डोंबिवली : दीड वर्षाची चिमुरडी आईच्या कुशीत निजलेली होती. वडील लघुशंका करायला गेले आणि अपहरणकर्त्यानं ही संधी साधून मुलीला पळवून न्यायचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क प्रवाशांनी त्याला पळायची संधी न देता पकडून चांगलाच चोप दिला.
त्यानंतर कल्याण लोहमार्ग पोलिसांच्या (Kalyan Railway Police) ताब्यात त्याला दिलं. साईनगर-शिर्डी एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली आहे. सलीम पठाण असं अपहरणकर्त्याचं नाव असून तो नाशिक इथं राहणार आहे. पोलिसांनी सलीम याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
तर, दीड वर्षाची सृष्टी गुप्ता हिला पालकांच्या स्वाधीन केलं आहे. नालासोपारा परिसरात राहणारे राकेश गुप्ता हे त्यांची पत्नी आणि दीड वर्षाची मुलगी सृष्टीला घेऊन साईनगर-शिर्डी एक्सप्रेसनं (Sainagar-Shirdi Express) प्रवास करत होते. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ही एक्सप्रेस मुंबईच्या दिशेनं येत असताना सृष्टी आईच्या कुशीत झोपली होती. तर, वडील लघूशंकेसाठी गेले होते. याच दरम्यान सृष्टीला एका इसमानं स्वत:जवळ घेतलं. त्यानंतर हा इसम सृष्टीला उचलून घेऊन जाऊ लागला.
हे पाहून बोगीतील काही सर्तक प्रवाशांची नजर त्याच्यावर पडली. या प्रवाशांनी त्याला हटकत विचारपूस केली. मात्र, हा इसम कोणतीही समाधानकारक उत्तरे देत नव्हता. याच दरम्यान बोगीत झालेला गलबला ऐकून झोपलेल्या सृष्टीच्या आईला जाग आली. तिनं ही आपली मुलगी असल्याचा दावा केला. त्यामुळं प्रवाशांनी तात्काळ त्या इसमाला पकडून चोप दिला. एक्स्प्रेस कल्याण स्थानकात येताच प्रवाशांनी त्याला लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिलं.
चिमुरडीचं अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सलीम पठाण याच्याकडं प्रवासाचं तिकीट देखील नव्हतं. अपहणकर्त्या सलीम पठाणच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करत आहेत.
सलीम पठाण हा नाशिक जिल्ह्यातील येवल्याचा राहणारा आहे. त्यानं अशा प्रकारे किती गुन्हे केले आहेत? याचा तपास करणे गरजेचे आहे. त्याला रेल्वे न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुकेश ढगे यांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.