Ashadhi Ekadashi : गेली अनेक वर्षे वारी केली, पण यंदा विठुरायाची वारी चुकली! अपघातात वारकऱ्यांचा दुर्दैवी अंत

हजारो भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठू माउलीचे दर्शन घेतात.
Ashadhi Ekadashi Pandharpur Warkari
Ashadhi Ekadashi Pandharpur Warkariesakal
Updated on
Summary

यंदा प्रथमच सून ही त्यांच्यासोबत पंढरपूरला जाण्यासाठी निघाली होती. परंतु, त्यांच्या बसला अपघात झाला असल्याचे समजते.

डोंबिवली : भजन, किर्तनाची त्यांना लहानपणापासूनच ओढ होती. आषाढी एकादशीला पंढरपूर येथे विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी दिंडीत (Ashadhi Ekadashi) सहभागी होऊन पायी चालत ते विठोबाचे दर्शन घेत असत. परंतु, वयोमानानुसार शरीर साथ देत नसल्याने यंदा त्यांनी पत्नीसह बसने पंढरपूरला जाण्याचे ठरविले. परंतु, काळाने घाला घातला आणि यात नावाळी येथील ह.भ.प. रामदास मुकादम यांचा मृत्यू झाला आहे. तसेच नारीवली येथील ह.भ.प. गुरुनाथ पाटील यांचे वारकरी घराणे. गावात सप्ताह असला की, ह.भ.प. गुरुनाथ यांचे भारुड असायचेच. दरवर्षी ते पंढरपूरला आषाढी एकादशीला जात असत.

यंदाही ते निघाले, परंतु विठुरायाच्या दर्शनाआधीच काळाने त्यांच्यावर घाला घातला आणि अपघातात त्यांचे निधन झाले आहे. कल्याण ग्रामीणमधील श्री मलंगगड पट्टा तसेच 14 गावांचा परिसरात हरी भक्तांची मांदियाळी असून दरवर्षी येथून हजारो भाविक आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठू माउलीचे दर्शन घेतात. कोणी पायी पंढरपूरला जात होते, तर कोणी ट्रेनने प्रवास करत पंढरपूरला जातात. परंतु, गेल्या पंधरा वीस वर्षांपासून कल्याण ग्रामीण भागातून पंढरपूर येथे भाविकांना जाण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध झाली होती.

Ashadhi Ekadashi Pandharpur Warkari
Ashadhi Ekadashi Mahapuja : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न; यंदा नाशिकच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

यामुळे घेसर, शिरढोण, उसरघर, नारिवली, नागाव, वडवली, अंतरवाली, डोंबिवली, चोळेगाव, दहिसर, हेदुटणे, सोनारपाडा, उंबार्ली, नेवाळी, दहीसर आदि भागातील भाविक हे बसने पंढरपूर येथे जात होते. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही कल्याण, डोंबिवली आणि ठाणे ग्रामीण येथील वेगवेगळ्या गावातून 6 बस वारकऱ्यांना घेऊन पंढरपुरच्या दिशेने रवाना झाल्या होत्या. रात्री 11 च्या दरम्यान या बसेस गावातून पंढरपूरला जाण्यासाठी निघाल्या. सर्व भाविक खूश होते. विठुनामाचा जयघोष बसमध्ये सुरु असतानाच पनवेल जवळ वारकऱ्यांच्या एका बसला टॅक्टरची धडक बसली आणि जोरदार आवाज झाला. क्षणात कोणाला नेमके काय झाले ते समजले नाही.

बसमध्ये एकदम शांतता पसरल्याचे बसमधील वारकरी दयानंद भोईर यांनी सांगितले. यानंतर पाठीमागे असलेल्या बसमधील भाविकांनी त्वरित बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. पोलिस, रुग्णवाहिका यांना फोन फिरवले गेले. जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरवर्षी आम्ही पंढरपूरला जातो, हे आमचे 25 वे वर्ष होते. पंढरपूरला जाऊन माउलीचे दर्शन घेतल्यावर मोठा उत्सव करत रिंगण घालायचे होते. परंतु, यंदा हे सर्वच चुकले असून इतर भाविक सुखरुप आहेत हे सर्वात महत्त्वाचे असल्याचे भोईर यांनी सांगितले.

