ठाणे - लॉकडाऊनमधील फावला वेळ....त्यांनी यु ट्युबवर दुचाकी चोरीचे प्रशिक्षण घेतले आणि एक दोन नाही तर चक्क 7 दुचाक्या चोरल्याची घटना कल्याण डोंबिवली परिसरात उघडकीस आली आहेत. यातील तिघेही आरोपी हे अल्पवयीन असून त्यांची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली. सातही दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
बदलापूर पाईपलाईन रोड येथील कोळेगावात येथे राहणारे तिघे चोरटे लॉकडाऊनमधील फावल्या वेळेत यु ट्युबवर चोरीचे विविध व्हिडिओ पहात असत. त्यातच त्यांनी अगदी हातसफाईने दुचाकी चोर चोरी कशी करतात याची माहिती यु ट्युबवरुन घेतली. त्यासाठी लागणारे साहित्य जसे की एक्सो ब्लेड, कटर, फ्यूज असे सामानही खरेदी केले. लॉकडाऊन दरम्यान रस्त्यावर तसेच सोसायट्यांमध्ये शांतता असल्याने ही शांतता त्यांच्या पथ्यावर पडली होती. या दरम्यान ते प्रशिक्षण घेतल्यानुसार अगदी हातसफाई करुन दुचाकी चोरीत होते. कल्याण डोंबिवली परिसरात इमारतींच्या आवारात पार्क केलेली वाहने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत होती. या घटनांना रोखण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस निरिक्षक अनंत लांब, विजय कोळी, मधुकर घोडसरे, संदीप बर्वे, प्रवीण किनरे, संतोय वायकर, भैय्यासाहेब अहिरे यांचे पथक चोरांचा शोध घेत होते. त्याचदरम्यान एका व्यक्तीने पोलिसांना तिघेजण आपल्यास महागडी दुचाकी 10 हजारांत विकत असल्याची माहिती दिली. त्यानुसार या तिघांचा त्वरीत शोध घेण्यास पथकाने सुरुवात केली. डोंबिवली एमआयडीसी फेज 1 परिसरात पोलिसांनी या तिघांसाठी गुरुवारी सापळा रचला होता. दोन तीन तासांच्या प्रतिक्षेनंतर घरडा सर्कल समोरुन तिघेजण एका दुचाकीवरुन येताना पोलिसांना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबण्याचा इशारा देऊनही या त्रिकुटाने दुचाकी न थांबविता तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतू पोलिसांना त्यांना पकडण्यात लगेच यश आले.
पोलिस तपासात सुरुवातीला या चोरट्यांनी मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरल्याची कबुली दिली. परंतू संशय अधिकच बळावल्यानंतर चोरट्यांनी याआधीही 6 दुचाक्या चोरल्याची माहिती दिली. पोलिसांनी या आरोपींकडून 8 लाख 25 हजार रुपये किंमतीच्या 7 दुचाक्या हस्तगत केल्या. या सर्व दुचाक्या त्यांनी रहात असलेल्या परिसरात लपवून ठेवल्या होत्या. आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना शुक्रवारी बाल न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मौजमज्जा करण्यासाठी या तिघा अल्पवयीन चोरट्यांनी यु ट्युबवर दुचाकी चोरीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर सराईतपणे 7 दुचाकी चोरल्याही. या चोरलेल्या दुचाकी त्यांनी आपल्याच परिसरात लपवून ठेवल्या होत्या. एका गिऱ्हाईकास पकडून त्यांनी एक दुचाकी अगदी 10 हजार रुपयांत विक्री करत असल्याचे आमिष दिले. परंतू एवढी महागडी दुचाकी इतक्या कमी किंमतीत का विकत आहेत असा संशय गिऱ्हाईकास आल्याने त्यांनी याविषयी पोलिसांना माहिती दिली. चोरलेली दुचाकी विक्रीचा त्यांचा पहिलाच प्रयत्न फसला आणि ते पोलिसांच्या ताब्यात सापडले.
------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.