डोंबिवली, ता. 4 - अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखेडे यांनी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांची भेट घेतली आहे. तत्पूर्वी त्यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांची देखील भेट घेतली आहे.
ठाकरे गट उमेदवाराच्या या भेटीगाठीने भाजप शिंदे गटाच्या गोटात खळबळ माजली आहे. याच भीतीतून भाजपचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांनी महायुती पदाधिकाऱ्यांना 'निवडणुका होईपर्यंत कुणीही प्रतिस्पर्धी उमेदवार किंवा कार्यकर्त्यांना भेटू नका. शुभेच्छा काय त्या फोनवरून द्यायला सांगा. 20 तारखेनंतर आपली मैत्री जपा असा सल्ला दिला आहे.
अंबरनाथ मध्ये मनसेने ठाकरे गटाला दोस्तीचा वादा दिला असताना आता शिंदे गटातील पदाधिकारी देखील वानखेडे यांना भेटत असल्याने आमदार बालाजी किणीकर यांच्या विरोधात संदेश जात असल्याने या कानपिचक्या दिल्या जात आहेत का ? अशी चर्चा आता रंगली आहे.