नवी मुंबई : दिवसेंदिवस अधिकाधिक महाग होत चाललेला कांदा शिवसेनेने स्वस्त दरात उपलब्ध करून दिल्यानंतर खरेदीसाठी ग्राहकांच्या अक्षरशः उड्या पडत होत्या. वाशी सेक्टर १० येथे शिवसेनेचे नगरसेवक किशोर पाटकर यांनी अवघ्या ५० रुपये प्रतिकिलोने हे कांदे उपलब्ध केले होते. निम्म्यापेक्षा कमी किमतीत हे कांदे भेटत असल्याचे समजल्यावर काही क्षणात ग्राहकांनी तब्बल दोन हजार किलो कांदे गायब केले.
अवकाळी पावसामुळे शेतातील कांद्याचे तयार पीक खराब झाल्यामुळे सध्या बाजारात कांद्याची आवक कमी झाली आहे. मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठ्यात घट झाल्यामुळे सध्या कांद्याचा बाजार महागड्या फळांनाही लाजवेल असा वधारला आहे. घाऊक बाजारात सध्या १२० ते १३० रुपये प्रतिकिलोने कांदा विकला जात आहे. घाऊक बाजारामधून विक्रीसाठी आणणारे किरकोळ बाजारातील व्यावसायिक १५० ते १६० रुपये प्रतिकिलो दराने कांदा विक्री करीत आहेत. भारतीय जेवण पद्धतीत कांदा हा अविभाज्य घटक असल्यामुळे श्रीमंतांपासून ते गरिबांपर्यंत सर्वांनाच जेवणात कांदा हवा असतो; परंतु अचानक कांद्याच्या किमती वधारल्यामुळे सर्वच गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. हॉटेल व्यावसायिकांनी कांद्याला पर्याय शोधून, वेळ मारून नेली जात आहे. मात्र, कांद्यामुळे सर्वसामान्यांच्या घरातील स्वयंपाकगृहातील जेवणाची चव खराब होत चालली आहे. अशा नागरिकांना दिलासा देण्यासाठी शिवसेनेतर्फे वाशी सेक्टर ९ आणि १० मध्ये माफक दरात कांद्याचे स्टॉल्स लावण्यात आले होते. १३० रुपये प्रतिकिलो दराने मिळणारे कांदे अवघ्या 50 रुपये प्रतिकिलोने मिळत असल्याची वार्ता कळताच वाशीतील शेकडो नागरिकांनी या स्टॉल्सजवळ गर्दी केली. हे कांदे सर्वांना पुरवण्यात यावेत, याकरीता पाटकर यांनी दोन किलोच्या बॅगा भरल्या होत्या. एका नागरिकाला जास्तीत जास्त दोन किलोच खरेदी करता येत होते.
स्थानिकांमधून कौतुकाचा वर्षाव
पाटकर यांनी स्वतः सुमारे एक लाख रुपयांचा तोटा सहन करून जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर स्थानिकांमधून कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.