वरिष्ठांच्या गळाभेटीने कार्यकर्त्यांची कोंडी

वरिष्ठांच्या गळाभेटीने कार्यकर्त्यांची कोंडी
Updated on

मोखाडा - राज्यातील 212 नगरपंचायती आणि नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपने प्रदेश पातळीवरून युती करण्याचे आदेश रात्री उशिरा दिले. पालघर जिल्ह्यातील नगरपंचायतींसाठी शिवसेना-भाजपने स्वबळाची तयारी केली होती; परंतु प्रदेश पातळीवरून ऐनवेळी युतीचे आदेश आले आहेत. त्यामुळे ऐनवेळी इरेला पेटलेल्या कार्यकर्त्यांची कटू झालेली मने कशी मिळवायची? जागा वाटप कसे करायचे? त्यातच कमी वेळात सन्मानपूर्वक या प्रश्‍नांची सोडवणूक होईल का? या प्रश्‍नांनी शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. तसेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून आव्हान उभे करण्याची जय्यत तयारी केली आहे.
नगरपंचायतींच्या निवडणुका घोषित होताच शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या उमेदवारांची चाचपणी केली आणि उमेदवारही निश्‍चित केले होते. दरम्यानच्या काळात शिवसेना-भाजपमध्ये प्रदेश पातळीवर तसेच राज्य सरकारमध्येही खटके उडत होते. त्यामुळे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते या निवडणुकांसाठी इरेला पेटले आहेत; मात्र पालघर जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या विक्रमगड आणि मोखाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वबळाची तयारी करून उमेदवार निश्‍चित केले होते; तर मोखाड्यात शिवसेनेने पाच उमेदवारांचे अर्जही दाखल केले आहेत.
दरम्यान, विक्रमगड नगरपंचायत क्षेत्रात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. ग्रामपंचायत असताना 15 सदस्यांपैकी 14 सदस्य भाजप आणि शिवसेनेचा एक सदस्य होता. त्यामुळे या ठिकाणी भाजपचा वरचष्मा आहे; तर मोखाड्यात ग्रामपंचायत असताना कॉंग्रेस-राष्ट्रवादीची ताकद मोठी होती. येथे 17 सदस्यांपैकी आघाडीचे 10 सदस्य, तर युतीचे सात सदस्य होते. त्यातही शिवसेनेचा वरचष्मा होता; मात्र तालुक्‍यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये भाजपने मोठे यश संपादन केल्याने भाजपची उमेद वाढली आहे. त्यामुळे नगरपंचायत निवडणुकीत भाजप आपली ताकद दाखविण्याचा संकल्प स्थानिक नेत्यांनी केला आहे, तर मोखाड्यात पुन्हा आपले वर्चस्व आणण्यासाठी कॉंग्रेस-राष्ट्रवादीने मात्र जय्यत आखणी केली आहे.

भाजपच्या ताकदीप्रमाणे जागा देण्याचा आमचा विचार आहे; तसेच भाजपची राष्ट्रवादीशी छुपी युती असल्याचा आमचा संशय आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज छाननीनंतर युती करण्याचा आमचा इरादा आहे.
- प्रकाश निकम, जिल्हा परिषद सदस्य, शिवसेना

सन्मानपूर्वक युतीची बोलणी आणि जागा वाटप झाले तरच आमची युती शक्‍य आहे. अन्यथा 16 जागांवर आमचे उमेदवार निश्‍चित करण्यात आले आहेत.
- संतोष चोथे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष

मोखाड्यात आमचे वर्चस्व
ग्रामपंचायतीमध्ये होते. त्यामुळे हे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी आम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी आणि बहुजन विकास आघाडी अशी महाआघाडी केली आहे; तर विक्रमगडमध्येही आम्ही कडवे आव्हान उभे करणार आहोत.
- सुनील भुसारा, राष्ट्रवादी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष

वरिष्ठ नेत्यांशी आमची बैठक होणार आहे. जिल्हाध्यक्ष, पालकमंत्री, खासदार यांच्या निर्णयानंतर आमची शिवसेनेशी युती करण्याची गणिते जुळणार आहेत.
- संदीप पावडे, भाजप तालुका अध्यक्ष, विक्रमगड

आमची भाजपशी बोलणी होणार आहेत. सन्मानपूर्वक बोलणी आणि जागावाटप झाल्यानंतर युती होईल.
- सुनील पोतदार, तालुकाप्रमुख शिवसेना विक्रमगड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.