ठाणे : गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष गाड्या सोडण्यात याव्यात याविषयी राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला पत्र व्यवहार केला आहे. यामुळे चाकरमान्यांच्याही आशा पल्लवीत झाल्या आहेत. मंगळवार 11 ऑगस्टपासून गणपती विशेष लोकल सोडण्यात येणार असल्याची माहिती समाज माध्यमावर प्रसारित झाली आणि याविषयीच्या चर्चांना उधाण आहे. नागरिकांनीही ऑनलाईन तिकीट बुकींगसाठी प्रशासनाचे संकेतस्थळ चेक करण्यास सुरुवात केली. परंतू त्यावर 13 ऑगस्टपर्यंत अनेक गाड्यांचे बुकींग रद्द असल्याने त्यांचा हिरमोड झाला. 11 ऑगस्टविषयी रेल्वे अधिकाऱ्यांमध्येही संभ्रम दिसून आल्याचे पहावयास मिळाले.
गणपती उत्सवासाठी जाण्यासाठी रस्ता वाहतुकीचा पर्याय, मुसळधार पाऊस, त्यात क्वारंटाईन कालावधी यामुळे कोकणात पोहोचायचे कसे असा प्रश्न कोकणवासीयांना पडला आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विशेष लोकल सोडण्यात याव्यात अशी मागणी रोज धरत होती. यानुसार राज्य शासनानेही रेल्वे प्रशासनाला याविषयी पत्रव्यवहार केल्याने कोकणवासीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यातच सोमवारी सकाळी समाजमाध्यमावर 11 ऑगस्टपासून कोकणात गणपतीसाठी विशेष लोकल सोडण्यात येणार असल्याचा संदेश व्हायरल झाला.
गणेशोत्सवासाठी अवघे दोन आठवडे शिल्लक राहील्याने चाकरमान्यांनीही सकाळपासून ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकींगसाठी प्रयत्न सुरु केले. काही चाकरमान्यांनी रेल्वे स्थानक गाठून तिकिट खिडकीवरही चौकशी केली. परंतू त्यांच्या पदरी निराशा पडली. रेल्वेच्या संकेतस्थळावर 13 ऑगस्टपर्यंत कोकणात जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द असल्याची माहिती येत होती, तर तिकिट खिडक्यांवरही कर्मचाऱ्यांनी अद्याप कोणत्याही विशेष गाड्यांची नोंद नसल्याची माहिती दिल्याने चाकरमान्यांचा हिरमोड झाला.
याविषयी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधला असता एका अधिकाऱ्याने 11 ऑगस्टपासून कोकणात गणपतीसाठी विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत, परंतू त्यांच्यावेळापत्रकाविषयी अद्याप माहिती आली नसल्याचे सांगितले तर एका अधिकाऱ्याने गणपती विशेष लोकलची अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आमच्याकडे आली नसल्याचे सांगितले. यामुळे या तारखेविषयी रेल्वे प्रशासन अधिकाऱ्यांमध्येच संभ्रमाचे वातावरण असल्याचे दिसून आले.
कोकणात गणपती सणानिमित्त विशेष लोकल ट्रेनविषयी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडे आलेली नाही. याविषयी माहिती मिळताच ती तत्काळ जनतेपर्यंत पोहोचवली जाईल.
- शिवाजी सुतार, प्रमुख जनसंपर्क अधिकारी मध्य रेल्वे.
----------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.