Property
Propertysakal

Alibag News : मिळकत पत्रिकेवरून भावकीत वाद

अनेक ठिकाणी भूमि अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी लगतच्या हिस्‍सेदारांची कोणतीच कल्पना न देता ग्रामपंचायतीचे अधिकारी जी माहिती देतील, त्यानुसार मिळकत पत्रिका तयार केल्याच्या तक्रारी आहेत.
Published on

अलिबाग - शेजारी राहणाऱ्यांमध्ये अनेकवेळा जागेवरून वाद होतात. गावठाणात तर असे वाद कायम उफाळून येतात. वादविवाद टाळण्यासाठी नेमकी हद्द कोणती, अधिकृत नकाशा कोणता आहे, हे समजण्यासाठी राज्यात स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण भूमापन हा महत्त्वपूर्ण प्रकल्प सुरू आहे.

मात्र रायगड जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीने, ज्या कुटुंबाकडे वडिलोपार्जित ताबा, कब्जा होत्या त्या मिळकती गमावण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायतींनी उत्पन्न वाढीसाठी घरपट्ट्या लावून दिल्यानंतर त्याच घरपट्ट्यांवर मिळकत पत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात स्वामित्व योजना वादाची ठरत आहे.

जिल्ह्यात गावठाण भूमापन योजनेचे विपरीत पडसाद पडले असून सख्या भावांमध्ये, नातेवाईकांमध्ये वाद होत आहेत. १५ तालुक्यांमध्ये एकूण २ हजार १३६ महसूल गावे असून त्यापैकी १ हजार ८६७ गावठाणे आहेत. यापैकी १३३ गावांमध्ये नगर भूमापन झाले असून, उर्वरित १ हजार ७३४ गावांमध्ये स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण भूमापनाचे काम करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात १ हजार ६६४ गावांमध्ये सर्व्हे ऑफ इंडियाकडून ड्रोन फ्लाइंग करण्यात आले असल्याचे जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख सचिन इंगळी यांनी कळविले आहे. सर्वेक्षण पूर्ण झालेल्या मालमत्ता धारकांना मिळकत पत्रिका वाटपाचा भव्य कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात घेण्यात आला. या वेळी वाटप झालेल्या मिळकत पत्रिकांमध्ये आपल्या मिळकतीचा उल्लेख नसल्याने अनेकांचे धाबे दणाणले.

ज्या घरावर नातेवाईक दावा करीत होते, त्या घराची जागा दुसऱ्याची निघाली आहे, तर नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी राहणाऱ्या लोकांची पडीक घरे ज्या जमिनीवर होती, त्या घरांचे नव्याने असेसमेंट तयार करण्यात आले आहेत. अनेक मिळकतदारांना ड्रोनद्वारे सर्व्हे होत असल्याची माहितीच मिळाली नाही.

अनेक ठिकाणी भूमि अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी लगतच्या हिस्‍सेदारांची कोणतीच कल्पना न देता ग्रामपंचायतीचे अधिकारी जी माहिती देतील, त्यानुसार मिळकत पत्रिका तयार केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे जिल्हा भूमि अभिलेख कार्यालयात आमचे घर गायब करण्यात आल्याचे तक्रारी घेऊन येणाऱ्यांच्या तक्रारी वाढत आहेत.

कर्ज उपलब्‍ध होणार

भूमि अभिलेखच्या अधिकृत संकेतस्थळावर मिळकत पत्रिका उपलब्ध करण्यात आल्‍या आहेत. या मिळकत पत्रिकांमुळे गावठाणातील सर्व मालमत्तांचे, घरांचा नकाशा, सीमा व क्षेत्र याची माहिती उपलब्ध आहे. मालमत्तेचा अधिकार पुरावा म्हणून मिळकत पत्रिका व सनद मिळाल्यामुळे मिळकतीवर कर्ज उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा फायदा होत आहे.

यामुळे जागेची मालकी हक्क, तंटे, वाद तसेच जमीन खरेदी विक्री व्यवहारातील फसवणूक टाळता येईल, असे सांगण्यात येत होते, परंतु असे वाद कमी न होता अधिकच वाढले आहेत.

अतिक्रमण रोखण्यास मदत

गावठाण भूमापनामुळे गावातील रस्ते, खुल्या जागा, नाले यांच्या सीमा निश्चित होऊन अतिक्रमण रोखण्यास मदत होईल. तसेच मिळकतींना बाजारपेठेत तरलता येऊन गावांची आर्थिक प्रत उंचावेल व ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी बांधकाम परवानगी अतिक्रमण निर्मूलनासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल, यासाठी ही योजना उपयुक्त ठरणार आहे.

मात्र, प्राथमिक स्थितीत योजनेतून झालेले अतिक्रमण हटवण्याची किचकट कामे ग्रामपंचायत विभागाला करावी लागत आहेत. ज्याप्रमाणे साताबारा उताऱ्यावर एखादी शेतजमीन किती आहे याची माहिती दिलेली असते, त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या नावाने किती बिगर शेतजमीन आहे, याचीही माहिती प्रॉपर्टी कार्डवर असेल. म्हणजेच बिगर शेतजमीन क्षेत्रात एखाद्या व्यक्तीच्या नावावर किती स्थावर मालमत्ता म्हणजेच घर, बंगला, व्यवसायाची इमारत आहे, याची माहिती प्रॉपर्टी कार्डवर नमूद असेल.

रायगड जिल्ह्यातील १ हजार ७३४ गावांमधील १ हजार ६६४ गावांपैकी ६७१ गावांची मोजणी व चौकशीचे काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी २०७ गावांचा डाटा ईपिसीआयएस आज्ञावलीमध्ये वर्ग करण्यात आला आहे, तर १५० गावांच्या सनदा तयार केल्‍या असून ८५ गावांच्या सनद वाटप झाले आहेत. आतापर्यंत १७० गावांचे मिळकत पत्रिका तयार केल्‍या असून काही त्रुटी असल्यास त्यावर दाद मागण्याची मुभा आहे.

- सचिन इंगली, जिल्हा भूमि अधिक्षक अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()