विरार - वसईतील दर्गा नाका, वडवली येथे राहणारी गुणी, उभरती शिल्प कलाकार कु. रोनिका लोपेझ हिने साकारलेल्या बालगणेशाच्या मुर्तीमधे ती इतकी गुंतली की आज जेव्हा बालगणेशाची मुर्ती गणेशोत्सवासाठी घेउन गेले त्यानंतर भावनाविवशतेने तिला रडु कोसळले.
कलाकार हा जन्माने कोणत्याही धर्माचा असू दे पण तो जेव्हा आपली कला सादर करतो तेव्हा तो फक्त त्याच्या कलेशी एकनिष्ठ असतो असे बोलले तर वावगे ठरणार नाही याचे ताजे उदाहरण म्हणजेच वसई येथील रोनिका राॅबिन लोपेझ होय. आपले शिक्षण घेत असतानाच तिने आपला ठसा मातीकामाच्या विभागात उमटवला आहे. विरारच्या विवा महाविद्यालयाच्या अप्लाइड आर्टच्या शेवटच्या वर्गाची ही विद्यार्थिनी. शिल्पकला या विभागात राज्य स्तरावर तिने पारितोषिक जिंकून आपल्यातील कलेची चुणूक या पूर्वीच दाखवली होती. त्यामुळे पुढे ती मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागाचे समन्वयक निलेश सावे यांच्या संपर्कात आली. मुंबई विद्यापीठातर्फे स्पर्धेत सहभागी होउन तिने लागोपाठ दोन वर्षे सुवर्ण पदके जिंकली आहेत.
यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव कसा साजरा करायचा इथपासून मूर्ती कशी बनवायची पर्यंत अनेक अडचणी येत असतानाच निलेश सावे यांनी रोनिकाला आपल्या घरचा गणपती बनवून देण्याबाबत विचारणा केली. आणि त्याचबरोबर मुर्ती कशी असावी याबद्दल ठरविण्याचं स्वातंत्र्यही तिला दिले. सुरुवातीला तिच्यावर मूर्ती कशी साकारणार याचे दडपण आले. यापुर्वी तिने गणपती एकदाच बनविला होता. तो पण विद्यापीठ स्पर्ध्येच्या वेळी. पण त्यावेळी तिच्याबरोबर अनेक सहकारी होते. परंतु यावेळी मात्र तिला एकटीलाच मूर्ती बनवायची होती. याकामी खोचिवडे, वसई येथील जितेंद्र राऊत यांनी तिला मार्गदर्शन केले. त्यांनी तिला गणपती कसा असावा, त्याच्या कोणत्या हातात काय असावे ,गणपतीचे वाहन असलेला मूषक कुठे असावा इत्यादी माहिती दिली आणि मग हळुहळु गणपती तयार होत गेला. एक आव्हान म्हणून बनवायला घेतलेल्या गणपतीशी ती इतकी एकरूप होत गेली कि ती मूर्ती साकारताना चक्क त्या बालगणपतीशी बोलू लागली होती. एखाद्या लहान मुलाशी गप्पा माराव्यात इतकी त्यात गुंतली होती .मूर्ती तयार झाली पण यापूर्वी मूर्तीला रंग देण्याचे काम कधी केले नव्हते त्यामुळे थोड्याश्या अडचणी आल्या पण त्यातूनही तिने वाट काढली आणि विद्येचे दैवत असलेला, ज्ञान शब्दरुपात लिहून मांडणारा मस्त बाल गणेश साकारला.
बाल गणेश तर तयार झाला आणि त्याला घेऊन जायचा दिवस उजाडला मूर्ती घेऊन सावे बंधू चोबारे, वसई येथे त्यांच्या घरी गेले तो पर्यंत रोनिकाला काही जाणवले नाही पण काही वेळा नंतर मात्र तिला राहवले नाही आणि ती रडू लागली जणू आपल्या जवळच्या माणसाला कोणी घेऊन गेले. इतके दिवस ती मुर्ती बनविताना तिला त्या बालगणेशाचा लळा लागला होता. ती त्या मूर्तीशी एकरूप झाली होती. असं म्हणतात की, कलाकार हा आपला आत्मा आपल्या कलेत ओतत असतो आणि त्याचे हे एक जीवंत उदाहरण असं म्हणायला हरकत नाही.
----------------------------------------------
( संपादन - तुषार सोनवणे )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.