डोंबिवली- डोंबिवलीतील हाय प्रोफाईल लोढा पलावा परिसरात एमडी पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना मानपाडा पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. आर्शद खान (वय 28) आणि शादाबुद्दीन सय्यद (वय 28) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
यातील आर्शद हा पलावा येथे राहण्यास आहे. तर शादाबुद्दीन हा राजस्थानचा रहिवासी असून या अंमली पदार्थांचे राजस्थानशी काही कनेक्शन आहे का ? याचा तपास पोलिस करत आहेत. यात पोलिसांनी 2 लाख 32 हजार रुपये किंमतीची 58 ग्रॅम वजनाची सफेद रंगाची क्रिस्टल एम.डी. पावडर तसेच दोन मोबाईल,
मोटारसायकल व रोख रक्कम असा एकूण 5 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पलावा येथील जागरुक नागरिकांमुळे ही घटना उघडकीस आली असून याविषयी सकाळने प्रथम वृत्त दिले होते.
मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील लोढा पलावा फेज 2 खोणी गावात दोन व्यक्ती या अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आल्या होत्या. याची माहिती तेथील स्थानिक जागरूक नागरिकांना समजल्याने त्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवली.
तसेच मानपाडा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल तारमाळे यांना याची माहिती देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राम चोपडे,
सहाय्यक पोलिस निरीक्षक तारमाळे, भानुदास काटकर, पोलिस हवालदार सुनिल पवार, संजू मासाळ, विकास माळी, शिरिष पाटील, विजय आव्हाड, अशोक आहेर, ठाकणे यांचे पथक त्वरीत घटनास्थळी दाखल झाले. पलावा सिटी गेट नं. 2 जवळ आरोपी येताच पलावा सिटी मॅनेजमेंट असोसिएशन स्टाफ यांच्या मदतीने पोलिसांनी आर्शद आणि शादाबुद्दीन यांना ताब्यात घेतले.
अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 58 ग्रॅम वजनाची एमडी पावडर आढळून आली. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आर्शद हा पलावा येथेच फाऊंटना सोसायटी मध्ये भाड्याने रहात आहे. तर शादाबुद्दीन हा अजमेर येथील असल्याचे माहिती उघड झाली.
याविषयी माहिती देताना डोंबिवलीचे सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील कुराडे म्हणाले, आर्शद हा अंमली पदार्थ जवळ बाळगून विक्री करणारा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी मुंब्रा पोलिस ठाणे व नवी मुंबईतील एपीएमसी पोलिस ठाण्यात एमडी पावडर विक्री प्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
आर्शद याचे शादाबुद्दीन याच्याशी ओळख कशी ? तो राजस्थान मध्ये गेला होता का ? शादाबुद्दीन राजस्थान येथून डोंबिवलीत कधी आला ? त्यांनी कोणास या अंमली पदार्थाची विक्री केली आहे का ? याचा पोलिस शोध घेत आहेत.
कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात बुधवारी आरोपींना हजर केले असता त्यांना 6 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत असल्याचे त्यांनी सांगितले.
आर्शद हा पलावा येथे भाड्याने रहात असून याविषयी घरमालकाला काही माहिती आहे का ? घरमालकांनी भाडेकरुंचा भाडेकरार व भाडेकरुंची माहिती पोलिसांना देणे आवश्यक असताना त्या गोष्टींचे घर मालक पालन करत असल्याने या प्रकारावरुन उघड होत आहे.
त्यामुळे घरमालकांनी भाडेकरू विषयी माहिती पोलिस ठाण्यात द्यावी, भाडेकरुंची माहिती घेऊनच भाडेकरार करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.