महाराष्ट् सध्या नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या भूकंपामुळे हादरलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात शिवसेना व अपक्ष असे मिळून जवळपास ५० आमदार गुवाहटी येथे तळ ठोकून आहेत. शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर केलेली आघाडी त्यांना पसंत नसल्याचं म्हटलं जातंय. (Maharashtra Politics Shivsena Eknath Shinde Uddhav Thackeray)
या सगळ्या घडामोडी सुरु असताना नुकताच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. ही तथाकथित ऑडिओ क्लिप सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांची असल्याचं सांगितलं जात आहे. गुवाहाटी येथे बंडखोर आमदारांसोबत असलेले शहाजीबापू पाटील हे या क्लिपमध्ये राष्ट्रवादीवर टीका करताना दिसत आहेत. शरद पवारांबद्दल बोलताना ते म्हणतात,
“पवारसाहेबांना कसं विसरेल, ते मैद्याचं पोतं, बारामतीचा ममद्या आहेत. शरद पवार हे शरद पवार आहेत. ते एक गोष्ट गोड बोलतात पण काटा काढल्याशिवाय राहत नाहीत. त्यांनी सेना संपवण्यासाठीच उद्धव साहेबांना मुख्यमंत्री केलंय. प्रेमानं अजिबात केलं नाही, रागात केलंय. उद्धव भाजपाबरोबर गेले, तर हा माणूस भविष्यात मोठा होईल, त्यांना आताच आवळून टाका, सेना संपवून टाका, संधी सापडलीय. असलं पवारसाहेबांचे राजकारण असतं.
ते आमच्यासारख्यांनी ओळखलं. ते राजकारणात जगाला गंडवतील पण आपल्याला उभ्या आयुष्यात गंडवू शकणार नाहीत. यशवंतराव चव्हाणांच्या तालिमीत तयार झालेली अवलाद आहे आपण.”
शहाजीबापू पाटलांची राष्ट्रवादीवरची नाराजी आजकालची नाही. यापूर्वी देखील त्यांनी जाहीर सभांमधून राष्ट्रवादीवर टीका केली होती. उजनी धरणाच्या पाणीवाटपावरून ते नेतृत्वावर नाराज होते. एवढंच नाही तर त्यांनी यावर्षी जानेवारी महिन्यात पंढरपूर येथे एका हॉस्पिटलच्या उदघाटनावेळी त्यांनी शिवसेना नेतृत्वावर घणाघात केला होता. (shahajibapu patil sangola mla)
आपल्या भाषणावेळी त्यांनी आपल्या आमदारकीच्या विजयात भाजपच्या खासदारांची मदत मिळाल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
या निवडणुकीत भाजपचे माझ्यावर २४ तास लक्ष होते. सारखे काही अडचण आहे का विचारायला फोन यायचे, तब्बल १८ वर्षानंतर पुन्हा आमदारकी मिळताना यंदा भाजपच्या साथीसोबत राष्ट्रवादी आणि शेकाप यांचाही छुपा पाठिंबा मिळाल्याचे सिक्रेट देखील शहाजीबापू यांनी उघड केले.
मात्र निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेकडून गप लांब बसायचं, गडबड करायची नाही अशी तंबी मिळाल्याचं शहाजीबापू पाटलांनी सांगितलं. एवढं नाही तर या सरकारमध्ये आम्हाला कोण खाईल किंवा आमचा कोणी विचार करील असे वाटत नाही असे सांगताना घर की मुर्गी दाल बराबर आहे, अशा शब्दात स्वतःच्याच पक्षाला टोले लगावले होते.
शहाजी बापू पाटलांचं हे भाषण तेव्हा तुफान गाजलं. सांगोल्याचे आमदार आघाडी सरकारमध्ये खुश नसल्याचा संदेश यानिमित्ताने नेतृत्वापर्यंत पोहचला होता. मात्र दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केला होता. तेव्हा ते म्हणाले,
'मी शिवसेना अथवा आघाडी सरकारवर नाराज नसून सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं नसल्याबाबत तसं बोललो. मात्र माझ्या मोकळ्या ढाकळ्या स्वभावामुळे आता मी अडचणीत आल्याने यापुढे बोलताना सावधगिरी बाळगणार आहे.
इतकंच नाही तर त्यांनी तेव्हा सरकारची पाठराखण देखील केली होती.
"माझ्या मतदारसंघासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आत्तापर्यंत २६० कोटी रुपयांची कामे मंजूर केली असून अजून ११०० कोटी रुपयांची कामे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात असल्याचं आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितलं. आम्हाला गरज असते तेव्हा मुख्यमंत्री आम्हाला सह्याद्री अतिथीगृह, मंत्रालय आणि वर्षा बंगल्यावर भेटतात, आमची चौकशी करतात, अडलेली सर्व कामे मार्गी लावत असताना आम्ही पक्षावर आणि सरकारवर का नाराज होऊ? "
४ महिन्यांपूर्वी शहाजी पाटलांनी आपल्याला निधी मिळाल्याचं स्पष्ट केलं होतं मात्र आज एकनाथ शिंदे यांच्या सोबत बंड करताना मात्र ते आपल्याला निधी मिळत नसल्यामुळे सरकारमधून बाहेर पडत असल्याचं सांगत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.