अलिबागमध्‍ये असलेले एसटी स्थानक. तर दुसर्!या छायाचित्रात नियोजित एसटी स्थानकाचे चित्र.
अलिबागमध्‍ये असलेले एसटी स्थानक. तर दुसर्!या छायाचित्रात नियोजित एसटी स्थानकाचे चित्र.

नव्या बसस्थानकाची अलिबागकरांना प्रतीक्षा

Published on

अलिबाग : अलिबाग येथील एसटी बसस्थानक सर्व सोई-सुविधांयुक्त बांधले जाणार आहे. २७ ऑगस्टला या कामाचे भूमिपूजन थाटामाटात झाले. सुमारे सात कोटी रुपयांचा अपेक्षित खर्च असलेल्या स्थानकाच्या कामाची प्रतीक्षा वाढली आहे. सहा महिन्यांनंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती या विभागाकडून मिळाली आहे. त्यामुळे प्रवाशांना आणखी काही महिने नव्या एसटी बसस्थानकाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अलिबाग एसटी बस आगार १ एप्रिल १९६१ मध्ये बांधण्यात आला. त्यामुळे नियोजित बस स्थानक नव्याने बांधण्यात येणार आहे. जुलै महिन्यात पुणे येथील डिरोक्‍ट्रिक इंजिनिअरिंग या कंपनीकडून स्थानकातील मातीचे परिक्षण करण्यात आले. त्याप्रमाणे, नव्या इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला असून स्थानकात १४ फलाट असणार आहेत. त्यामध्ये लांब पल्ल्यांसह स्थानिक ठिकाणी जाणारी वाहने पार्किंग करण्यात येणार आहेत. तळ मजला व पहिला मजला अशा पद्धतीने बसस्थानक आहेत. तळ मजल्यामध्ये फलाट असून तेथे निश्‍चित स्थळी जाणाऱ्या बसेस पार्किंग करण्यात येणार आहेत. प्रवाशांना एसटीची वाट पाहताना निवांतपणे बसता यावे, यासाठी खास प्रतीक्षालय असणार आहे. या स्थानकात कर्मचाऱ्यांसह प्रवाशांना खाद्य पदार्थ व जेवण घेता यावे यासाठी उपहारगृहाचीही सोय केली आहे. प्रसाधनगृह, पार्सल खोली, महिलांसाठी हिरकणी कक्ष, आरक्षण कक्ष, स्थानक कार्यालय असणार आहे. 

पहिल्या मजल्यावर चालक व वाहकांसाठी विश्रांती कक्ष बांधण्यात येणार आहे. त्यामध्ये महिला व पुरुषांसाठी वेगळे कक्ष असणार आहे. उभारण्यात आलेल्या वेगवेगळ्या कक्षांमध्ये अद्ययावत सुविधा आहेत. सुमारे एक लाख प्रवासी ये-जा करण्याची क्षमता नव्या स्थानकात असणार आहे. ७ हजार ६३० चौरस फूट इतक्‍या क्षेत्रावर नवीन स्थानकाचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यासाठी सहा कोटी २८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. बाहेर जाण्याचा व आतमध्ये येण्याचा बसचा मार्ग वेगळा आहे. प्रवाशांसाठीही वेगळा मार्ग आहे. स्थानकाच्या परिसरात वृक्षांची लागवड करून परिसर पर्यावरणपूरक ठेवण्याचा प्रयत्न असणार आहे. 

५८ वर्ष जुने असलेले अलिबाग बस स्थानक आता नव्या रूपात दिसणार असल्याने प्रवाशांसह कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. भूमिपूजन होऊन तीन महिने होत आली, तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही. विधानसभा निवडणूक लागल्याने त्याची प्रक्रिया लांबणीवर गेल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अजून सहा महिने वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे सहा महिन्यांनंतर एसटीच्या स्थानकाचे काम सुरू होण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे.

अलिबागमधील बसस्थानकास प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी दिली आहे. वास्तूविशारद गोडबोले मुकादम ॲन्ड असोसिएट्‌स आहेत. वाहनांना जाण्या-येण्याचा मार्ग वेगळा असून प्रवाशांसाठी वेगळा मार्ग ठेवला आहे. १७ सप्टेंबरपर्यंत कामाच्या निविदा मागवल्या होत्या. १९ सप्टेंबरला तांत्रिकदृष्ट्या पडताळणी केली. त्यानंतर निविदा काढण्यात आल्या आहेत.
- अरविंद सोनार, विभागीय अभियंता-रायगड

नियोजित बसस्थानकाचा तपशील 
 एकूण जागा - १९ हजार ५३० चौ. मी.
 आगाराचे क्षेत्रफळ - ११ हजार चौ. मी. 
 बसस्थानकाचे क्षेत्रफळ - ७ हजार ६३० चौ. फूट 
 निवासस्थानाचे क्षेत्रफळ - ९०० चौ. फूट 
 सर्व्हे नंबर -  ७७८, १२९८
 वास्तूविशारद - गोडबोले मुकादम ॲन्ड असोसिएट्‌स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.