मुंबई : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठीची प्रक्रिया केंद्र सरकारकडून खरोखरच अंतिम टप्प्यात आहे का, अशी विचारणा मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीकडून केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांना करण्यात आली आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रमेश जयराम यांनी केंद्रातील मोदी सरकारने मागील दहा वर्षांत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी काहीही केले नाही, असे विधान करत यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण केलेल्या पाठपुराव्याचे पत्रही जारी केले होते. त्यावर भाजप नेते विनोद तावडे यांनी खुलासा
करत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठीचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले. मराठीच्या व्यापक हितासाठीच्या चळवळीचे प्रमुख व महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीचे संयोजक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केंद्राकडे पत्र लिहून ही बाब खरी आहे काय, अशी विचारणा केली आहे.
दरम्यान, रेड्डी यांनी राज्यसभेत काही दिवसांपूर्वीच एक निवेदन करत मराठीचा अभिजात दर्जा संदर्भातील असा कोणताही प्रस्ताव आता विचाराधीन नाही, असे सांगितले होते. त्यामुळे राज्यसभेत निवेदन देऊन झाल्यावरही विनोद तावडे मात्र हे प्रकरण अंतिम टप्प्यात असल्याचे सांगतात तर साहित्य अकादमी, अभिजात दर्जा देण्याचे निकषच नव्याने तयार केले जात असल्याचे सांगते, या गोंधळात नेमके काय खरे मानायचे, असा जो प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर हे पत्र पाठवण्यात आले असल्याची माहिती जोशी यांनी दिली.
मराठीच्या अभिजात दर्जाप्रकरणी मराठी भाषिकांची दिशाभूल सुरू आहे. केंद्राच्या संस्कृती मंत्रालयाने साहित्य अकादमीला पाठवलेल्या पत्राची प्रत पाच स्मरणपत्रे देऊनही उपलब्ध करून दिली जात नाही, त्याकडेही केंद्रीय संस्कृती मंत्र्यांचे लक्ष या पत्रात वेधले आहे. यातून वास्तव समोर येईल.
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, संयोजक, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.