मुंबई : अॅमेझॉन इ कॉमर्स कंपनीने (Amazon E-commerce company) भलेमोठे कँपेन चालवून नववर्षानिमित्त आकर्षक डिस्काऊंट सेल (Discount sale on products) लावल्याची केलेली जाहिरात अयोग्य असल्याचा आरोप मुंबई ग्राहक पंचायतीने (Mumbai consumer court) प्रत्यक्ष चाचणीनंतर केला आहे. मुळात डिस्काऊंट मालाच्या किमती आधीच फुगवल्या होत्या, तसेच स्वस्त मालच फारसा उपलब्ध नव्हता, असेही ग्राहक पंचायतीला आढळले. (amazon grocery discount offer scam Mumbai consumer forum)
साखर आणि बटाटे एक रुपया प्रती किलो आणि तूर डाळ व कांदे एक रुपया प्रती अर्धा किलो तसेच वाणसामानाच्या अन्य वस्तु खरेदीवर 45 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट अशा जंगी सवलती या इ कॉमर्स कंपनीच्या जाहिरातीमध्ये देण्यात आल्या होत्या. हे दावे तपासण्यासाठी मुंबई ग्राहक पंचायतीच्या काही कार्यकर्त्यांनी या स्वस्त वस्तू अॅमेझॉनच्या अॅपवरून खरेदी करण्याचाही प्रयत्न केला.
मात्र एक रुपये किलो वा अर्धा किलोचे साखर, तूरडाळ, कांदे-बटाटे घेण्यासाठी ग्राहकांना त्याशिवाय किमान 195 रुपयांची ज्यादा खरेदी करणे (एकूण किमान खरेदी रु. 199) बंधनकारक आहे. ही महत्वाची अट सबंध भल्यामोठ्या जाहिरातीत कुठेही जाहीर केली नाही. अशाप्रकारे मुद्दाम माहिती लपवून केलेली विक्री ही ग्राहक संरक्षण कायद्यानुसार अनफेअर अँड रिस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस ठरते, असे ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी दाखवून दिले.
या 199 रुपयांच्या खरेदीनंतरही डिलीव्हरी चार्जेस परत वेगळे भरावे लागणार आहेतच. ही डिलीव्हरी त्या अॅमेझॉन प्राईमच्या सदस्यांसाठी अर्थात "फ्री" (?) आहे. पण मुळात त्यांचे मासिक सदस्यत्व शुल्क 179 रु. आहे. त्यांचे तिमाही सदस्यत्व शुल्क 459 रु. आहे, तर वार्षिक सदस्यत्व शुल्क 1,499 रु. आहे. म्हणजेच सदस्यत्व शुल्क म्हणून दरमहा किमान 125 रु. वसूल केले जाणार ते वेगळेच, असेही ग्राहक पंचायतीने म्हटले आहे.
तर, एक रुपयात उपलब्ध करुन दिले जाणारे कांदे, बटाटे, तूरडाळ व साखर हे "साठा असेपर्यंतच" असं जाहीरातीत लिहिले आहे. पण हा साठा दर दिवशी किती असेल हे या जाहिरातीत दिले नाही. त्यामुळे ग्राहक पंचायतीच्या फक्त एकाच कार्यकर्त्याला फक्त एक किलो साखर एक रुपयात मिळाली. इतर किती ग्राहकांना या चारही वस्तु एकेक रुपयांत मिळाल्या हे तपासले पाहिजे, असेही पंचायतीचे म्हणणे आहे.
या चारही वस्तुंचा एक रुपयांचा साठा संपल्यावर दाखवलेल्या त्याच वस्तुंच्या बाजारातील किंमती तसेच त्यावर दाखवलेले डिस्काऊंट देखील फुगवलेले आणि फसवे असल्याचे दिसून आल्याचे पंचायतीचे सांगणे आहे. उदा. कांद्याची बाजारातील किंमत 75 रु. किलो असल्याचे अॅमेझॉनने सांगून त्यावर 41 रुपये सवलत देऊन 34 रुपयांनी कांदे विकणार असे जाहीर केले. मात्र कांद्याची बाजारातील सध्याची किंमत 35 ते 40 रुपयेच आहे.
त्यामुळे या व्यवहारातही डिस्काऊंट दिले नसल्याचेही ग्राहक पंचायतीने दाखवून दिले आहे. अशीच चालाखी इतर वस्तूंबाबतही केल्याचे पंचायतीचे म्हणणे आहे. तूरडाळ बाजारात 200 रुपयांना असताना आम्ही 132 रुपयांत देऊ, असे जाहिरात म्हणते. मात्र आज बाजारात उत्तम दर्जाची तूरडाळ 130 ते 140 रु. किलो या दराने उपलब्ध आहे. फक्त त्यांच्या बटाट्याचा दर बाजारापेक्षा स्वस्त आढळला. त्यामुळे ग्राहकांनी फसव्या प्रलोभनांना बळी न पडता जागरुकतेने खरेदी करावी, असेही आवाहन देशपांडे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.