मुंबई : मुंबई सुरक्षेचे (Mumbai Security) धिंडवडे निघत असताना राज्याचे गृहमंत्री (Home Minister) झोपले आहेत का, आणखी एक अतिरेकी हल्ला (Terrorist Attack) होण्याची वाट ते बघत आहेत का, असे जळजळीत प्रश्न भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केले आहेत. सकाळमध्ये आज प्रसिद्ध झालेल्या, मुंबईवरही दहशतीच्या घिरट्या, या बातमीसंदर्भात त्यांनी सरकारला (Government) धारेवर धरले आहे. ( Atul bhtkhalkar Criticizes home minister over People safety in Mumbai )
मुंबईच्या डोंगरी विभागातील नूर मंजिल इमारतीत नुकतेच ड्रग्स व हत्यारांचे कारखाने सापडले होते. त्यानंतर आता मुंबईत विक्रीस बंदी असतानाही बेकायदेशीररित्या ड्रोन विक्रीचे रॅकेट उघड झाले आहे. यासंदर्भात आज दै. सकाळ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा हवाला देऊन भातखळकर यांनी सरकारवर टीका केली आहे. मुंबईत अशा प्रकारे दिवसाढवळ्या अंमली पदार्थ, हत्यारे, ड्रोनची विक्री सुरू असताना व मुंबईत सुरक्षेचे धिंडवडे निघत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय, मुंबईत आणखी एक 26/11 होण्याची (दहशतवादी हल्ला) वाट पाहिली जात आहे का, असे प्रश्न त्यांनी केले आहेत.
एका आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाचे विशेष पथक मागील वर्षी ऑगस्ट मध्ये महाराष्ट्रात आले होते. या पथकाकडून वर्षभराच्या काळात राज्यातील बॉलीवूड व उद्योग विश्वात वाढत चाललेले अमली पदार्थांचे रॅकेट उघड करण्यात आले. तसेच मुंबईच्या डोंगरी परिसरात आणि मुंबई शेजारील पनवेल, भिवंडी यासारख्या परिसरात धाडी टाकून अंमली पदार्थ व हत्यारांचे कारखाने उघड केले होते. या संदर्भात मी स्वतः मागणी करून मुंबईसह राज्यात वाढत चाललेल्या अतिरेकी व देशविघातक कृत्यांकडे लक्ष वेधले होते. किमान त्यानंतर तरी राज्याच्या गृह विभागाकडून मुंबईसह महाराष्ट्रातील अंमली पदार्थ व बेकायदेशीर हत्यारे विक्रीची पाळेमुळे शोधून काढण्याची आवश्यकता होती, मात्र ते झाले नाही, अशी खंतही भातखळकर यांनी व्यक्त केली आहे.
मुंबईतील बोरा बाजार, लॅमिंग्टन रोड, गोरेगावच्या मोतीलाल नगर परिसरात स्टिंग ऑपरेशन करून बेकायदेशीररित्या विक्री केल्या जाणाऱ्या ड्रोन रॅकेटचा व्यापार आज दै. सकाळ ने उघड केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे अशा प्रकारे ड्रोन विक्री करणाऱ्या दलालांचे रॅकेट सुद्धा या स्टिंग ऑपरेशन मधून उघड करण्यात आले आहे. एका वर्तमानपत्राच्या स्टिंग ऑपरेशनमधून एवढे मोठे रॅकेट उघडकीस येते, पण राज्याच्या गृहविभागाला याची माहिती नाही काय ? असे प्रश्नही भातखळकर यांनी विचारले आहेत. मुंबईसारख्या शहरात इतकी देशविघातक कृत्ये होत असताना राज्याचा गृह विभाग केवळ बघ्याची भूमिका पार पाडत आहे.
वाझे प्रकरणावरून 'वसुली' सरकार अशी बिरुदावली मिळालेले महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दिवसा ढवळ्या खून, बलात्कार, उद्योजक व राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमक्या देणे, अपहरण या आणि अशा गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालेले आहे. राज्याचे गृहमंत्री हे केवळ सुडाचे राजकारण करण्यात मग्न असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तरी मुंबईतील वाढत चाललेली अतिरेकी कृत्ये, हत्यारे, अंमली पदार्थ व ड्रग्स ची खुलेआम विक्री थांबवून गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे, असा सल्लाही भातखळकर यांनी दिला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.