डोंबिवली - अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटात गटातटाचे राजकारण रंगले आहे. शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉ. बालाजी किणीकर असे दोन गट सक्रिय आहेत. विधानसभा निवडणुकीत किणीकर यांना उमेदवारी दिल्यास काम न करण्याचा निर्णय वाळेकर यांनी घेतला आहे. त्यातच निवडणूकीच्या तोंडावर वाळेकर यांनी आपला पत्ता उघडला आहे.
त्यांचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक संदीप भराडे यांनी आपण आमदारकीसाठी इच्छुक असल्याचं जाहीर केले असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे 'भावी आमदार' असा उल्लेख असलेले बॅनर्स शहरात लावले आहेत. शिंदे गटातील गटबाजीचे राजकारण यामुळे उघड झाले असून अंबरनाथ मध्ये कोणाचे पारडे वरचढ ठरते हे आता पहावे लागणार आहे.
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटात शहरप्रमुख अरविंद वाळेकर आणि आमदार डॉ.बालाजी किणीकर असे दोन गट उघडपणे सक्रिय आहेत. आमदार बालाजी किणीकर यांच्याशी असलेल्या वितुष्टामुळे त्यांचं काम यंदाच्या निवडणुकीत करणार नाही, अशी ठाम भूमिका वाळेकर गटाने घेतली आहे.
तसेच उमेदवार बदलून दिल्यास आम्ही मन लावून काम करू आणि उमेदवार निवडून आणू, असाही प्रस्ताव वरिष्ठांसमोर वाळेकर गटाने ठेवल्याची विश्वसनीय माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र बालाजी किणीकर हे तीन टर्मचे आमदार आहेत एवढेच नाही तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबत त्यांची जवळीक आहे. त्यामुळे त्यांना बदललं जाईल का हा एक प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वाळेकर गटाकडून आमदार किणीकर यांना कायम विरोध होत आला आहे. त्यामुळे किणीकर यांच्या विरोधात वाळेकर गटाकडून कुणाला उभं केलं जाणार, याची चर्चा रंगली होती. अखेर शहरप्रमुख वाळेकर यांचे अतिशय निकटवर्तीय समजले जाणारे माजी नगरसेवक ॲड. संदीप भराडे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं जाहीर केलं आहे.
इतकंच नव्हे, तर भराडे यांच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी 'भावी आमदार' असा उल्लेख असलेले भराडे यांचे बॅनर्सही अंबरनाथ शहरात लावले आहेत. वाळेकर गट यंदा आमदार किणीकर यांच्या विरोधात संदीप भराडे यांना मैदानात उतरवणार, हे जवळपास निश्चित असल्याची चर्चा राज्यकीय वर्तुळात आहे.
याविषयी ॲड. संदीप भराडे यांना विचारलं असता, 2019 सालच्या निवडणुकीपूर्वी मी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावेळेस त्यांनी पुढच्या निवडणुकीत बघू असं सांगितलं होतं. त्यानुसार यंदा मी त्यांची भेट घेतली असता त्यांनी 'जो उमेदवार सीट निवडून आणेल, त्याचा विचार होईल, त्यामुळे कामाला लागा, असे आदेश दिल्याचा दावा संदीप भराडे यांनी केला आहे.
मागील 15 वर्षांपासून अंबरनाथ विधानसभेत एकच चेहरा दिला जात असून हा मतदारसंघ राखीव आहे. मात्र या मतदारसंघात हवी तशी कामं झालेली नसल्याचं सांगत भराडे यांनी आमदार डॉ. किणीकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली आहे. तसंच पक्षाने जर तिकीट दिलं नाही, तर वरिष्ठ सहकारी आणि कार्यकर्ते यांच्याशी बोलून पुढची वाटचाल ठरवू, पण निवडणूक लढवायचीच आहे, असा ठाम निर्धार भराडे यांनी केला आहे.
दरम्यान या सगळ्या घडामोडी पाहता यंदाच्या निवडणुकीत शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांचा गट उघडपणे आमदार डॉ. किणीकर यांच्या विरोधात काम करणार हे निश्चित आहे. त्यामुळे बालाजी किणीकर चौथ्यांदा आमदार होतात? की स्वपक्षातूनच त्यांचा विजयरथ रोखला जातो? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.