मुंबई : मुंबईतील १०५ बस थांब्यांचा लवकरच कायापालट करण्यात येणार असून हे थांबे आता हरित थांबे म्हणून ओळखले जाणार आहेत. बस थांब्यांच्या माथ्यावर रोपांची लागवड केली जाणार असल्याने हे थांबे आता पर्यावरणपूरक होणार आहेत. तसेच प्रवाशांना आलिशान अशा थांब्यांचा अनुभव घेता येणार आहे. याबाबतची एक चित्रफीत महिंद्रा समुहाचे अध्यक्ष उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर प्रसारित केली आहे.
कुर्ल्याचे ७, विद्याविहारचे ३, घाटकोपरचे ८, विक्रोळीचे ४, मुलुंडचे ६, देवनारचे ११, गोवंडीचे १३, सांताक्रूझचे ४, मागाठाणेचे २, वांद्र्याचे ८, गोरेगावचे १०, गोराईचे ६, पोईसरचा १, मालाडचे २, ओशिवराचे १५ आणि मालवणीचे ५ इतक्या बस थांब्यांचा कायापालट केला जाणार आहे. नव्या स्वरुपातील हे बस थांबे केवळ दिसायलाच देखणे असतील असे नाही तर त्यांचा इतर कामांसाठीही वापर होणार आहे. थांब्यांच्या एका बाजूला व्यायाम करण्याची सोय असणार आहे तर, छप्परावर रोपांची लागवड केली जाणार आहे. यामुळे शहरातील हरितक्षेत्र वाढण्यास मदत होईल.
आनंद महिंद्रा यांच्या ट्विटवर उत्तर देताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले आहेत. "प्रवाशांसाठी सुलभ परिवहन व्यवस्था निर्माण करणे आणि शहराचे सौंदर्य खुलवणे हा उद्देश यामागे आहे", असे आदित्य यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
काही नागरिकांनी मात्र या नव्या स्वरुपातील थांब्यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. थांब्यांना नवीन स्वरूप दिले जाईलही; मात्र त्यांची निगा राखली गेली नाही तर करदात्यांचा पैसा वाया जाणार असल्याची टीप्पणी एका नागरिकाने केली आहे. अन्य एका नागरिकाने काही सूचना केल्या आहेत. थांब्यांवर बसबाबत माहिती देणारी पुस्तके, वाय-फाय, इत्यादी सुविधा देता येतील, असे त्याने म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.