आर्यनची भेट घेण्यासाठी शाहरुखला दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला.
क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन याचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने बुधवारी फेटाळला. यानंतर आज (गुरुवारी) शाहरुख खान आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात दाखल झाला. आर्यनची भेट घेण्यासाठी शाहरुखला दहा मिनिटांचा वेळ देण्यात आला. दोन आठवड्यांपेक्षा अधिक काळ आर्यन आर्थर रोड कारागृहात आहे. कारागृहात असताना व्हिडीओ कॉलिंगद्वारे त्याने आई गौरी खान आणि वडील शाहरुख यांच्याशी संवाद साधला होता. मात्र आज पहिल्यांदाच शाहरुख आणि आर्यनची भेट झाली आहे.
शाहरुख कारागृहाच्या आत आला तेव्हा त्याची एण्ट्री कारागृह रजिस्टरमध्ये करण्यात आली. आधार कार्ड आणि इतर कागदपत्रे तपासण्यात आली आणि त्यानंतर शाहरुखला टोकनसह आत पाठवण्यात आलं. आर्यन आणि शाहरुख १५ ते २० मिनिटे बोलले. संभाषणादरम्यान दोघांमध्ये काच होती. दोन्ही बाजूंनी इंटरकॉमद्वारे संवाद साधला गेला. यावेळी चार गार्ड उपस्थित होते. इतर सामान्य आरोपीच्या कुटुंबाप्रमाणेच शाहरुखही आर्यनला भेटला. बैठकीची वेळ संपल्यानंतर स्वतः शाहरुख बाहेर गेला, अशी माहिती कारागृह अधिक्षकाकडून देण्यात आली. कोरोनाकाळात कारागृहात नातेवाईकांना येण्यास बंदी होती. आजपासून आर्थर रोड कारागृहात नातेवाईकांना कैद्यांना भेटण्याची मुभा देण्यात आली आहे. एकावेळी फक्त दोन नातेवाईकांनाच भेटण्याची ही मुभा आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती सुधारल्याने कारागृहा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
आर्यनचा अमलीपदार्थ विक्रेते आणि पुरवठादारांशी संबंध होता, असं विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी नमूद केलं. आर्यनसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचाही जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. न्यायालयाने आर्यनच्या व्हॉट्सअॅप चॅटिंगचा दाखला दिला. आर्यन आणि अन्य दोन आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग सकृतदर्शनी गंभीर आहे. त्यामुळे जामिनावर असताना तो अशा प्रकारचा गुन्हा पुन्हा करणार नाही हे म्हणता येऊ शकत नाही, शिवाय एनसीबीने प्रकरणाशी संबंधित सादर केलेली कागदपत्रे आणि आर्यन, अरबाज यांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर स्वेच्छेने दिलेल्या जबाबानुसार त्यांनी सेवनासाठी ड्रग्ज बाळगल्याचं कबूल केलं होतं. यावरून अरबाजच्या बुटातून हस्तगत केलेल्या ड्रग्जबाबत त्याला माहिती होती हेच स्पष्ट होतं. या बाबी लक्षात घेता आरोपींना जामीन देता य़ेणार नसल्याचं न्यायालयाने म्हटलं. विशेष न्यायालयाच्या निर्णयानंतर आर्यनच्या वकिलांनी त्याच्या जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.