या अपघातात नारिवली गावचे ह.भ.प. गुरुनाथ पाटील (वय 70), नेवाली गावचे ह.भ.प. रामदास मुकादम (वय 70) तसेच डोंबिवली निळजे पाडा येथील श्रीमती हौसाबाई पाटील (वय 65) यांचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे. या वारकऱ्यांच्या मृत्यूची बातमी गावात पसरताच गावात शोककळा पसरली आहे. नारीवली येथील ह.भ.प. गुरुनाथ पाटील हे वारकरी घराण्यातील आहेत. लहान पणापासून किर्तन ते करतात. भारुड करत समाजात प्रबोधन करण्याचे काम ते करीत होते. भारुड करण्यासाठी पंचक्रोशीत त्यांचे नाव होते. 26 गावांत कोठेही सप्ताह असेल किंवा किर्तन असेल तर गुरुनाथ यांचे भारुड हे असायचेच. दरवर्षी ते पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात.

Ashadhi Ekadashi Pandharpur Warkari
Ashadhi Ekadashi : तिरुपती बालाजीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन व्यवस्था सुरू करणार; CM शिंदेंची मोठी घोषणा

यंदा देखील ते बसने पंढरपूर येथे जाण्यासाठी निघाले, परंतु त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. त्यांच्या पत्नीचे यापूर्वीच निधन झालेले असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. नेवाली गावातील ह.भ.प. रामदास मुकादम यांच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे. रामदास यांना दोन मुले व दोन मुली असून चौघांची लग्ने झालेली आहेत. किर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले ह.भ.प. रामदास हे दरवर्षी पायी चालत पंढरपूरला वारीत जात असत. परंतु, वय झाले असल्याने त्यांना पायी चालत जाणे झेपत नव्हते. गेल्या एक दोन वर्षापासून बसची सुविधा उपलब्ध झाल्याने यंदा प्रथमच त्यांनी बसने पत्नीसह पंढरपूरला जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, काळाने त्यांच्यावर घाला घातला. यात रामदास यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पत्नी या अपघातात जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

घेसर गावच्या रहिवासी हौसाबाई पाटील (वय 65) यांचा देखील या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात 3 मुले, 2 मुली, सुना, जावई, नातवंड असा परिवार आहे. आईला भजन किर्तनची पहिल्यापासून आवड होती. गेली अनेक वर्षे ती पंढरपूरला जात होती. सुरुवातीला ट्रेन ने जायची, परंतु गावांमधून बसची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे बसने ती पंढरपूरला जात होती. 20 ते 25 वर्षे झाली, गावातील सर्व भाविक बसने पंढरपूरला जात आहेत. आमचे पूर्ण गावचा बसने पंढरपूरला दरवर्षी जाते अशी माहिती हौसाबाई यांचा मुलगा राजाराम हरी पाटील यांनी दिली.

Ashadhi Ekadashi Pandharpur Warkari
Ashadhi Ekadashi : 'टोकन दर्शन'नंतर आता फक्त दोन तासात मिळणार विठुरायाचं पदस्पर्श दर्शन; मुख्यमंत्र्यांकडून आराखड्याची घोषणा

डोंबिवली सोनारपाडा येथील वंदना ठाकुर (वय 43) या पतीसह प्रथमच पंढरपूरला जाण्यासाठी या बसने प्रवास करत होत्या. दरवर्षी त्यांची सासू नीराबाई या वारीला जातात. दरवर्षी मी ट्रेनने प्रवास करुन आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन घेते. परंतु आता माझे वय झाल्याने मला पंढरपूरला जाणे शक्य होत नाही. म्हणून, माझा मुलगा वारीला जातो. यंदा प्रथमच सून ही त्याच्यासोबत पंढरपूरला जाण्यासाठी निघाली होती. परंतु त्यांच्या बसला अपघात झाला असल्याचे समजले आहे. दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून माझी नात त्यांना पाहण्यासाठी गेली आहे असे नीरा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.