Baba Siddique Murder: सिद्दीकींच्या हत्येचा नक्की कसा रचला कट? धक्कादायक माहिती आली समोर

Mumbai Crime: फरार आरोपी शिवकुमार गौतम (वय २४) याने एका मागोमाग एक अशा सहा गोळ्या त्यांच्यावर झाडल्या.
Baba Siddique Murder plan
Baba Siddique Murder plan How exactly was the conspiracy of murder Shocking information mumbai policesakal
Updated on

Latest Crime Update: राष्‍ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते तथा माजी राज्यमंत्री झियाउद्दिन अब्दुल रहीम सिद्दीकी तथा बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कट दोन आठवड्यांपूर्वीच शिजला होता. यासाठी त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती.

ते हल्ल्यातून वाचू नयेत याची हल्लेखोरांनी पुरेपूर काळजी घेतली होती, अशी माहिती गुन्हे शाखेच्या तपासातून उघड झाली आहे. सिद्दीकी यांना धमकी आल्याचे, तसेच त्यांना ‘वाय’ दर्जाची सुरक्षा असल्याचे वृत्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चुकीचे ठरवले आहे.

आमदार पुत्र जिशान सिद्दीकी यांच्या संपर्क कार्यालयातून बैठक आटोपून शनिवारी रात्री बाबा सिद्दीकी हे घरी जात होते. तेव्‍हा कार्यालयाबाहेरच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. फरार आरोपी शिवकुमार गौतम (वय २४) याने एका मागोमाग एक अशा सहा गोळ्या त्यांच्यावर झाडल्या.

त्याचे साथीदार गुरमेल बलजीतसिंग आणि धर्मराज कश्यप ऊर्फ रतन कुमार गुप्ता हेसुद्धा सिद्दीकी यांच्यावर बंदुका रोखून होते. मात्र, गौतम याच्या गोळीबारातच काम फत्ते झाल्याचे दिसताच त्यांनी गोळ्या झाडल्या नाहीत. गोळीबारानंतर उडालेल्या गोंधळाचा फायदा घेऊन गौतम पसार झाला; मात्र सिंग आणि कश्यप पोलिसांच्या तावडीत सापडले.

Baba Siddique Murder plan
Baba Siddique Murder: धर्मराज काश्यप अल्पवयीन नाहीच; डाव फसला, 21 तारखेपर्यंत पोलिस कोठडी

प्राथमिक चौकशीतून तीन हल्लेखोर २ ऑक्टोबरपासून कुर्ला पश्चिमेतील बैल बाजार परिसरात भाड्याने खोली घेऊन राहत होते. त्यांचा चौथा साथीदार मोहम्मद जिशान अख्तर याने त्यांची मुंबईत राहण्याची, तसेच पैसे आणि शस्त्रांची व्‍यवस्था केल्याची माहिती पुढे येत आहे. त्याच्या मदतीने हे तिन्ही हल्लेखोर दोन आठवडे सिद्दीकी यांच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवून होते. त्यामुळे शनिवारी रात्री सिद्दीकी निर्मलनगर परिसरात केव्हा येणार, कधी निघणार याची खडान्‌खडा माहिती त्यांना होती. त्यानुसार टॅक्सीने ते निर्मलनगर येथील संपर्क कार्यालयाजवळ येऊन थांबले. प्रत्येकाकडे अद्ययावत पिस्तूल, अतिरिक्त काडतुसे, मॅगझिन होते. शिवाय, अंगरक्षक किंवा कार्यकर्त्यांपैकी कोणी आडवे आलेच, तर त्यांना रोखण्यासाठी मिरची स्प्रेही आरोपींनी जवळ ठेवला होता, असे पोलिस तपासात उघड झाले आहे.

------

‘वाय’ दर्जाची सुरक्षा नव्‍हती!

सिद्दीकी यांना मुंबई पोलिसांकडून ‘वाय’ किंवा ‘झेड’ अशी वर्गीकृत सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आलेली नव्हती. त्यांच्यासोबत २४ तास एक पोलिस शिपाई देण्यात आला होता. हल्ल्याच्या वेळी हा शिपाई सिद्दीकी यांच्यासोबतच होता; मात्र सिद्दीकी यांच्याभोवती असलेल्या जमावात हल्लेखोर असल्याने या शिपायासह कोणालाच काही करता आले नाही, असे गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दोन आठवड्यांपूर्वी सिद्दीकी यांना धमकी आल्याचे वृत्तही या अधिकाऱ्याने फेटाळले.

......

गौतमचा पुण्यातही मुक्काम

फरार आरोपी शिवकुमार गौतम पुण्यातील एका भंगार विक्रेत्याकडे काही दिवस आश्रयास होता. मोहम्मद जिशान अख्तर आणि गुरमेल बलजीतसिंग यांच्यासोबत हरियाणातील कारागृहात त्याची ओळख झाली. जिशाननेच सिद्दीकी यांची सुपारी गौतम आणि गुरमेल यांना दिली. पुढे गौतम याने उत्तर प्रदेशातील बेहराईच येथील साथीदार धर्मराज कश्यप यास पुण्यात बोलावून घेतले, अशी माहितीही प्राथमिक चौकशीतून पुढे आली आहे.

----

गौतम, अख्तर यांच्या अटकेनंतरच उलगडा

जिशान याच्यामार्फत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची सुपारी देणारा मुख्य आरोपी कोण, याचा तपास सुरू आहे, मात्र शिवकुमार गौतम, मोहम्मद जिशान अख्तर यांच्या अटकेनंतरच याचा उलगडा होऊन हत्येमागील हेतू स्पष्ट होऊ शकेल, असे गुन्हे शाखेतील अन्य एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्‍ट केले.

Baba Siddique Murder plan
Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येबबातची 'ती' पोस्ट करणाऱ्या शुभम लोणकरच्या भावाला पुण्यातून अटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.