झेंडा लावण्याची नवी युक्ती लढवली. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 430 ग्रामपंचायतींपैकी 221 ग्रामपंचायतींमध्ये 28 दिवसांपासून एकही रुग्ण आढळून आला नसल्याने त्या ग्रामपंचायतींमध्ये कोरोनामुक्तीचा हिरवा झेंडा रोवण्यात आला. यामध्ये मुरबाड तालुक्‍यातील सर्वाधिक 93 ग्रामपंचायती या कोरोनामुक्त झालेल्या आहेत. 

तालुकानिहाय आकडेवारी 
तालुका         एकूण ग्रामपंचायत संख्या     हिरवा झेंडा प्राप्त ग्रामपंचायती 
अंबरनाथ                   28                                      12 
भिवंडी                     120                                      36 
कल्याण                     46                                      19 
मुरबाड                     126                                      93 
शहापूर                     110                                       61

(संपादन : वैभव गाटे)

221 gram panchayats in thane district are free from corona

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.