उन्ह्याळ्यात आंब्यांची वाहतूक होणार सुकर

उन्ह्याळ्यात आंब्यांची वाहतूक होणार सुकर
Updated on

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रात हवामानातील बदल तसेच वाढत्या उष्म्याचा फटका हापूस आंब्यालाही बसत आहे. सोनेरी झळाळी असणारा आंबा तापमानवाढीमुळे काळवंडलेला, डागाळलेला दिसतो. यावर तोडगा म्हणून हापूसची वाहतूक आता थेट वातानुकूलित गाड्यांमधून केली जाणार आहे. आंबाप्रेमींना कोकणातील अस्सल हापूस आंब्याची गोडी चाखता यावी, नैसर्गिकरित्या पिकवलेल्या उत्तम दर्जाच्या हापूसचा आनंद घेता यावा, यासाठी 'मायको'ने हे पाऊल उचलले आहे. ग्राहकांना उत्तम प्रतीचा, चांगला आंबा घरपोच मिळावा यासाठी 'मायको'ने वातानुकूलित गाड्यांची (रिफरव्हॅन्स) सोय केली आहे. आंबा खराब होऊ नये आणि आंब्याचा दर्जा कायम राहावा, यासाठी लागणारे विशिष्ट तापमान या गाडीत तयार करण्यात आले आहे. या गाड्यांचा शुभारंभ परिवहनमंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात आला.

कोकणातील 100 शेतकऱ्यांनी एकत्र येत तयार केलेल्या देशातील पहिल्याच 'मायको' या 'मँगोटेक प्लॅटफॉर्म'च्या माध्यमातून शेतातील हापूस थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. हापूस हे अतिशय नाजूक फळ आहे. हापूसची बाजारपेठेत किंवा इतर प्रवासाच्या वेळी ने-आण करताना खूप काळजी घ्यावी लागते. योग्य ती काळजी न घेतल्यास आंब्यांचे नुकसान होते. परंतु ग्राहकांना उच्च प्रतीच्या, चांगल्या, दर्जेदार आंब्याची गोडी चाखता यावी, यासाठी वातानुकूलित गाड्यांची सोय करण्यात आली आहे, असे 'ग्लोबल कोकण'चे संस्थापक संजय यादवराव म्हणाले.

ठाणे, नवी मुंबईतही लवकरच सेवा..

हापूसची साल ही अतिशय पातळ असते. तीव्र उन्हामुळे आंब्यांची साल भाजल्याने अनेकदा आंबे काळवंडले जातात. त्यामुळे खराब झालेला आंबा फेकून द्यावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांचेही प्रचंड आर्थिक नुकसान होते. शेतकरी, आंबा बागायतदारांचे नुकसान होऊ नये आणि ग्राहकांनाही चांगल्या दर्जाचा आंबा मिळावा यासाठी आम्ही वातानुकूलित गाड्यांची सोय केली आहे. पहिल्या टप्प्यात मुंबईत तीन गाड्या दाखल झाल्या आहेत. ठाणे आणि नवी मुंबईतही या गाड्यांची सेवा येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येणार आहे.
- 'मायको'च्या सहसंस्थापक सुप्रिया मराठे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.